मंदिरांच्या जत्रा, उत्सव यांमध्ये हिंदूंखेरीज इतरांना दुकाने लावण्यास अनुमती देऊ नका !

‘कर्नाटक देवस्थान-मठ आणि धार्मिक संस्था महासंघा’ची बेंगळुरू जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतांना ‘कर्नाटक देवस्थान-मठ आणि धार्मिक संस्था महासंघा’चे श्री. मोहन गौडा, अधिवक्ता प्रसन्न डी.पी. आणि श्री. राघवेंद्राचार

बेंगळुरू (कर्नाटक) – देवस्थानचे पावित्र्य राखण्यासाठी देवस्थानाच्या परिसरात कोणत्याही कारणांनी हिंदूंखेरीज इतरांना, तसेच नास्तिकांना दुकाने लावण्यास अनुमती नाकारून ‘कर्नाटक हिंदु धार्मिक संस्था आणि धर्मादाय अधिनियम १९९७’ची काटेकोरपणे कार्यवाही व्हावी, असे निवेदन ‘कर्नाटक देवस्थान-मठ आणि धार्मिक संस्था महासंघा’च्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. या वेळी महासंघाचे राज्य संयोजक श्री. मोहन गौडा, अधिवक्ता प्रसन्न डी. पी., श्री. राधवेंद्राचार, श्री. श्यामसुंदर, अर्चक श्री. एम्. भागवत, हिंदु जनजागृती समितीचे श्री. नीलेश्‍वर बी.एम्. आणि इतर उपस्थित होते.

श्री. मोहन गौडा म्हणाले की,

१. मार्च आणि एप्रिल या मासांमध्ये सर्व देवस्थानांच्या धार्मिक जत्रांना प्रारंभ होतो. या वार्षिक जत्रांना लाखो भक्त उपस्थित रहातात. अशा वेळी कोट्यवधी रुपयांचा व्यापार होतो. याचा दुरुपयोग करून अन्य धर्मीय, तसेच देवावर श्रद्धा नसलेले नास्तिक देवस्थानाच्या प्रांगणात आणि परिसरात देवस्थानाच्या पावित्र्याला धक्का लावून व्यापार करत असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे देवस्थानाचे सात्त्विक वातावरण नष्ट होते.

२. ‘कर्नाटक हिंदु धार्मिक संस्था आणि धर्मादाय अधिनियम १९९७’ या कायद्याच्या कलम २९ (८), (१२) प्रमाणे ‘हिंदु देवस्थानाच्या जवळची भूमी आणि इमारत यांसह कोणतीही जागा हिंदूंखेरीज इतरांना देऊ नये’, असा स्पष्ट उल्लेख आहे.

३. बेंगळुरूसह अनेक जिल्ह्यांमध्ये हिंदु देवस्थानाची जागा अवैधरित्या लाटून तिथे अन्य धर्मियांनी पावित्र्य हनन करणारी दुकाने थाटली असल्याचे अनेक ठिकाणी लक्षात आले आहे. धर्मादाय खात्याच्या अधिकार्‍यांनी देवस्थानाच्या जागेच्या संरक्षणासाठी कोणतीही कारवाई केल्याचे दिसत नाही. त्यामुळे अधिकार्‍यांची दायित्वशून्य वृत्ती स्पष्ट दिसून येते. आता तरी खात्याने जागे होऊन त्याच्या अंतर्गत येणार्‍या देवस्थानांच्या जागेत धर्मादाय कायद्याच्या विरोधात हिंदूंखेरीज इतरांनी दुकाने थाटली, तर ती तत्परतेने रिकामी केली पाहिजेत.

४. तात्पुरती दुकाने थाटण्याची अनुमती हिंदूंखेरीज इतरांना देऊ नये. एवढेच नव्हे, तर ‘देवस्थानाच्या वार्षिक जत्रेत हिंदूंखेरीज इतरांना, तसेच हिंदूंच्या श्रद्धांचा अवमान करणार्‍यांना दुकाने लावण्याची संधी देण्यात येऊ नये’, असा विशेष आदेश काढण्यात यावा.