परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अखंड कृपा अनुभवणार्या आणि स्वतःच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चरणी अनन्यभावे कृतज्ञता व्यक्त करणार्या नवी मुंबई येथील श्रीमती ललिता गोडबोले !
प.पू. गुरुदेव,
माझ्या ७५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने जीवनात मागे वळून बघतांना आपण केलेल्या अखंड कृपेच्या जाणिवेने माझे मन कृतज्ञतेने भरून आले आहे.
१. सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यावर विविध सेवा करणे आणि प.पू. गुरुदेवांच्या कृपेने स्वतःमधील स्वभावदोषांची जाणीव होऊन त्यांवर मात करता येऊन गुण आत्मसात् करता येणे
(कै.) सौ. सुरेखा केणी (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) यांनी माझा तुमच्याशी आणि सनातन संस्थेशी परिचय करून दिला. आपण मला साधनेविषयी मार्गदर्शन केले. आपल्या कृपेने मला विविध सेवा करता आल्या. तुमच्या कृपेने मला ‘ललिता’ नावाचा जीव सेवा करण्याचे एक माध्यम आहे’, याची जाणीव झाली. तुमच्याच कृपेने मला स्वतःमधील स्वभावदोषांची जाणीव होऊन त्यांवर मात करता आली आणि गुण आत्मसात् करता आले.
२. संस्कृत भाषेतील मंत्रांचे इंग्रजी भाषेत भाषांतर करतांना गुरुपूजनाचा खरा अर्थ समजणे
वर्ष २००१ च्या गुरुपौर्णिमा महोत्सवात आपल्या कृपेने मला पूजेचे पौरोहित्य करण्याची सेवा मिळाली. कुलाबा, मुंबई येथील ‘बधवार पार्क’ या भागात इंग्रजी भाषिक साधकांसाठी प्रथमच इंग्रजी गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. माझ्या गृहस्थजीवनाचा आरंभ याच भागात झाला असल्याने तेथे साधना म्हणून ही सेवा करायची संधी मिळणे, हे माझ्यासाठी विशेष होते. या महोत्सवात इंग्रजी भाषिक साधकांना समजण्यासाठी मला पूजाविधी इंग्रजी भाषेत सांगायचा होता. मला संस्कृत भाषेतील मंत्रांचे इंग्रजी भाषेत भाषांतर करावे लागले आणि असे करतांना मला गुरुपूजनाचा खरा अर्थ समजला. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘एखादी पूजा हे कर्मकांड नसून नितांत आदर अन् श्रद्धा व्यक्त करण्यासाठी केलेले उपचार आहेत.’ यापूर्वी मी यांत्रिकपणे पूजाविधीत सहभागी होत असे; मात्र या प्रसंगातून ‘पूजा कुठेही असो, त्याचा आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घ्यायला हवा’, हे माझ्या लक्षात आले.
३. सत्संग घेण्याची सेवा करता येणे
३ अ. सत्संग घेण्याच्या निमित्ताने तन, मन आणि धन यांचा त्याग होणे : मी ज्या सदनिकेत रहात होते, तेथे आपल्याच कृपेने मला सत्संग आयोजित करण्याची सेवा करता आली. माझ्याजवळ धन नसतांना आणि सदनिकेची मालकी नसतांनाही सत्संग घेण्याच्या निमित्ताने मला तन अन् मन यांचा त्याग करता आला.
३ आ. सत्संग घेण्याची क्षमता आणि लोकांसमोर बोलण्याची सवय नसतांनाही परम पूज्यांच्या कृपेने सनातनच्या ग्रंथांचा अभ्यास करून सत्संगांत विषय मांडता येणे : आपल्या कृपेने मला ‘साधना’ या विषयावरील तात्त्विक आणि प्रायोगिक भाग घेण्याची संधी मिळाली. प्रत्यक्षात ते माझ्या कल्पनेच्या पलीकडचे होते; कारण माझ्यात सत्संग घेण्याची क्षमता नाही आणि मला लोकांसमोर बोलण्याची सवय नव्हती. आपल्या कृपेने मला सनातनच्या ग्रंथांचा अभ्यास करून सत्संगांत विषय मांडता आला.
४. कोलकाता येथे अध्यात्मप्रचारासाठी जाणे
४ अ. कोलकाता येथे लोकांना देवतांच्या विडंबनाविषयी जागृत करण्याची सेवा करतांना उत्तम प्रतिसाद मिळणे आणि ‘सर्व प्रसंगांचे नियोजन आणि त्याची पूर्तता करणारे परम पूज्यच आहेत’, याची प्रचीती येणे : आपल्या कृपेने मला श्रीमती स्मिता नवलकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ७२ वर्षे) यांच्या समवेत प्रचारसेवा करण्याची संधी मिळाली आणि मी ‘अनपेक्षित प्रसंगांना सामोरे कसे जायचे ?’, हे शिकले. ही सेवा करतांना ‘सर्व प्रसंगांचे नियोजन आणि त्याची पूर्तता करणारे तुम्हीच आहात’, याची मला प्रचीती आली. वर्ष २००३ आणि २००४ मधे मी आणि स्मिताताई कोलकाता येथे अध्यात्म प्रचारासाठी गेलो होतो. आमचा हा प्रचारदौरा ४ दिवसांचा होता. माझ्या यजमानांनी (कै. जयंत गोडबोले यांनी) आम्हाला काही जणांचे संपर्क दिले होते. त्यानुसार आम्ही संबंधितांना भेटून ‘विवाहाच्या निमंत्रण पत्रिकेवर श्री गणेश आणि अन्य देवता यांची चित्रे छापली जातात. विवाहानंतर त्या पत्रिका इतरत्र किंवा कचर्याच्या टोपलीत टाकल्यामुळे अनावधानाने देवतांचे विडंबन होते. त्याचप्रमाणे ‘भिंतींचा अपवापर होऊ नये, यासाठी त्यावर देवतांची चित्रे रंगवणे कसे अयोग्य आहे ?’, याविषयी सांगत होतो. त्या वेळी आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळत होता.
४ आ. कोलकाता येथील प्रसिद्ध उद्योजक श्री. जी.पी. गोयंका यांच्याशी झालेली भेट
४ आ १. श्री. गोयंका यांच्याकडे गेल्यावर त्यांनी एम्.एफ्. हुसेन यांनी काढलेली चित्रे आणि त्यातून होणार्या देवतांच्या विडंबनाविषयी अवगत करणे, त्यांनी ‘याच्या विरोधात लढा देणार का ?’, असे विचारणे : माझे यजमान वारंवार आम्हाला कोलकाता येथील नामवंत उद्योजक श्री. जी.पी. गोयंका यांना भेटण्याविषयी सुचवत होते; पण माझ्या मनात ‘प्रसिद्ध उद्योजक केवळ लाभाचा आणि धनाचा विचार करतात, तसेच त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी त्यांचे कर्मचारीही अडथळा आणतात’, अशा प्रकारचे पूर्वग्रह असल्यामुळे मी त्यांना भेटण्यासाठी फारशी उत्सुक नव्हते. आम्ही कोलकाता येथून निघायच्या दिवशी श्री. गोयंका यांना भेटायची वेळ ठरवली आणि मधले सर्व अडथळे पार करून आम्ही त्यांच्यापर्यंत पोचलो. त्या वेळी श्री. गोयंका हनुमानाच्या मूर्तीसमोर बसून नामजप करत होते. आम्ही त्यांना सनातनचे कार्य सांगून देवतांच्या विडंबनाविषयी सूत्र सांगताच ते म्हणाले, ‘‘हे सूत्र मला ठाऊक आहे; कारण माझ्याकडे दोन पेट्या भरून विवाहपत्रिका आहेत. ‘त्यांचे काय करायचे ?’, हे आपणच मला सुचवा.’’ त्यानंतर त्यांनी अाम्हाला एम्.एफ्. हुसेन यांनी काढलेली चित्रे आणि त्यातून होणार्या देवतांच्या विडंबनाविषयी अवगत केले. त्यांनी आम्हाला विचारले, ‘‘तुम्ही देवतांच्या लहान प्रमाणात होणार्या विडंबनाविषयी बोलता; मात्र हुसेन यांच्या चित्रातून मोठ्या प्रमाणात होणार्या देवतांच्या विडंबनाविरुद्ध तुम्ही लढा द्यायला सिद्ध आहात का ?’’ त्यांचे बोलणे ऐकून मी काही बोलू शकले नाही; मात्र स्मिताताईंनी ‘आम्ही हा लढा देण्यास सिद्ध आहोत’, असे सांगितले. श्री. गोयंका यांनी आम्हाला हुसेन यांच्या चित्राचे एक लहान पुस्तक आणि अन्य साहित्य दाखवले. या भेटीत हुसेन यांच्या देवतांचे विडंबन करणार्या चित्रांना सनदशीर मार्गाने विरोध करण्यासाठीचा पाया घातला गेला. गुरुदेवा, हे सर्व आपलेच नियोजन होते. तुम्ही आम्हाला गोडबोले यांच्या माध्यमातून पुनःपुन्हा गोयंका यांना भेटण्याविषयी सुचवून आमच्या माध्यमातून हे कार्य करून घेतले.
४ आ २. यानंतर अन्य समविचारी संस्थांच्या साहाय्याने हुसेन यांनी काढलेल्या देवतांचे विडंबन करणार्या चित्रांवर बंदी आणण्याच्या दृष्टीने सनदशीर मार्गाने लढा दिला आणि त्याला अभूतपूर्व यश मिळाले. चित्रकार हुसेन यांना देश सोडून जावे लागले.
५. ‘स्वतःच्या विचारांवर ठाम रहाणे’ आणि ‘निष्कर्ष काढणे’, हे प्रबळ स्वभावदोष साधनेमुळे उणावणे आणि इतरांचे बोलणे मनापासून स्वीकारता येऊ लागणे
५ अ. साधनेमुळे ‘सासू’ आणि ‘आजी’ ही नाती निभावता येणे : परम पूज्य, आपल्याला ‘परात्पर गुरु डॉ. आठवले’ या नावाने संबोधायचे आहे’, हे मला ठाऊक आहे; मात्र मला आपल्याला ‘परम पूज्य’ म्हणणे अधिक भावते. माझ्या कौटुंबिक जीवनातील कठीण काळ चालू असतांना मी सनातन संस्थेच्या, पर्यायाने आपल्या संपर्कात आले. त्या वेळी मी ‘सासू’ आणि ‘आजी’ या भूमिका पार पाडत होते. ‘नवीन भूमिका निभावणे’, हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील कठीण काळ असतो. ती तारेवरची कसरत असते; मात्र साधनेमुळे माझा हा काळ सुसह्य झाला. माझ्यात ‘स्वतःच्या विचारांवर ठाम रहाणे’ आणि ‘निष्कर्ष काढणे’, हे प्रबळ स्वभावदोष होते. साधनेमुळे मला इतरांचे बोलणे मनापासून स्वीकारता येऊ लागले.
५ आ. एका प्रसंगात स्थिर रहाता आल्यावर गुरुदेवांच्या कृपेची आलेली अनुभूती : वर्ष २००५ मधे भूतकाळातील काही प्रसंगांमुळे कुटुंबातील एका व्यक्तीविषयी माझ्या मनात नकारात्मकता आणि राग होता. माझ्या यजमानांचे त्या व्यक्तीविषयी चांगले मत असल्याने यजमानांनी तिला वाढदिवसानिमित्त भेटवस्तू देण्याचे ठरवले. त्या व्यक्तीने ती भेटवस्तू नाकारल्यामुळे मला पुष्कळ राग आला. दुसर्या दिवशी यजमानांनी त्या व्यक्तीला समजावून सांगितल्यामुळे तिने ती भेटवस्तू स्वीकारली. यजमानांनी मला हा प्रसंग सांगितल्यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न करता मी त्यांना म्हणाले, ‘‘ठीक आहे. मला त्याविषयी काही आवड-नावड नाही.’’ त्या क्षणी मला जाणवले, ‘माझ्याभोवती असलेले स्थूल जग नाहीसे झाले आणि मी एका शुभ्र ढगाने वेढले गेले. मी लहान मुलगी झाले आहे. तो शुभ्र ढग मला म्हणाला, ‘तू या स्थितीत असलेले मला आवडते.’ त्या वेळी गुरुदेवांनी मला प्रीतीपूर्वक स्वीकारले आहे.’
६. गुरुदेवांनी सांगितल्यानुसार ‘या जन्मातील माझी साधना प्रारब्धभोग संपवण्यासाठी, तसेच या आणि पुढच्या जन्मी परम पूज्यांचे चरण घट्ट धरण्यासाठी शक्ती मिळवण्यासाठी आहे’, याची जाणीव होणे
गुरुदेव, वर्ष २००० पासून माझ्या कौटुंबिक जीवनात पुष्कळ अडचणी आल्या. माझे आई-वडील, यजमान, मुलगा यांचे निधन झाले. सप्टेंबर २०१२ मधे मला ‘कर्करोग झाला असून तो तिसर्या टप्प्यातील आहे’, असे समजले. तुमच्या कृपेने मी त्यातूनही बाहेर आले. वर्ष २०१३ मधे माझे कर्करोगासंबंधीचे शस्त्रकर्म झाल्यानंतर मी तुम्हाला कृतज्ञतापूर्वक पत्र लिहून एका साधकाच्या माध्यमातून पाठवले. त्या वेळी तुम्ही मला निरोप दिला, ‘‘तुम्हाला आलेल्या अनुभूती फारच छान आहेत. हा जन्म तुमचा प्रारब्धभोग संपवण्यासाठी आहे. पुढच्या जन्मात तुमची आध्यात्मिक उन्नती शीघ्रतेने होणार आहे.’’ तेव्हापासून मी लक्षात ठेवले आहे की, ‘या जन्मातील माझी साधना प्रारब्धभोग संपवण्यासाठी, तसेच या आणि पुढच्या जन्मी परम पूज्यांचे चरण घट्ट धरण्यासाठी शक्ती मिळवण्यासाठी आहे. आध्यात्मिक उन्नती आणि मोक्ष मला पुढच्या जन्मातच मिळणार आहे.’ या गोष्टीला दहा वर्षे होऊन गेली. ‘माझे प्रारब्ध किती तीव्र आहे’, हेच यातून स्पष्ट होते.
७. स्वतःत जाणवलेले पालट
आपणच माझ्यातील उणिवा (स्वभावदोष) नष्ट करण्यासाठी प्रयत्नशील असता. सध्या मी अनाथ लहान मुले आणि तरुण मुली यांच्यासाठी काम करत आहे. माझ्यातील संयम आणि स्वीकारण्याची वृत्ती वाढली आहे. मला ही सर्व अनाथ मुले माझीच वाटतात. त्यांना दत्तक देण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मला समाधान वाटते; मात्र माझा त्यात अडकण्याचा भाग होत नाही. मला अंतर्मनातून ‘या सर्व कार्यात आपण केवळ माध्यम आहोत’, ही जाणीव असते. माझ्यात अजूनही पुष्कळ स्वभावदोष आहेत; मात्र गेल्या २४ वर्षांत ‘स्वतःत पुष्कळ पालट झाले आहेत’, असे मला वाटते.
८. कृतज्ञता आणि प्रार्थना
प.पू. गुरुदेव, आपल्याच कृपेने मी जीवनाची ७५ वर्षे पूर्ण करू शकले. माझा हा जीवनप्रवास श्री गुरूंच्या दिशेने होता. आज माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी जीवनाची ७५ वर्षे आपल्या चरणी अर्पण करते. आपणच माझ्या जीवनाचे रचियते आहात. ‘इदं न मम ।’- (अर्थ : हे माझे नाही.)
गुरुदेवा, या जन्मात आणि पुढील सर्व जन्मांत आपली माझ्यावर अखंड कृपा रहावी. मला सत्-चित्-आनंद प्राप्त करायचा आहे, जे केवळ गुरुकृपेमुळे शक्य आहे. ‘गुरुकृपा’ हा ‘योग’ बनेपर्यंत मला आपल्या चरणांशी ठेवून अखंडपणे मार्गदर्शन करत रहावे’, अशी मी आपल्या पावन चरणी आर्त प्रार्थना करते.’
– श्रीमती ललिता जयंत गोडबोले, नवी मुंबई (७.१.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |