सोलापूर आणि बीड येथे सेवा करत असतांना अनुभवलेली गुरुकृपा अन् कालमहिमा !
‘मी प्रत्यक्ष प्रसार सेवा कधी केली नसतांना ‘बीड हिंदु राष्ट्र-जागृती सभे’च्या प्रसारापासून आतापर्यंत देवाने सनातन संस्थेच्या ११२ व्या (समष्टी) संत पू. दीपाली मतकर ताईंच्या माध्यमातून प्रसारात पुढाकार आणि दायित्व घेऊन सेवा करण्याची संधी दिली. त्यामुळे अनुभवता आलेली गुरुकृपा येथे दिली आहे.
१. गावाच्या उपसरपंचांनी आठवडाभर हिंदु राष्ट्र-जागृती सभेची उद्घोषणा मंदिरात लावल्यामुळे ती आसपासच्या २ ते ४ गावांमध्येही ऐकू गेल्याने सभेला अधिक जण येणे
बीड येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा प्रसार करतांना माझ्यावर असलेल्या पूज्य दीपाली मतकर ताईंच्या विश्वासामुळे मला पहिल्यांदाच एका ठिकाणचे दायित्व मिळाले. तेव्हा कांबी या गावात आम्ही सरपंचांना भेटायला गेल्यावर उपसरपंचही न बोलावता तिथे आले आणि त्यांनी गावातील ग्रामदेवतेच्या मंदिरात सभेच्या दिवसापर्यंत आठवडाभर सभेची उद्घोषणा ध्वनीक्षेपकावर (स्पिकर’वर) लावली. ती आसपासच्या २ – ४ गावांमध्येही ऐकू जात होती. त्यांनी आणि माजी उपसरपंचांनी मिळून गावात बैठका ठरवल्या आणि सभेला शाळेच्या बसमधून (‘स्कूलबस’मधून) जवळजवळ ५० जण आले. त्यातील बर्याच जणांनी चांगले अभिप्राय दिले. पुढे तिथे धर्मशिक्षणवर्ग चालू झाला.
२. धर्मशिक्षणवर्गातील सात्त्विक वातावरणामुळे व्यसन सोडण्याचा निश्चय एका धर्मप्रेमींनी कुटुंबियांसमोर करणे
कांबी गावात धर्मशिक्षणवर्ग चालू झाल्यावर वर्गातील विषय आणि वातावरण अनुभवल्यावर तेथील एका धर्मप्रेमींनी सांगितले, ‘‘आजपासून मी संकल्प करतो की, मी दारू पिणार नाही.’’ विशेष म्हणजे हा संकल्प त्यांनी वर्गात येणार्या त्यांच्या कुटुंबियांसमोर सांगितला.
३. गावातील महिलांनी धर्मशिक्षणवर्गामुळे आत्मविश्वास वाढल्याचे सांगणे
सोलापूर येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा प्रसार करत असतांना देवाच्या कृपेने एका गावातील एका कुटुंबाशी संपर्क झाला. त्यांना राष्ट्र अन् धर्म यांची आवड होती. आता त्या भागातील महिला तिथे धर्मशिक्षणवर्गात येतात. नामजप आणि साधना करून अनुभूतीही घेतात. त्यांच्या भागात एक अन्य धर्मीय कुटुंब रहाते. धर्मशिक्षणवर्गात विषय समजल्यावर त्यांनी अन्य धर्मियांकडून खाण्याचे पदार्थ घेणे बंद केले. हे समजल्यावर ती अन्य धर्मीय महिला गल्लीत शिवीगाळ करू लागली. तेव्हा वर्गातील सर्व महिलांनी एकत्रित येऊन तिला समजावले. त्या वेळी त्यांनी ‘आम्हाला धर्मशिक्षण वर्गामुळे हा आत्मविश्वास आला आहे’, असे सांगितले.
४. एका गावात गाडीची अडचण आल्यामुळे धर्माभिमान्यांना सभेला यायला न मिळणे; मात्र सभेनंतर धर्मशिक्षणवर्ग चालू झाल्यावर ४० ते ५० जण वर्गाला येऊ लागणे
सोलापूर येथील सभेच्या प्रसारावेळी धोत्री गावात पुष्कळ मोठी बैठक झाली; पण गाडीची व्यवस्था ऐनवेळी पालटली गेल्याने सर्वांना सभेला येता आले नाही. त्यानंतर धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याच्या दृष्टीने त्या गावात गेल्यावर वर्ग चालू झाला आणि देवाच्या कृपेने ४० ते ५० जण वर्गाला येऊ लागले. सभेनंतर कार्यशाळा झाली. तेव्हा सभेला यायला मिळाले नाही; म्हणून २० ते २५ जण कार्यशाळेला गाडी करून आले.
५. ‘हिंदू एकता दिंडी २०२३’ ची पोस्ट वाचून धर्मप्रेमीने त्याच्या वस्तीवर पुष्कळ भगवे झेंडे लावणे आणि त्याची समितीच्या कार्यकर्त्यांना भेटण्याची इच्छा देवाने पूर्ण करणे
‘हिंदू एकता दिंडी २०२३’ चा प्रसार करतांना महामार्गाच्या बाजूला एका वस्तीवर पुष्कळ भगवे झेंडे दिसले. तेव्हा ‘त्या वस्तीवर झेंडे लावणारा एखादा धर्मप्रेमीच असावा’, असा विचार गुरुकृपेने आला आणि त्या धर्मप्रेमींना शोधत आम्ही तेथे गेलो. तेव्हा ते धर्मप्रेमी आम्हाला भेटले. भेटल्यावर ते आम्हाला म्हणाले, ‘‘कालच आम्हाला दिंडीची ‘पोस्ट’ मिळाली. तेव्हा तुमच्या लोकांना भेटायची इच्छा होती. आज तुम्हीच आमच्या घरी आलात. माझ्या अंगावर शहारे आले. तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा, आम्ही तसे हिंदुत्वाचे कार्य करू.’’ तेव्हा तिथे धर्मशिक्षण वर्गासाठी बैठक झाली. त्या वेळी त्यांनी बैठकीची चांगली तयारी केली होती. सर्वजण दिंडीलासुद्धा आले.
६. एका धर्मशिक्षणवर्गाच्या ठिकाणी जाण्यासाठीचा रस्ता पुष्कळच खराब असून श्रीगुरूंच्या कृपेने त्या रस्त्याचे काम चालू झाल्याने कृतज्ञता वाटणे
एका ठिकाणी धर्मशिक्षणवर्ग चालू झाला. तिथे जाण्यासाठीचा रस्ता पुष्कळ खराब आणि खडकाळ होता. माझ्यासमवेत श्रीमती वीणा साखरे (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ५६ वर्षे) या वय अधिक असतांनासुद्धा तळमळीने आणि सातत्याने वर्ग घेण्याच्या सेवेसाठी यायच्या. वर्षानुवर्षे या रस्त्याचे काम झाले नव्हते; पण श्रीगुरूंच्या कृपेने त्या रस्त्याचे काम चालू झाले. तेव्हा ‘देवाने आपल्यासाठी किती केले !’, असे वाटून आम्हाला पुष्कळ कृतज्ञता वाटली.
७. एका गावातील धर्मप्रेमींना भेटल्यानंतर त्यांना पुष्कळ आनंद होणे आणि ते नामजपही करू लागणे
‘हिंदू एकता दिंडी २०२३’ चा प्रसार करतांना उळेवाडी या गावात नव्याने गेलो असतांना ‘त्या गावात ५० टक्के अन्य धर्मीय आहेत’, असे लक्षात आले. तेथील हिंदूंना भेटल्यावर त्यांना पुष्कळ आनंद झाला. त्यांनी आम्हाला सांगितले, ‘तुम्ही केवळ दिशा द्या, आम्ही तसे करतो.’ तेव्हा त्या गावात धर्मशिक्षणवर्गाच्या बैठकासुद्धा चालू झाल्या. गुरुदेवांच्या कृपेने त्या गावातील धर्मप्रेमी आता नामजप करू लागले आहेत आणि दिंडीलासुद्धा आले होते.
८. दैनिक ‘सनातन प्रभात’मधून सिद्ध असणारे साधकच मिळणे
‘बीड हिंदूसंघटन मेळावा २०२३’ ची सेवा करतांना गुरुदेवांनी दैनिक ‘सनातन प्रभात’चा महिमा लक्षात आणून दिला. याविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.
अ. ‘हिंदूसंघटन मेळाव्या’ला वाचकांची संख्या भरपूर होती आणि त्यांनी दिलेले अभिप्रायसुद्धा भरपूर होते. मेळाव्यानंतर ३ वाचकांनी स्वतः धर्मशिक्षणवर्ग चालू करण्यासाठी बैठकांचे आयोजन केले.
आ. एक वाचक आपल्या भागातील जिज्ञासूंना ‘हिंदूसंघटन मेळाव्या’ला उपस्थित रहाण्यासाठी स्वतः घेऊन आले आणि नंतर त्यांची भेट घालून दिली.
इ. एका वाचकांनी आम्ही त्यांना न विचारताच एक वेळच्या महाप्रसादाची आपुलकीने व्यवस्था केली.
ई. ‘बीड हिंदूसंघटन मेळाव्या’ला आलेल्यांपैकी अभिप्राय लिहून दिलेल्यांना संपर्क करतांना एका वाचकांना भेटल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘मी दैनिक ‘सनातन प्रभात’ नियमित वाचतो. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याविषयी दिलेलेही वाचतो. ब्रह्मोत्सवाचा साप्ताहिक मी कुणाला दिलेला नाही. माझ्याकडे जपून ठेवला आहे. मला रामनाथी आश्रम बघायची इच्छा आहे.’’
उ. आणखी एका सैनिक असणार्या वाचकांना भेटल्यावर ते कुलदेवता आणि दत्त यांचा नामजप केल्यानंतर आलेली अनुभूती सांगत असतांना त्यांचा भाव जागृत झाला. हे पाहून मला कृतज्ञता वाटली, ‘एका सैनिकामध्येसुद्धा भाव निर्माण करणारे गुरुदेव आहेत.’ बगलामुखी स्तोत्राचे महत्त्व सांगितल्यावर त्यांनी लगेच ते विचारून घेऊन ऐकायला आरंभ केला.’
– श्री. विपुल भोपळे, सोलापूर. (२५.७.२०२३)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |