#Savarkar :राहुल गांधी यांनी सावरकर वाचले नाहीत, त्यामुळे त्यांना ते कळले नाहीत ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
मुंबई – राहुल गांधी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पहायला आले, तर मी त्यांच्यासाठी संपूर्ण चित्रपटगृह त्यांच्यासाठी राखून ठेवीन आणि त्यांना एकट्याला हा चित्रपट पहाता यावा, अशी व्यवस्था करीन. त्यांनी सावरकर वाचले नाहीत. त्यामुळे त्यांना ते कळले नाहीत, असे वक्तव्य महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
३० मार्च या दिवशी अंधेरी येथे एका चित्रपटगृहात ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या मराठी चित्रपटाचा विशेष खेळ आयोजित करण्यात आला होता. देवेंद्र फडणवीस आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भूमिका साकारणारे अभिनेते रणदीप हुडा अन् स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पत्नीची भूमिका साकारणार्या अभिनेत्री अंकिता लोखंडे या सर्वांनी हा चित्रपट एकत्रित पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींकडे वरील प्रतिक्रिया दिली.
या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर वाचले नाहीत. त्यामुळेच ते त्यांच्यावर गरळओक करतात. काँग्रेसी आणि डाव्या विचारसरणीच्या इतिहासकारांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर सर्वाधिक अन्याय केला; मात्र त्यांचा खरा इतिहास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. देशाचा खरा इतिहास जाणून घ्यायचा असेल, तर हा चित्रपट सर्वांनी पाहिलाच पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे चरित्र ३६० अंशात आहे. अत्यंत बुद्धीमान व्यक्ती, नेता, निर्भीड स्वातंत्र्यसेनानी, समाजसेवक, जातीप्रथेच्या विरोधात लढणारे सुधारक, मराठी भाषेला समृद्ध करणारे साहित्यिक असे त्यांच्या जीवनाचे अनेक कंगोरे आहेत. त्यांनी सामान्य माणसाला प्रेरणा तर दिलीच, त्यासह भारतीय संस्कृती, हिंदुत्व, यांसह काही चुकीच्या संकल्पना नष्ट करण्याचाही प्रयत्न केला. हा चित्रपट पहातांना आपण स्वातंत्र्य मिळाल्याच्या कालखंडात पोचलो आहोत, असे वाटते. रणदीप हुडा आणि अंकिता लोखंडे यांनी भूमिकांना योग्य न्याय दिला आहे.’’