शीघ्र गतीने आध्यात्मिक उन्नतीसाठी दिलेले कार्य हे माध्यम आणि साधकांची साधना होण्याकडे लक्ष देऊन त्यांना सर्वांगाने घडवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘पूर्वी परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांना मार्गदर्शन करण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जायचे. ते दौर्यासाठी ज्या जिल्ह्यात जातील, तेथील सर्व क्रियाशील आणि नवीन साधकांच्या ओळखी करून घेत असत. तेव्हा साधकांना मार्गदर्शन करतांना त्यांचा साधना आणि कार्य (सेवा) यांविषयी असलेला दृष्टीकोन अन् त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.
(भाग ११)
१. परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांना साधनेसाठी देत असलेले प्रोत्साहन !
१ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांचे साधनेचे प्रयत्न ऐकून त्यांना आलेल्या अनुभूतींचे विश्लेषण करणे आणि साधनेचे चांगले प्रयत्न करणार्या साधकांचे कौतुक करणे : वर्ष १९९८ ते वर्ष २००३ या कालावधीत मी ठाणे जिल्ह्यातील आणि वर्ष २००३ नंतर मुंबई अन् रायगड या जिल्ह्यातील सेवांचे नियोजन करत होतो. परात्पर गुरु डॉ. आठवले दौर्यासाठी आमच्या जिल्ह्यात आल्यावर तेथील साधकांना मार्गदर्शन करत असत. ते साधकांच्या साधनेविषयी असलेल्या शंकांचे निरसन करण्याकडे विशेष लक्ष देत असत. ते साधकांनी साधनेसाठी केलेले वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न ऐकायचे, साधकांना आलेल्या अनुभूती ऐकून त्या अनुभूतींचे विश्लेषण करायचे आणि चांगली साधना करणार्या साधकांचे कौतुक करायचे.
१ आ. आध्यात्मिक त्रास असणार्या साधकांना आध्यात्मिक स्तरावरील उपाय सांगणे : ‘धर्मकार्य करतांना साधकांना वाईट शक्तींचे त्रास कसे होतात ?’, ‘ते त्रास दूर करण्यासाठी साधकांनी कसे प्रयत्न करायला हवेत ?’, याविषयीही ते विस्तृतपणे सांगायचे. आध्यात्मिक त्रास असणार्या साधकांचे त्रास ऐकून ते त्यावर त्यांना आध्यात्मिक स्तरावरील उपाय सांगायचे.
१ इ. वेळेचे बंधन न पाळता साधकांच्या शंकांचे पूर्ण निरसन होईपर्यंत मार्गदर्शन करणे : ते साधकांना साधनेच्या विविध पैलूंविषयी मार्गदर्शन करत असत. वेळेचे बंधन न पाळता ते साधकांच्या शंकांचे पूर्ण निरसन होईपर्यंत त्यांना मार्गदर्शन करत आणि त्यांना साधनेसाठी प्रोत्साहित करत असत. त्यांच्या मार्गदर्शनानंतर साधकांचा साधनेचा उत्साह वाढून त्यांच्या साधनेला गती येत असे.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘अध्यात्म हे मन आणि बुद्धी यांच्या पलीकडचे शास्त्र आहे’, हे साधकांना शिकवण्यासाठी साधकांकडून सूक्ष्मातील अभ्यास करून घेणे
‘अध्यात्म हे मन आणि बुद्धी यांच्या पलीकडचे शास्त्र आहे’, हे साधकांना शिकता यावे; यासाठी परात्पर गुरु डॉक्टर सूक्ष्मातील काही प्रयोग करून घ्यायचे, उदा. एका पाकिटात एखाद्या संतांचे नाव आणि दुसर्या पाकिटात एखाद्या गुंडाचे किंवा राजकारण्याचे नाव कागदावर लिहून ती पाकिटे बंद करत. नंतर ते साधकांना एकदा एक आणि नंतर दुसरे पाकिट दाखवून विचारायचे, ‘‘कुठल्या पाकिटाकडे पाहून काय वाटते ? स्पंदने कशी जाणवतात ?’’ कधी २ साधकांना उभे करून ‘त्यांच्याकडे पाहून काय वाटते ?’, असे विचारत असत. व्यक्तीची साधनेची स्थिती, त्याच्यातील भाव आणि स्वभावदोष अन् अहं यांचे प्रमाण यावर त्या व्यक्तीकडून प्रक्षेपित होणारी स्पंदने अवलंबून असतात. ‘दोन साधकांकडे पाहून कसे वाटते ?’, असे विचारून ते साधकांना या स्पंदनांचा अभ्यास करायला शिकवत असत. अशा प्रकारे ते साधकांमध्ये सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता निर्माण करत असत.
३. कार्यापेक्षा साधनेला अधिक महत्त्व देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
३ अ. साधकांना कार्याविषयी काही न विचारता केवळ साधनेविषयी विचारणे : परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांना कार्याविषयी कधीही प्रश्न विचारत नसत, उदा. ‘ग्रंथ वितरण किती झाले ? किंवा गुरुपौर्णिमेला किती अर्पण-विज्ञापने मिळाली ?’, यांसारखे कार्याशी संबंधित प्रश्न ते कधीही विचारत नसत.
३ आ. साधकाने कार्याचा आढावा सांगायला आरंभ केल्यावर त्याला थांबवून साधनेतील अडचणी विचारायला सांगणे : एखादा साधक कार्याविषयी सांगत असेल, तर ते त्याला थांबवून त्याच्या साधनेतील अडचणी विचारायला सांगत. याविषयीचा एक प्रसंग सांगतो, ‘बहुधा वर्ष २००४ मधील प्रसंग असावा. तेव्हा मी मुंबई जिल्ह्यातील सेवांचे नियोजन करत असे. एकदा देवद, पनवेल येथील आश्रमात परात्पर गुरुदेवांचे मुंबईतील क्रियाशील साधकांसाठी मार्गदर्शन ठरले होते. साधकांची ओळख करून दिल्यानंतर मी मुंबई जिल्ह्याच्या कार्याचा आढावा सांगायला आरंभ केला. तेव्हा परात्पर गुरुदेव म्हणाले, ‘‘तुम्ही हे काय सांगत आहात ? बरेच दिवसांनी भेटलो आहोत, तर साधनेतील अडचणी किंवा शंका विचारायला हव्यात. हे तुम्ही कार्याविषयी काय सांगत आहात ? तुमच्या साधनेतील अडथळे दूर झाले, तर तुम्ही साधनेत लवकर पुढे जाल आणि तुमच्याकडून सेवाही चांगली होईल.’’
४. परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांच्या मनावर व्यष्टी साधनेचे (टीप १) महत्त्व बिंबवण्यासाठी घेतलेले निर्णय !
(टीप १ : १. स्वभावदोष निर्मूलन आणि गुणसंवर्धन, २. अहं निर्मूलन, ३. नामजप, ४. भावजागृतीसाठी प्रयत्न, ५. सत्संग, ६. सत्सेवा, ७. सत्साठी त्याग आणि ८. प्रीती ही अष्टांग साधना करणे)
४ अ. व्यष्टी साधनेकडे दुर्लक्ष करणार्या साधकांच्या सेवा थांबवणे : वर्ष २००३ – २००४ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वतः अनेक जिल्ह्यांमध्ये जाऊन शुद्धीकरण सत्संग (टीप २) घेतले. साधनेकडे दुर्लक्ष करणार्या कार्यकर्त्यांकडून (साधकांकडून) सेवा (कार्य) करतांना पुष्कळ चुका झाल्या होत्या. हे लक्षात आल्यावर परात्पर गुरुदेवांनी त्या साधकांकडील सेवा थांबवून त्यांना घरी राहून व्यष्टी साधनेची घडी बसवायला सांगितली.
(टीप २- साधकांचे स्वभावदोष आणि अहं न्यून करण्यासाठी सत्संगात त्यांच्याकडून झालेल्या चुका सांगून ‘योग्य काय असायला हवे ?’, ते सांगणे.)
४ आ. एखाद्या जिल्ह्यातील सर्व साधकांचे व्यष्टी साधनेकडे दुर्लक्ष झाल्याचे लक्षात आल्यावर पूर्ण जिल्ह्यातील कार्य थांबवून तेथील साधकांना व्यष्टी साधनेकडे लक्ष देण्यास सांगणे : एखाद्या जिल्ह्यातील साधक ‘साधनेकडे लक्ष न देता केवळ कार्याच्या मागेच धावत आहेत’, असे परात्पर गुरु डॉक्टरांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्या जिल्ह्यातील कार्य पूर्णपणे थांबवले, उदा. कोल्हापूर जिल्हा. त्यांनी साधकांना सांगितले, ‘‘जोपर्यंत जिल्ह्यातील साधकांची व्यष्टी साधना चांगली चालू होत नाही, तोपर्यंत जिल्ह्यातील कार्य चालू होणार नाही.’’
४ इ. ‘साधकांकडून चुका होऊन त्यांच्या साधनेची हानी होऊ नये’, यासाठी सेवा थांबवणे : व्यष्टी साधनेकडे लक्ष न देता कार्य करत राहिल्यास साधकांमधील स्वभावदोष आणि अहं यांमुळे त्यांच्याकडून चुका होऊन त्यांचे पापकर्म वाढते. ‘तसे होऊ नये’, यासाठी परात्पर गुरुदेव त्यांचे कार्य थांबवून त्यांना साधनेकडे लक्ष देण्यास सांगत असत. व्यष्टी साधनेच्या अंतर्गत स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन केल्यामुळे सेवेतील चुका टळून साधनेची हानी थांबते अन् सेवा परिपूर्ण होते. आताही ‘कितीही मोठे उत्तरदायित्व असलेल्या साधकांचे साधनेकडे दुर्लक्ष होत आहे’, असे लक्षात आल्यास अन्य उत्तरदायी साधक त्याला सेवा थांबवून गोवा येथील सनातनच्या आश्रमात साधनेची घडी बसवण्यासाठी जायला सांगतात.
वरील सर्व उदाहरणांतून ‘परात्पर गुरु डॉक्टर कार्यापेक्षा साधकांची साधना होण्याला अधिक महत्त्व देतात. ‘त्यांना कार्यापेक्षा साधकांची साधना चांगली व्हावी’, हेच अपेक्षित आहे. त्यांचे पूर्ण लक्ष ‘साधकांच्या साधनातील अडथळे दूर होऊन तो लवकर लवकर पुढे जावा’, याकडेच असायचे’, हे लक्षात येते.’
(क्रमशः पुढच्या रविवारी)
– (सद्गुरु) राजेंद्र शिंदे, देवद आश्रम, पनवेल. (१६.१०.२०२३)
|