दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : नैराश्यातून १४ वर्षांच्या मुलीची घरी आत्महत्या !; गडचिरोली येथे चकमकीत नक्षलवादी पळून गेले !…
नैराश्यातून १४ वर्षांच्या मुलीची घरी आत्महत्या !
मुंबई – मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्याने नैराश्यातून १४ वर्षांच्या मुलीने रहात्या घरी आत्महत्या केली. मालाड परिसरात ही घटना घडली. घरात कुणीही नसतांना तिने लोखंडी सळीला गळफास लावून घेतला.
संपादकीय भूमिकानिराशेवर मात कशी करावी ? हे सध्याच्या पिढीला शिकवण्याची वेळ आली आहे ! |
गडचिरोली येथे चकमकीत नक्षलवादी पळून गेले !
गडचिरोली – छत्तीसगड सीमेवरील कांकेरच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात २७ मार्चच्या रात्री चकमक उडाली. पोलिसांनी चोख प्रत्युत्तर दिल्यामुळे नक्षलवादी अंधाराचा अपलाभ घेत पळून गेले. पोलिसांनी मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य जप्त केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातपात घडवून आणण्याचे नक्षलवाद्यांचे षड्यंत्र होते.
संपादकीय भूमिकानक्षलवाद समूळ नष्ट होण्यासाठी सरकार कोणती पावले उचलणार ? |
शिक्षणापेक्षा ३०० विद्यार्थिनींची पाण्यासाठी पायपीट !
जव्हार (जिल्हा पालघर) – येथील आदिवासी आणि दुर्गम भागांतील ३०० विद्यार्थिनींसाठी गोरठण गावात सुसज्ज इमारत बांधून निवासी शिक्षणाची सोय करण्यात आली; मात्र येथे पाण्याची सुविधा नसल्याने भर उन्हात पाण्यासाठी जावे लागत आहे. येथे अनेक गावांत तीव्र पाणीटंचाई आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये दूषित पाण्यामुळे शाळेतील १५-१६ आदिवासी विद्यार्थिनींना उलट्या-जुलाबाचा त्रास झाला होता.
संपादकीय भूमिकाविद्यार्थिनींसाठी पाण्याची सुविधा कधी उपलब्ध करणार ? हे प्रशासनाने सांगावे ! |
अभिनेते गोविंदा अहुजा यांचा शिवसेनेत प्रवेश !
मुंबई – अभिनेते गोविंदा अहुजा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश झाला असून गोविंदा यांना मुंबईतील वायव्य मुंबईतून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे. ‘मी या पक्षात आलो आहे. १४ वर्षांचा वनवास संपला आहे आणि रामराज्यात आलो आहे’, असे मला वाटत आहे. मला जे दायित्व दिले जाईल, ते मी प्रामाणिकपणे पार पाडेन’, असे ते म्हणाले.
नागपूर येथे मुलीचे अपहरणकर्ते २ घंट्यांत पोलिसांच्या कह्यात !
नागपूर – येथे १० वर्षीय मुलीच्या अपहरणकर्त्याला पोलिसांनी २ घंट्यांत शोधून काढले. त्याचे वर्णन वायरलेसद्वारे संबंधित पोलिसांना कळवण्यात आले होते. पोलीस अंमलदार चंदू ठाकरे कर्तव्य बजावून घरी जात असतांना त्यांना एक युवक वर्णन केलेल्या मुलीला घेऊन जात असल्याचे दिसले. त्यांनी विचारल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तर दिली. अल्पवयीन मुलगी पोलीस अंमलदार चंदू ठाकरे यांना पाहून रडली. शेवटी ठाकरे यांनी आरोपीला थांबवून त्याला पोलिसांच्या कह्यात दिले.
संपादकीय भूमिकाप्रत्येकच गुन्हेगाराचा शोध अल्प वेळेत लागला, तर राज्यातील गुन्हेगारीचे प्रमाण न्यून होईल ! |