Goa Drug Racket Harmal : हरमल येथून १ कोटी ६९ लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ कह्यात घेतले
गोवा पोलिसांकडून अमली पदार्थांच्या विरोधात मोठी कारवाई !
पणजी, २८ मार्च (वार्ता.) : गोवा पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने मधलावाडा, हरमल येथे भाडेपट्टीवर असलेल्या एका जागेवर धाड घालून रशियाचा नागरिक ईवजीनी मोर्काेव्हीन (वय ३३ वर्षे) याला कह्यात घेतले आहे. संशयित ईवजीनी मोर्काेव्हीन हा ‘सिलोसायबीन मशरूम’ (मॅजिक मशरूम) याची लागवड आणि विक्री करत असे. अमली पदार्थविरोधी पथकाने मोर्काेव्हीनकडून २१८ ग्रॅम ‘सिलोसायबीन मशरूम’, ७.९ किलो ‘मशरूम बड्स’, २ किलो गांजा आणि १५० ‘सिलोसायबीन मशरूम’च्या बिया असे एकूण १ कोटी ६९ लाख ४७ सहस्र रुपये किमतीचे अमली पदार्थ कह्यात घेतले आहे.
(सौजन्य : Prudent Media Goa)
अमली पदार्थविरोधी पथकाने धाड घातल्यावर त्यांना संशयिताने काचेच्या अनेक बरण्यांमध्ये ‘सिलोसायबीन मशरूम’ची लागवड केल्याचे लक्षात आले. पथकाने या धाडीच्यावेळी ‘मशरूम’च्या लागवडीसाठी वापरण्यात आलेले सर्व साहित्य कह्यात घेतले. हल्लीच्या काळात ‘एन्.डी.पी.एस्.’ कायद्यानुसार बंदी असलेले ‘मॅजिक मशरूम’ किंवा ‘श्रूम्स’ यांच्या पसंतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. विशेषत: युवावर्ग या अमली पदार्थाकडे आकर्षित होत आहे.
काय आहे ‘सिलोसायबीन मशरूम’ ?‘सिलोसायबीन मशरूम’ हे ‘मॅजिक मशरूम’ म्हणूनही ओळखले जाते. याच्या सेवनामुळे व्यक्ती भ्रमिष्ट होऊन ती वेळ आणि जागा यांची जाणीव गमावते, तसेच हृदयाची गती वाढणे किंवा मळमळ आदी शारीरिक परिणाम दिसून येतात. |