UK Visas To Indians : नोकरीसाठी येणार्‍या भारतियांना व्हिसा न दिल्यास अर्थव्यवस्था कोलमडेल !

ब्रिटनमधील ऋषी सुनक सरकारला उद्योजकांची चेतावणी

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक

लंडन (ब्रिटन) – ब्रिटनमध्ये सत्ताधारी हुजूर पक्षाकडून नवीन व्हिसा नियम येत्या ४ एप्रिलपासून लागू करण्यात येणार आहेत; मात्र याला ब्रिटनमधील उद्योजकांनी विरोध करण्यास प्रारंभ केला आहे. देशातील २०० उद्योजकांनी पंतप्रधान ऋषी सुनक यांना चेतावणी देतांना म्हटले आहे की, मध्यम-स्तरीय कुशल कामगारांच्या व्हिसावरील वेतन मर्यादा वाढवल्यास सुमारे १० लाख भारतीय अर्थव्यवस्थेतून बाहेर पडतील. यातून ब्रिटनची अर्थव्यवस्था ३० टक्क्यांपेक्षा अधिक कोसळण्याची अपेक्षा आहे.

नवीन नियमानुसार ब्रिटनमध्ये नोकरी करण्यास येणार्‍या भारतीय नागरिकांचे वेतन वार्षिक ३० लाखांहून अधिक असेल, तरच त्यांना व्हिसा मिळणार आहे. सध्या हे वेतन वार्षिक साडेसत्ताविस लाख इतके आहे. या नियमामुळे मध्यम-स्तरीय कुशल काम करणार्‍या भारतियांना ब्रिटनमध्ये नोकरी मिळण्याची शक्यता जवळपास नसणार आहे. हा नियम ब्रिटनमधील श्‍वेतवर्णीय लोकांना नोकर्‍या मिळण्यासाठी घेण्यात येत असल्याचे ब्रिटन सरकारचे म्हणणे आहे.

सरकारला निर्णय मागे घ्यावा लागेल !

सत्ताधारी पक्षाशी संबंधित एका प्रमुख व्यावसायिकाने सांगितले की, सरकार असे गृहीत धरत आहे की, मध्यम-स्तरीय नोकर्‍या स्थानिक श्‍वेत लोक करतील; पण वास्तव यापेक्षा वेगळे आहे. मध्यम स्तरावरील नोकर्‍यांमध्ये भारतियांचे वर्चस्व आहे. संपूर्ण व्यवस्था एका रात्रीत पालटणार नाही. सरकारला निर्णय मागे घ्यावा लागेल.

लंडनच्या पाकिस्तान वंशीय महापौरांचाही विरोध

लंडनचे पाकिस्तान वंशीय महापौर सादिक खान म्हणाले की, सुनक सरकार केवळ भारतियांची शिडी खाली खेचण्याचे काम करत आहे; मात्र ब्रिटनची यापेक्षा मोठी हानी होणार आहे. स्थलांतरितांनी ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला चालना दिली आहे. आज प्रत्येक क्षेत्रात त्यांची उपस्थिती आहे. मध्यम स्तरीय नोकर्‍या हा ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून स्थलांतरितांनी तो सुशोभित केला आहे

सत्तेत आल्यास वर्षअखेरीस नियम पालटू ! – मजूर पक्ष

ब्रिटनमधील मुख्य विरोधी पक्ष असणार्‍या मजूर पक्षाचे नेते ख्रिस ब्रायंट यांनी सांगितले की, वर्षअखेरीस होणार्‍या निवडणुकीत आम्ही सत्तेवर आल्यास परिचारिका, शिक्षक आणि मध्यम नोकर्‍या यांसाठी व्हिसाची वेतन मर्यादा पुन्हा वार्षिक साडेसत्तावीस लाख रुपये करू. त्यासाठी ब्रिटनमधील भारतियांशी चर्चा चालू आहे.

संपादकीय भूमिका

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक भारतीय वंशाचे असतांना ते भारतियांना नोकर्‍या न मिळता ब्रिटनच्या नागरिकांना नोकर्‍या मिळाव्यात म्हणून नियम बनवतात आणि त्यांना ब्रिटनमधीलच उद्योजक विरोध करतात, हे लक्षात घ्या !