पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ ५६ टी.एम्.सी. पाणीसाठा !
- २ महिने पुरेल एवढे पाणी
- पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन
पुणे – जिल्ह्यातील २६ धरणांमध्ये मिळून २७ मार्च या दिवसापर्यंत ५६.३९ टी.एम्.सी. एवढा उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा केवळ २ महिने पुरेल इतकाच आहे. सध्याच्या उपयुक्त पाणीसाठ्याचे हे प्रमाण एकूण साठ्याच्या तुलनेत केवळ २८.३९ टक्के इतके अल्प आहे. गेल्या वर्षी हेच प्रमाण ३८.८५ टक्के होते. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पुरंदर तालुक्यातील नाझरे धरण कोरडे पडले असून उजनीतील उपयुक्त साठा शून्याच्या खाली गेला आहे. उजनी धरणातील अचल (मृतसाठा) साठ्यातील १९.११ टी.एम्.सी. पाणी वापरलेसुद्धा आहे. जिल्ह्यामध्ये एकूण ३२ धरणे आहेत. त्यातील ‘टाटा समूहा’तील ६ धरणांमधील पाणीसाठा वेगळा आहे.
जिल्ह्यातील २६ धरणांमध्ये उजनी, भामा आसखेड, माणिकडोह, चासकमान, पवना, मुळशी, टेमघर, वरसगाव, पानशेत, गुंजवणी, नीरा देवधर, भाटघर, वीर आदी प्रमुख धरणांचा समावेश आहे.
‘टाटा समुहा’तील धरणांमध्ये २१.९० टी.एम्.सी. पाणीसाठा !
‘टाटा उद्योग समुहा’च्या धरणांमध्ये मुळशी, ठोकळवाडी, शिरोटा, वळवण, लोणावळा आणि कुंडली यांचा समावेश आहे. या ६ धरणांची पाणीसाठवण क्षमता ४२.७६ टी.एम्.सी. एवढी आहे. सध्या २१.९० टी.एम्.सी. (५१.२१ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.