श्रीमती रजनी साळुंके यांनी अनुभवलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची कृपा !
१. स्वतःत जाणवलेले पालट
१ अ. नामजप आपोआप होणे : पूर्वी माझा नामजप होत नव्हता. मनात पुष्कळ विचार असल्याने माझे मन नामजपावर एकाग्र होत नसे; परंतु आता माझा ‘ॐ नमो भगवत वासुदेवाय’ हा नामजप आतूनच होत असतो. एका संतांनीही माझा नामजप आतून होत असल्याचे सांगितले.
२. श्रीकृष्णाने साहाय्य करणे
२ अ. विस्मरण झालेल्या गोष्टींची आठवण करून देणे : अनेकदा मला वयोमानामुळे बर्याच गोष्टींचे विस्मरण होते. तेव्हा नकळत पावले एका ठिकाणी वळतात. तिथे मी कशासाठी गेले ? हे मला कळत नाही. तेव्हा श्रीकृष्ण सांगतो, ‘तो बघ, दिवा बंद करायचा राहिला आहे किंवा पंखा चालू आहे.’ काही वेळा श्रीकृष्णाने मला बोटाला धरून नेल्यासारखे मी एका जागी पोचते. तोपर्यंत ‘मी तेथे कशासाठी चालले आहे ?’, हे मला कळत नाही. मी पूर्णतः अनभिज्ञ असते. तिथे गेल्यावर कळते की, मला अमुक अमुक गोष्ट हवी आहे किंवा माझ्याकडून ही चूक झाली आहे आणि ती मला दुरुस्त करायची आहे. त्या वेळी श्रीकृष्णाप्रती कशी कृतज्ञता व्यक्त करावी ? हे कळत नाही. काही वेळा तर एखादी वस्तू सापडत नसेल, तर मी त्यालाच विचारते आणि तो मला बरोबर त्या वस्तूपर्यंत नेतो.
२ आ. चुकांची जाणीव करून देणे : कित्येकदा माझ्याकडून झालेल्या चुकांची तो मला जाणीव करून देतो. मी एखाद्या कृतीच्या आधी प्रार्थना केली नसल्यास ती कृती करतांना अडथळे येतात. तेव्हा तो लगेचच मला त्याची जाणीव करून देतो आणि मी प्रार्थना केल्यावर ती कृती व्यवस्थित होते. तो माझे मन सतत आनंदी रहाण्यासाठी मला पुष्कळ साहाय्य करतो.
२ इ. प्रसंगातून लवकर बाहेर काढणे : पूर्वी एखादा प्रसंग घडल्यावर माझे मन अस्वस्थ होऊन प्रतिक्रिया येत असत. आता एखादा प्रसंग घडत असतांनाच श्रीकृष्ण मला सूचनांची आठवण करून देऊन त्यानुसार कृती करून घेतो. त्या वेळी तो माझे मन स्थिर ठेवतो आणि नंतर त्या प्रसंगाचे चिंतन आणि उपाययोजनाही करवून घेतो. अशा प्रकारे तो मला लगेच त्या प्रसंगातून बाहेर काढतो.
२ ई. सारणी लिखाण न केल्यास श्रीकृष्ण मला रात्री झोपू देत नाही.
३. प.पू. डॉक्टरांच्या सत्संगा संदर्भात आलेल्या अनुभूती
३ अ. सत्संगामुळे त्रासांची तीव्रता अल्प होणे : एकदा आम्हा कुटुंबियांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (प.पू. डॉक्टर) यांच्या सत्संगाची अनमोल संधी लाभली. या सत्संगापूर्वी मी पलंगावरून खाली पडले होते. डोक्याच्या दोन्ही बाजू आणि डाव्या पायाची बोटे यांना मार लागला होता. औषधोपचार आणि नामजप चालू होते. मला चक्कर येणे आणि चालता न येणे, हे त्रास होत होते; परंतु सत्संगानंतर त्या त्रासांची तीव्रता पुष्कळ अल्प झाली. प.पू. डॉक्टरांची अथांग प्रीतीमय दृष्टी माझ्यावर पडल्यावर मला आनंदाची जणू भरतीच आली. त्यात मी सर्वकाही विसरून गेले. त्यानंतर डोक्याचे दुखणे आणि पायाची सूज न्यून होऊन मला चालता येऊ लागले. दुखण्याचा कालावधी अल्प झाला. ही सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांची माझ्यावर झालेली मोठी कृपाच होती.
३ आ. गुडघ्याच्या असह्य वेदना न्यून होणे : सत्संगानंतर तिसर्या दिवशी चालतांना अचानक माझ्या उजव्या पायाचा गुडघा ‘लॉक’ झाला. त्याची मुळीच हालचाल होत नसल्याने मला पाय हलवतांनाही पुष्कळ त्रास होत होता. चालणे, उठणे आणि बसणेही शक्य होत नव्हते. हाडांच्या डॉक्टरांकडेही मी जाऊ शकत नसल्याने मुलाने त्यांच्याकडे जाऊन औषधे आणली. सद्गुरु डॉ. गाडगीळकाका यांनी मंत्रजप सांगितला होता. मंत्रजप आणि डॉक्टरांनी दिलेली औषधे यांचा परिणाम होऊन पायाची ३० टक्के हालचाल होऊ लागली. मी काठी घेऊन हळूहळू चालू लागले. ही मला आलेली मोठीच अनुभूती होती. गुडघ्याची अवस्था पहाता ‘काहीतरी मोठे दुखणे असावे’, असे सगळ्यांनाच वाटत होते; परंतु हळूहळू त्रास न्यून होत होता. प.पू. डॉक्टरांच्या सत्संगाच्या वेळी त्यांनी केलेल्या चैतन्याच्या वर्षावामुळे हा सुखद परिणाम झाला होता.
३ इ. शीतपित्ताचा त्रास होऊ लागल्यावर प.पू. डॉक्टरांनी सत्संगात सांगितल्याप्रमाणे भ्रमणभाषवर नामजप लावून तो ऐकल्यावर आश्रमात जाता येणे : माझ्या अंगावर शीतपित्तामुळे (टीप) त्वचेवर सर्वत्र लालसर रंगाचे उंचवटे येतात आणि तेथे पुष्कळ खाज येते. आश्रमात येतांनाच मला हा त्रास होतो. तेव्हा ‘मला आश्रमातील चैतन्य मिळू नये’, यासाठीच अनिष्ट शक्तींचे हे आक्रमण आहे, हे लक्षात येते. एका सत्संगाच्या वेळी प.पू. डॉक्टरांनी ‘भ्रमणभाषवर नामजप लावून तो ऐकत आश्रमात यायचे’, असे सांगितले होते. तसे केल्यापासून मला आश्रमात येता येऊन सेवा करता येऊ लागले.
टीप : शीतपित्त म्हणजे शरिरातील पित्ताचे प्रमाण वाढल्यामुळे अंगावर लालसर रंगाचे उंचवटे येऊन त्यांना प्रचंड खाज येणे
३ ई. कृतज्ञताभावात वाढ होणे : पूर्वी मला या विविध प्रकारच्या आजारपणांमुळे कधी कधी पुष्कळ निराशा येत असे. आता या आजारपणाचा माझ्या मनावर कुठलाच विपरीत परिणाम होत नाही. माझ्या दृष्टीने ते न टाळता येणारे पाहुणे असून त्यांची औषधोपचार आणि उपाय यांनी सरबराई करणे एवढेच माझे कर्तव्य आहे. शारीरिक व्याधींचा माझ्या मनाच्या स्थितीवर काहीही परिणाम होत नाही. त्यामुळे मी आनंदी आहे. ‘प.पू. डॉक्टर माझे प्रारब्ध जाळत आहेत. प्रारब्ध सहन करण्याची शक्ती देऊन माझ्यावर अनंत कृपा करत आहेत’, या विचाराने माझा कृतज्ञताभाव प्रतिदिन वाढत आहे.
माझ्यावर कृपेचा वर्षाव करून मला सतत आनंदी ठेवणार्या प.पू. डॉक्टरांच्या चरणी अनंत कृतज्ञतापुष्पे अर्पण करते.
४. सेवा करतांना आलेल्या अनुभूती
४ अ. ‘स्वतःऐवजी प.पू. डॉक्टरच सेवा करत आहेत’, असे जाणवणे : अनेकदा मला सेवा करतांना आरंभी काही सुचत नसते. प्रार्थना केल्यानंतरच मी धारिकेत पालट करू शकते. एकदा मला एका धारिकेची चौकट करायला सांगितली होती. ती चौकट नेहमीपेक्षा वेगळी असल्याने मला काहीच सुचत नव्हते. मी श्रीकृष्ण आणि प.पू. डॉक्टर या दोघांनाही माझी हतबलता सांगितली आणि त्यानंतर आश्चर्यच घडले. मला नकळत कळफलकावर माझी बोटे आपोआप फिरत होती आणि चौकट सिद्ध होत होती. एकदाही मी माझ्या बुद्धीने तिच्यात पालट केला नाही. ती चौकट तशीच्या तशी पडताळून आल्यावर मला श्रीकृष्ण आणि प.पू. डॉक्टर यांच्याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटली. त्यानंतर मी ती नीट वाचली आणि ‘ती प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळेच झाली’, असे मला जाणवले.
४ आ. सेवा करतांना त्रास उणावणे : नेहमीच्या आजारपणामुळे मला पुष्कळ अस्वस्थता आणि खाज येते. अशा वेळी संगणकासमोर बसून सेवा चालू केल्यावर अर्ध्या ते एक घंट्यातच त्रास अल्प होतो.
४ इ. सेवा करतांना मला आध्यात्मिक लाभ होतात. त्या वेळी श्रीकृष्ण मला नामजपाची आठवण करून देतो.
गुरुदेवा, हे केवळ आपल्या अविरत कृपावर्षावामुळेच घडत आहे. ‘गुरूंची सेवा, हाच साधकासाठी आनंदाचा ठेवा’, याची अनुभूती मला दिल्याबद्दल मी आपल्या चरणकमली कोटी वेळा कृतज्ञता व्यक्त करते.’
– श्रीमती रजनी साळुंके, फोंडा, गोवा.
|