पुणे येथील ‘रोझरी स्कूल’चे संचालक विनय अरहाना यांसह दोघे अटकेत !
‘सेवा विकास बँके’तील कोट्यवधी रुपयांचे कर्ज अपव्यवहार प्रकरण !
पुणे – येथील ‘सेवा विकास बँके’तील कोट्यवधी रुपयांच्या कर्ज अपव्यवहार प्रकरणात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (‘सीआयडी’) ‘रोझरी एज्युकेशन ग्रुप’चे संचालक विनय अरहाना यांच्यासह अधिवक्ता सागर सूर्यवंशी यांना अटक केली आहे. सीआयडीच्या पथकाने कर्ज अपव्यवहार प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाकडून (‘ईडी’कडून) दोघांना कह्यात घेतले. दोघांना मध्यरात्री शिवाजीनगर येथील विशेष न्यायालयात उपस्थित करण्यात आले.
अरहाना यांना आर्थिक अपव्यवहार प्रकरणात ईडीकडून अटक करण्यात आली होती. सेवा विकास बँकेतील कर्ज अपव्यवहार प्रकरणाची चौकशी सीआयडीच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. अरहाना यांच्याविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे नोंद आहेत. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करून गुन्हे रहित करण्याची मागणी केली होती. उच्च न्यायालयाने गुन्हे रहित करून त्यांना दिलासा दिला होता; मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर सीआयडीला अन्वेषणासाठी अनुमती देण्यात आली होती. सीआयडीच्या पथकाने अरहाना आणि अधिवक्ता सूर्यवंशी यांची चौकशी करून त्यांना अटक केली आहे. विनय अरहाना यांनी ललित पाटील याला ससूनमधून पसार होण्यासाठी साहाय्य केल्याचे उघड झाले होते.