उत्तराखंडमध्ये नानकमत्ता गुरुद्वाराच्या मुख्य जत्थेदाराची (प्रमुखाची) गोळ्या झाडून हत्या
डेहराडून (उत्तराखंड) – उत्तराखंडमधील उधमसिंह नगरातील प्रमुख धार्मिक स्थळ नानकमत्ता गुरुद्वाराचे मुख्य जत्थेदार बाबा तरसेम सिंह यांची २८ मार्चला सकाळी हत्या करण्यात आली. दुचाकीवरून आलेेल्या दोन जणांनी त्यांच्यावर गोळीबार केला. घायाळ झालेले बाबा तरसेम यांना खतिमा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. बाबा तरसेम सिंह हे संपूर्ण राज्यात प्रसिद्ध होते. या हत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही.
वरिष्ठ पोलीस अधीक्षक मंजुनाथ टी.सी. यांनी सांगितले की, ही घटना सकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. त्या वेळी बाबाजी गुरुद्वाराच्या आत मुख्य प्रवेशद्वारासमोर खुर्चीवर बसले होते. ते त्यांच्या भ्रमणभाषवर काही तरी करत होते, तेव्हा दोन पगडीधारी माणसे दुचाकीवर आली आणि त्यांनी बाबाजींवर काही सेकंदात दोनदा गोळ्या झाडल्या आणि ते पळून गेले. सीसीटीव्ही चित्रीकरणात दोघांचे चेहरे स्पष्ट दिसत आहेत. दोघेही शीख आणि ओळखीचे आहेत. पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी ८ ते १० पथके स्थापन केली आहेत.