संपादकीय : भारतद्वेषी विदेशी विद्यापिठे !
भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थन केल्यानंतर ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मध्ये विद्यार्थी संघटनेची निवडणूक लढवणार्या सत्यम सुराणा या भारतीय विद्यार्थ्याच्या विरोधात मोहीम उघडण्यात आली. एल्.एस्.ई. विद्यार्थी संघटनेच्या सरचिटणीसपदाच्या मतदानाआधी सत्यम याला विरोध झाला. ऑक्टोबर २०२३ मध्ये खलिस्तानी समर्थकांनी भारतीय उच्चायुक्तालयाच्या बाहेर आंदोलन केले असतांना भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान रोखणारा सत्यम सुराणा याचे नाव चर्चेत आले होते. या वेळी सत्यम याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप, श्रीराममंदिर आणि भारत यांच्याविषयी समर्थन देणारे विधान केले होते. सत्यम याने ‘एक्स’वर त्याची भूमिका मांडतांना म्हटले की, ‘एल्.एस्.ई.’सारख्या आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्थेत निवडणूक लढवण्यासाठी मी आणि माझे सहकारी यांनी पुष्कळ जोमात प्रचार केला. मला मिळालेला प्रतिसाद हा पुष्कळ उत्साहवर्धक होता. निवडणुकीच्या काही काळ आधी सत्यम याच्या नावाचे फलक फाडून टाकण्यात आले, तसेच अनेक ठिकाणी ते खराब करण्यात आले. त्याला इस्लामद्वेषी, वर्णद्वेषी, आतंकवादी, फॅसिस्ट आणि इतर विशेषणे लावून हेटाळण्यात आले. ‘माझ्यावर उजव्या विचारसरणीचा असल्याचा ठपका ठेवणारा प्रचार जाणूनबुजून करण्यात आला असून यामागे डाव्या विचारसरणीच्या लोकांचा हात आहे’, असा आरोपही सत्यम याने केला आहे. ‘ज्या लोकांनी मला लक्ष्य केले, त्या लोकांना भारताची प्रगती पहावत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत विकास साधत असल्यामुळेच काही जणांचा जळफळाट होत असून ते असा चुकीचा आणि बिनबुडाचा प्रचार करत आहेत’, असाही आरोप सत्यम याने केला. सत्यम याने पुढे म्हटले की, माझ्या विरोधात द्वेष पसरवणारे आणि भारतीय सार्वभौमत्वावर अविश्वास दर्शवणारे बहुतांश विद्यार्थी भारतीय असल्यामुळे मला अतीव दुःख झाले. भारतविरोधातील संदेश प्रसारित करणे लाजिरवाणे आहे, असे त्याने म्हटले आहे.
अमेरिकेतील असुरक्षित भारतीय !
ही केवळ सत्यम याची समस्या आहे, असे नाही. विदेशातील अनेक विद्यार्थ्यांसमोर अशी परिस्थिती निर्माण होत आहे. कॅनडामध्ये खलिस्तानी आतंकवादी हरदीपसिंह निज्जर याच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडा सरकारांमधील राजनैतिक संघर्षानंतर कॅनडा येथील भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेविषयी प्रश्न उपस्थित झाले होते. अमेरिकेतही भारतीय विद्यार्थ्यांवरील वर्णद्वेषी गुन्ह्यांमध्ये वाढ होण्यामागील एक प्रमुख कारण आहे. कट्टरपंथी रिपब्लिकन पक्षाचे गड असलेल्या जॉर्जिया, अलाबामा आणि इंडियाना या राज्यांत भारतीय विद्यार्थ्यांवर आक्रमणे झाली. अमेरिकेत गेल्या वर्षी भारतियांविरुद्ध वर्णद्वेषी गुन्ह्यांची ३७५ प्रकरणे नोेंदवण्यात आली. अमेरिकेत एकाच आठवड्यात श्रेयस रेड्डी बेनिगेरी, विवेक सैनी आणि नील आचार्य या भारतीय विद्यार्थ्यांच्या हत्या झाल्या आहेत. याआधी अकुल धवन याची हत्या झाली आहे. वेगवेगळ्या राज्यांत घडलेल्या घटनांमध्ये एकाही आरोपीला अटक झालेली नाही. वर्षभरात अमेरिकेत ३० भारतीय विद्यार्थ्यांची हत्या झाली. वर्ष २०२४ च्या प्रारंभी ४ विद्यार्थ्यांची हत्या झाली. वर्ष २०२२ मध्ये भारतीय विद्यार्थ्यांच्या मृत्यूची केवळ १२ प्रकरणे नोंदवली गेली. विदेशी पोलिसांचा दृष्टीकोन अतिशय अमानवी आहे. भारतियांनी द्वेषाच्या गुन्ह्यांची तक्रार केली, तरी अनेकदा पोलीस घटनास्थळी पोचत नाहीत. गेल्या वर्षी सिएटल येथे जान्हवी कंडुला हिला पोलिसांची गाडी धडकल्यामुळे तिचा मृत्यू झाला. त्या वेळी तेथील एका पोलीस अधिकार्याने ‘येथे भारतियांच्या जीवनाला मर्यादित मूल्य आहे. जर एखाद्या भारतियाचा मृत्यू झाला, तर सरकार हानीभरपाई म्हणून १० लाख रुपये देईल’, असे म्हटले होते.
ऑक्सफर्ड, केम्ब्रिज, हार्वर्ड, प्रिन्स्टन आदी युरोप आणि अमेरिका येथील मोठ्या विद्यापिठांत अनेक भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत; मात्र गेल्या काही वर्षांपासून वर्णद्वेष आणि उजव्या विचारसरणीचा प्रचार केल्याच्या कारणावरून विद्यार्थ्यांना विदेशातील कट्टरतावाद्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे देशाबाहेर गेलेल्या अनेक विद्यार्थ्यांना मायदेशी परतावे लागत आहे, हे वास्तव आहे. एका अंदाजानुसार आगामी काळात २० लाख भारतीय विद्यार्थी विदेशात जातील. शिक्षणासाठी विदेशात जाणार्या विद्यार्थ्यांची संख्या वाढणे, हा चिंताजनक विषय आहे. सध्या साधारण १८ लाख भारतीय विद्यार्थी विदेशात शिक्षण घेत आहेत. वर्ष २०२२ या एका वर्षातच अनुमाने ४ लाख ५० सहस्र विद्यार्थी विदेशात गेले होते; पण प्रत्यक्षात विदेशी संस्थांमध्ये शिकण्याची इच्छा असणार्यांची संख्या आणखी मोठी आहे, असा अंदाज यूजीसीचे अध्यक्ष एम्. जगदीश कुमार यांनी मांडला आहे. असे असले, तरी विदेशात भारतीय विद्यार्थ्यांचे मृत्यू होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे हे सूत्र दुर्लक्षून चालणार नाही. गेल्या एका वर्षात कॅनडा येथे ४८, रशिया ४०, अमेरिका ३६, ऑस्ट्रेलिया येथे ३५, युक्रेनमध्ये २१ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.
कठोर पावले उचलणे अपेक्षित !
विदेशात भारतीय विद्यार्थ्यांवर होणारी वर्णद्वेषी आक्रमणे, हा चिंतेचा विषय असला, तरी त्याही पुढे जाऊन विदेशातील मोठ्या विद्यापिठांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांवर वैचारिक आतंकवाद्यांच्या माध्यमातून होणारे आक्रमण हे तितकेच गंभीर आहे. काही वर्षांपूर्वी रश्मी सामंत या विद्यार्थिनीने ऑक्सफर्ड येथील विद्यार्थी संघटनेची निवडणूक जिंकली आणि तिची अध्यक्ष म्हणून निवड झाली होती; मात्र त्यानंतर ती हिंदुत्वनिष्ठ विचारांची असल्याचे सांगत तिच्या विरोधात विद्यापिठातील विद्यार्थ्यांच्या अन्य गटांतून मोठ्या प्रमाणात प्रसार करण्यात आला. यानंतर रश्मी हिने पदाचे त्यागपत्र दिले. भारतात जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, अलीगड मुस्लिम विद्यापीठ आदी विद्यापिठांमधून भारतद्वेषी कारवाया चालतात, हे आपण पहातो. विदेशातील विद्यापिठांमध्येही भारतद्वेषी कारवाया चालतात, हे सत्यम सुराणा आणि रश्मी सामंत यांच्या प्रकरणांतून दिसून येते. या दोन्ही घटनांतून हेही लक्षात येते की, तेथील भारतीय विद्यार्थ्यांसमोर साम्यवादी आघाडी, खलिस्तानवादी यांच्यापासून सुरक्षिततेचा महत्त्वाचा प्रश्न उभा राहिला आहे. भारत देशाचा गौरव केला; म्हणून विदेशातील सत्यम याच्यासारख्या विद्यार्थ्यांचे हाल करणे, त्यांच्यावर टीका करणे असे प्रकार बंद होण्यासाठी भारत सरकारने गंभीरपणे पावले उचलायला हवीत. असे केले, तरच तेथे शिकणारे भारतीय विद्यार्थी मोकळ्या वातावरणात अभ्यास करू शकतील.
विदेशी विद्यापिठे ही भारतद्वेषी कारवायांचे अड्डे बनल्यामुळे तेथील भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पावले उचलणे आवश्यक ! |