नागपूर येथे रश्मी बर्वे यांच्याऐवजी त्यांचे पती श्यामकुमार बर्वे काँग्रेसचे उमेदवार !

श्यामकुमार बर्वे यांच्याकडे सव्वा ४ कोटी रुपयांची संपत्ती !

नागपूर – रामटेक लोकसभा मतदारसंघातून पारशिवनी तालुक्यातील कन्हान कांद्री येथील श्यामकुमार बर्वे यांनी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज प्रविष्ट केला. ४६ वर्षीय बर्वे यांनी स्वत:च्या उत्पन्नाचा स्रोत शेती आणि शेतीपूरक व्यवसाय असा दाखवला आहे. यातून वर्षाला ११ लाख रुपयांहून अधिक उत्पन्न मिळणार्‍या बर्वे यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती सव्वाचार कोटी रुपयांहून अधिक आहे.

अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचे जातवैधता प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज रहित करण्यात आला. त्यांच्या जागेवर आता त्यांचे पती श्यामकुमार बर्वे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बर्वे यांचे वर्ष २०२२-२३ चे वार्षिक उत्पन्न ११ लाख ८ सहस्र ८०० रुपये आहे. त्यांच्याकडे एकूण संपत्ती ४ कोटी २८ लाख ९४ सहस्र ९५२ रुपये घरात असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले. फेसबूक, इन्स्टाग्राम यांवर सक्रीय असणार्‍या श्यामकुमार बर्वे यांचे शिक्षण बी.ए. द्वितीय वर्ष आहे.