पुणे जिल्ह्यातील सिंहगडाच्या जंगलामध्ये वणव्यांचे प्रमाण वाढले
समाजकंटकांकडून मुद्दाम वणवे पेटवण्याचा प्रयत्न
पुणे – घनदाट झाडी आणि झुडुपांचे वरदान लाभलेल्या सिंहगडाच्या परिसरातील जंगलामध्ये मुद्दाम वणवे (आग) लावण्यात येत आहेत. सिंहगडाच्या परिसरामध्ये प्रतिदिन कोठे ना कोठे वणवे पेटवले जात आहेत. हे वणवे आटोक्यात आणण्यासाठी वन विभागातील कर्मचार्यांसह सुरक्षारक्षकांना जीव धोक्यात घालून धावाधाव करावी लागत आहे. २५ मार्च या दिवशी दुरुपदरा, चांदेवाडी, घेरा सिंहगड अशा ३ ठिकाणी आगी लावण्यात आल्याचे निर्दशनास आले.
सिंहगड परिसरातील डोणजे, अतकरवाडी, खानापूर, मणेरवाडी, घेरा सिंहगड यांसह पानशेतपर्यंतच्या जंगलातील वनसंपदा मोठ्या प्रमाणात या वणव्यांमुळे नष्ट होत आहे. जंगलाच्या सभोवताली जाळरेषा काढूनही समाजकंटक जंगलाच्या मध्यभागी जाऊन आग लावून पळून जात आहेत. त्यामुळे वन विभाग हतबल झाला आहे. वनसंपदेचे रक्षण करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी साहाय्य करावे, असे आवाहन वन विभागाने केले आहे.
माहिती देणार्याला ५ सहस्र रुपयांचे पारितोषिक
जंगलाच्या मध्यभागी किंवा इतरत्र आग लावण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वणवे (आग) लावणार्या समाजकंटकांची नावे किंवा माहिती देणार्याला ५ सहस्र रुपयांचे पारितोषिक वन विभागाकडून घोषित करण्यात आले आहे. माहिती देणार्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, तसेच ही माहिती ‘हॅलो फॉरेस्ट’च्या हेल्पलाईन क्र. १९२६ द्यावी.
संपादकीय भूमिका :वणवा लावणार्या अशा विकृत प्रवृत्तींना कठोर शिक्षा होणे आवश्यक ! |