कर्णकर्कश ‘डीजे’ला प्रतिबंधित करा !
चिपळूण येथील माजी उपनगराध्यक्ष बापू काणे यांची पोलिसांकडे निवेदनाद्वारे मागणी
चिपळूण – शहर परिसरात काही ठिकाणी ध्वनीक्षेपक लावले जातात. या ध्वनीक्षेपकाचा आवाज ठराविक डेसिबल्सपर्यंत सहन करता येऊ शकतो; परंतु सध्या सर्वत्रच ‘डीजे’ नामक ध्वनीक्षेपकाद्वारे अत्यंत कर्णकर्कश आवाज ऐकू येत आहेत. त्याचे नागरिकांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होत आहेत. त्यामुळे कर्णकर्कश डीजेला प्रतिबंधित करा, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते, माजी उपनगराध्यक्ष श्री. बापू काणे यांनी येथील पोलिसांकडे केली आहे.
यासंदर्भात श्री. काणे यांनी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने आणि पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्याशी चर्चाही केली.
पोलिसांना दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे की,
१. कर्णकर्कश आवाजाच्या डीजेसाठी आपल्या खात्याची रितसर अनुमती घेतली जाते का ? अनुमती दिली असल्यास या तीव्र स्वरूपाच्या आवाजावर कुणाचेही नियंत्रण आहे, असे दिसत नाही.
२. डिजे लावणारे दिवसा तो लावतातच, तसेच रात्री-अपरात्रीही हा त्रासदायक आवाज नागरिक, प्राणी आणि पक्षी यांना सहन होण्याच्या पलीकडचा असतो.
३. सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे, तरीही सर्व कायदे, नियम न पाळता हे प्रकार चालू ठेवले जातात.
४. या आवाजाने वृद्ध, आजारी मंडळी, लहान बालके यांच्या प्रकृतीवर विपरित परिणाम तर होतोच; परंतु सर्वच वयातील मंडळींना त्रास होतो. त्यामुळे काही अघटित दुर्दैवी प्रकारही घडले आहेत.
५. पोलीस खात्याकडून या बेकायदेशीर त्रासापासून सर्वसामान्य जनतेला मुक्ती देणे आवश्यक आहे. आपण ही कार्यवाही करून सर्वसामान्यांना योग्य तो दिलासा द्याल, अशी अपेक्षा आहे.
संपादकीय भूमिकाअशी मागणी का करावी लागते ? बहिर्या माणसांनाही ऐकू जातील, असे आवाज पोलिसांना ऐकू येत नाही, असे समजायचे का ? |