‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ म्हणजे ज्योतीने तेजाची आरती !
स्वातंत्र्यवीर सावरकर, म्हणजे मूर्तिमंत तेज. तेज प्रखर देशभक्तीचे, तेज जाज्वल्य स्वातंत्र्येच्छेचे, तेज विलक्षण प्रतिभेचे, अलौकिक बुद्धीचे, तेज वैज्ञानिक दृष्टीचे, सामाजिक समरसतेच्या ध्यासाचे, तेज हाती धरलेल्या हिंदुत्वाच्या धगधगत्या ज्वाळांचे !
१. अभिनेते रणदीप हुडा यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेला चित्रपट म्हणजे शिवधनुष्यच !
सावरकर यांचे चरित्रकथन करायचे, तर त्या तेजाचा एक छोटासा अंश तरी आधी अंगी बाणवायला हवा, ती ज्योत अंतरी पेटवायला हवी. अभिनेते रणदीप हुडा यांनी नेमके हेच साध्य केले आहे. म्हणूनच त्यांचा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट एक जिवंत अनुभव ठरला आहे. एक असा अनुभव जो भारतमातेच्या या महान सुपुत्राला अखेर न्याय देणारा भव्य चित्रपट पाहिल्याचे समाधान देतो आणि त्याच वेळी त्या महापुरुषाच्या नशिबी आलेल्या यातना, अपमान, अवहेलना अन् उपेक्षा यांच्या दर्शनाने मन विषण्णही करतो.
आधीचे निर्माते आणि दिग्दर्शक यांनी हाती ठेवलेली संहिता बोटचेपी अन् गुळमुळीत असल्याचे पाहून ती साफ नाकारण्याचे धाडस तर रणदीप यांनी दाखवलेच; पण निर्मिती आणि दिग्दर्शन स्वतः करण्याचे शिवधनुष्यही उचलले. जे खरे आणि योग्य वाटते, मनापासून पटते त्यासाठी घरदार गहाण ठेऊन पैसे उभे करण्याचे ‘करेज ऑफ कन्हिक्शन’ (खात्रीपूर्वक धाडस) रणदीप यांनी दाखवले, तिथेच त्यांनी ‘सावरकर यांच्यावर चित्रपट काढण्याची पात्रता मिळवली’, असे म्हटले पाहिजे. यासाठी सावरकर यांच्या जीवनाचा त्यांनी केलेला सखोल अभ्यास, त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचे परिमार्जन करण्याची त्यांची तळमळ, त्यांची तीव्रता, आवड हे सगळे या चित्रपटाच्या प्रत्येक चौकटीत आपल्याला दिसते.
२. सावरकर यांचे आयुष्य एका चित्रपटात दाखवण्यास अशक्यप्राय असलेले आव्हान साध्य होणे
सावरकर यांचे आयुष्य, म्हणजे नाट्यमय प्रसंगांची मालिकाच. हे सगळे एका चित्रपटात दाखवणे, म्हणजे अशक्यप्राय आव्हानच; पण या चित्रपटाच्या पटकथेने हे मोठ्या प्रमाणात साध्य केले आहे. चापेकर बंधूंच्या बलीदानानंतर सावरकर यांनी देवीसमोर ‘स्वातंत्र्यासाठी मारता मारता मरेन’ या घेतलेल्या शपथेपासून चालू होणारा हा चित्रपट वर्ष १९५० मध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान लियाकत अली यांच्या ५ दिवसांच्या भेटीचे निमित्त करून नेहरूंनी सावरकर यांना १०० दिवस कारागृहात ठेवण्याचा केलेला खुनशीपणा येथे संपतो. या मधल्या कालावधीत सावरकर यांचे धगधगत्या होमकुंडासारखे आयुष्य प्रेक्षक पापणीही न लवता बघत जातो. त्यांची देशभक्ती, बुद्धीमत्ता, कर्तृत्व, दूरदृष्टी आणि विज्ञाननिष्ठा यांच्या दर्शनाने नतमस्तक होतो, तसेच त्यांच्यावर सतत झालेल्या अन्यायाच्या दर्शनाने विषण्ण आणि अंतर्मुखही होतो.
३. चित्रपटातील विविध विषयांची मांडणी अत्यंत अभ्यासपूर्ण आणि समर्पक !
स्वतःचा उदारमतवाद आणि कायद्याचे राज्य यांचा मोठा तोरा मिरवणार्या ब्रिटिशांनी सावरकरांविषयी नेहमी कायदा हवा तसा वाकवला, प्रसंगी धाब्यावरही बसवला. इतरांना दिलेल्या साध्या साध्या सवलतीही त्यांना कधीच मिळू दिल्या नाहीत. तब्बल २७ वर्षे त्यांना बंधनात ठेवले; कारण ब्रिटिशांनी त्यांना नेहमीच आपला सगळ्यात मोठा आणि ‘डेंजरस’ (भयानक) प्रतिस्पर्धी मानले. हे चित्रपट बघतांना सतत जाणवत रहाते आणि ‘ते ब्रिटिशांचे हस्तक होते’, असली बाष्कळ बडबड कीव करण्याच्या लायकीचीही रहात नाही.
लंडनमधील वास्तव्यात ‘अभिनव भारत’ ही संघटना उभारून त्यांनी केलेले क्रांतीकार्य आणि ‘१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध’ हा तेजस्वी ग्रंथ लिहून शेकडो क्रांतीकारकांना दिलेली प्रेरणा, लेनिनसारख्या क्रांतीकारकांशी संपर्क साधून भारतीय स्वातंत्र्यलढ्याला जागतिक पातळीवर मिळवून दिलेले स्थान यांचे अतिशय प्रभावी दर्शन चित्रपटात होते. काळ्यापाण्याच्या शिक्षेच्या कालावधीत त्यांचे मनोबल तोडण्यासाठी त्यांच्यावर करण्यात आलेले अनन्वित अत्याचार आणि त्यांना धीरोदात्तपणे तोंड देत अभंग राहिलेले त्यांचे मनोबल अन् आत्मसन्मान हे सगळे प्रत्यक्षच बघायला हवे. त्यांचा तथाकथित माफीनामा, त्यांनी केलेली हिंदुत्वाची मांडणी हे सगळेच या चित्रपटात अत्यंत अभ्यासपूर्ण आणि समर्पकपणे दाखवलेले आहे.
दिग्दर्शक आणि अभिनेते म्हणून रणदीप हुडा यांची कामगिरी संस्मरणीय झाली आहे. अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि इतरांनीही त्याला उत्तम साथ दिली आहे. लोकमान्य टिळक, गोखले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमिकांसाठी अधिक चांगली निवड करता आली असती, असे वाटल्यावाचून रहात नाही.
४. विघ्नसंतोषी ‘लिब्राडूं’च्या (उदारमतवाद्यांच्या) नशिबी पुन्हा एकदा जळफळाटच !
स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेसच्या विचारसरणीपेक्षा वेगळ्या विचारप्रवाहांचे प्रतिनिधित्व अत्यंत सशक्तपणे केल्याची शिक्षा म्हणून ज्यांचे अस्तित्वच पुसून टाकण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात आला, त्या विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मृती जपणारा हा चित्रपट प्रत्येक भारतियाने बघायलाच हवा. आम्ही हा चित्रपट पाहिला, तेव्हा प्रेक्षागृह संपूर्ण भरलेले होते. कमाईचे आकडेही भराभर वाढत आहेत. हा चित्रपट पडावा; म्हणून देव पाण्यात घालून बसलेल्या किंवा तो पडलाच आहे, अशी स्वतःची वेडी समजूत काढून टाळ्या पिटणार्या विघ्नसंतोषी ‘लिब्राडूं’च्या नशिबी पुन्हा एकदा जळफळाटच लिहिला आहे.
– श्री. अभिजित जोग, ‘असत्यमेव जयते’ आणि ‘जगाला पोखरणारी डावी वाळवी’ या पुस्तकांचे लेखक, पुणे.
(श्री. अभिजित जोग यांच्या फेसबुकवरून साभार)