छत्रपती शिवरायांची युद्ध आणि राज्य नीती भारताच्या प्रगतीस साहाय्यभूत !
आज छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती आहे. त्या निमित्ताने…
छत्रपती शिवाजी महाराजांची नागरी सेवा प्रणाली आणि प्रशासन, महसूल संकलन, कर प्रणाली, त्यांच्या राजवटीत महिलांची सुरक्षा, महिलांचा आदर आणि त्यांचे कल्याण, त्यांची लष्करी रणनीती, डावपेच, सशस्त्र दल, शस्त्र व्यवस्थापन आणि नौदल हे सगळेच अचंबित करणारे आहे. त्या वेळचे शत्रू होते मोगलशाही, आदिलशाही, कुतूबशाही, देशाच्या आतील देशद्रोही आणि आजचे देशाचे शत्रू आहेत चीन, पाकिस्तान, बांगलादेश, आतंकवादी, माओवादी नक्षलवादी आणि या सर्वांचे आतील देशद्रोही हस्तक ! छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज तिथीनुसार असलेल्या जयंतीच्या निमित्ताने या लेखात त्यांची रणनीती, युद्धाचे डावपेच आणि गनिमी कावा यांविषयी जाणून घेऊया.
संकलक : ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे
छत्रपती शिवाजी महाराज : एक सामरिक तज्ञ‘एका वेळेस फक्त एकाच शत्रूशी लढाई, इतर शत्रूंशी समेट, कधी शत्रूंपासून रक्षण, कधी आक्रमण, सामरिक खोलीकरता आदिलशाहीवर आक्रमणे, मोगलांना सह्याद्री पर्वतरांगात यायला भाग पाडणे’, अशी छत्रपती शिवाजी महाराजांची सामरिक युद्धनीती होती. ‘वेगवेगळ्या ठिकाणचे सैन्य नेमके आक्रमणाच्या वेळेला एका ठिकाणी आणायचे, गडांचा वापर एक सुरक्षित स्थान म्हणून करायचा’, अशी त्यांची नीती होती. म्हणूनच पोर्तुगीज, ब्रिटीश इतिहासकारांनी छत्रपतींची तुलना सिझर, अलेक्झांडर, हनीबल या जागतिक महायोद्ध्यांशी केली. छत्रपती शिवाजी महाराज हे एक लष्करी प्रतिभावंत होते, ज्यांनी युद्ध लढण्याची भारतीय पद्धत विकसित केली आणि शत्रूंना भारतीय शस्त्रांनी पराभूत केले. अनेक थोर पुरुषांची प्रेरणा ‘छत्रपती शिवाजी’ या मंत्रात आहे. या मंत्राची प्रेरणा आजही तितकीच आवश्यक आहे. आज देशासमोर सुरक्षेची अनेक आव्हाने आहेत. ‘इतिहास हा गतकाळाचा साक्षीदार आणि भावी काळाचा वाटाड्या असतो’, असे म्हणतात. जे राष्ट्र इतिहासापासून शिकत नाही, ते कधीही महासत्ता बनू शकत नाही. राजांच्या असंख्य गुणांपैकी किती गुण हे देशाच्या लोकप्रकृतीमध्ये उतरले, हे महत्त्वाचे आहे. महाराजांनी नरदुर्ग म्हणजे गडांसारखी बुलंद, मजबूत, शूर, निष्ठावान आणि पराक्रमी माणसे घडवली. लढाईमध्ये सर्वांत महत्त्वाचा घटक सैनिक आणि त्याचे शौर्य. लढाई सैनिकांमुळे जिंकली जाते. प्रत्येकच लढाईमध्ये सैनिक कशा प्रकारे लढतात ? यावर जय आणि पराजय यांचा निर्णय होतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी धोकादायक परिस्थितीमध्ये सर्वांत अग्रभागी राहून सैनिकांचे नेतृत्व केले, लढाया केल्या आणि त्यामुळेच मराठ्यांनी त्या वेळेला महापराक्रम गाजवला. छत्रपती शिवाजी महाराजांची पुढे राहून नेतृत्व करायची परंपरा आजसुद्धा भारतीय सैन्य चालवत आहे, ज्यामुळे आजही आपण चीन आणि पाकिस्तान यांना धडा शिकवतो; परंतु त्याची किंमत आपल्याला आपल्या अधिकार्यांचे रक्त सांडून मोजावी लागते. – ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) |
१. मोगल आणि औरंगजेब यांचे सैन्य अन् त्यांचे युद्धाचे डावपेच !
अनेक वर्षे राज्य केल्यामुळे मोगल सैन्य हे हळूहळू आळशी, लालची, अत्याचार करणारे बनू लागले. त्यांच्या फौजांमध्ये भाडोत्री सैनिकांची संख्या वाढली. वेगवेगळी विचारसरणी. त्यात एकमेकांशीही सैनिकांचे संबंध फारसे चांगले नव्हते. रक्षण करण्याकरता पुष्कळ सैन्य वापरले जात होते. त्यामुळे आक्रमक कारवाईकरता ५० ते ६० सहस्र सैन्य उपलब्ध व्हायचे. मोगल सैन्य एक हालते शहर होते. कुटुंबाचे जथ्थे, बाजारबुणगे, बिनलढाऊ सैनिक, रसद पुरवणारे असे सगळेच या सैन्याचा भाग होते. घोडे आणि सैनिक यांच्या रसदीमुळे बाजारबुणग्यांची संख्या सैनिकांच्या ५ पट अधिक होती.
तोफखान्याकरता सैन्याला हत्ती, घोडे, उंट लागायचे. त्या काळी नद्या आणि नाले पार करणे कठीण असायचे. सैन्याचा चालण्याचा वेग दिवसाला ३० किलोमीटर इतका होता. आठवड्याला २ विश्रांतीचे दिवस असायचे. लढाईचे दिवस आणि वेळ ज्योतिषशास्त्रावर अवलंबून असायचे. जिंकलेल्या भूमीवर अधिपत्य ठेवणे पुष्कळ कठीण होते, ज्यासाठी सैन्याची आवश्यकता पडायची. हुकूम देणे किंवा पत्रव्यवहार घोडेस्वारांच्या साहाय्याने व्हायचा. घायाळ सैनिकांच्या उपचाराकरता वैद्यांची कमतरता असायची.
मोगल सैन्याच्या रचनेत पहिली फळी तोफखाना, दुसरी फळी एक सैन्याची आणि तिसरी फळी मुख्य सैन्याची होती. त्यांचे घोडेस्वार अन्य सैन्यावर बाजूने आक्रमण व्हायचे, मग हातघाईची झटापट होऊन सैन्याची पळापळ व्हायची. मोगलांकडून गड लबाडी करून वा धूर्तपणे जिंकले जायचे. तसे झाले नाही, तर गडांना चारही बाजूने वेढा घालून तोफांनी तटबंदीवर खिंडार पाडून आक्रमण केले जायचे.
२. छत्रपती शिवाजी महाराज यांचे सैन्य आणि त्यांची युद्धनीती !
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचा प्रारंभ ३ ते ४ सहस्र सैनिकांनी झाला. राज्याभिषेकाच्या वेळी ४५ सहस्र बारगीर (राखीव शिलेदार), ६० सहस्र शिलेदार असे एकूण १ लाख ५ सहस्र घोडदळ होते. पायदळ ६० सहस्र होते. पायदळ चपळ, काटक आणि अतिशय जलदगतीने हालचाल करणारे होते. महाराजांचे अंगरक्षक २ सहस्र अतीकुशल आणि शूर मावळे होते. सैन्यात वेगावर मर्यादा येतील, असे काही नव्हते. बाजारबुणग्यांना थारा नव्हता. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे सैन्य लांब लांब मजल सहज मारत असे. अचानक हालचाली करू शकत. युद्धाच्या वेळी नांगर सोडून प्रत्येक नागरिकाच्या हाती शस्त्र असायचे. सर्व सैनिक आणि गुप्तहेर कामसुद्धा करायचे. तलवारी आणि भाले ही त्याकाळी मुख्य शस्त्रे होती.
तोफखान्यामुळे सैनिकांची हालचाल करण्याचा वेग हा अल्प व्हायचा. तोफखान्याचा वापर फक्त गडावर आणि नौदलाच्या बोटींवर केला जात होता. गडांचे मुख्य कार्य आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवणे होते. शत्रूंच्या गडांवर लक्ष ठेवण्याकरता महाराजांनी गडांची उभारणी करतांना ते महत्त्वाच्या ठिकाणी बांधले होते. गडांकरता तटबंदी, मनोरे, लक्ष ठेवणारे टॉवर, खंदक, एक रस्ता, बालेकिल्ला असायचा. छत्रपती शिवाजी महाराजांनी गडांचा वापर आक्रमक गनिमी काव्याकरता केला. पुरंदर गड जिंकायला मोगलांना तब्बल ४ मास लागले; मात्र तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा (सिंहगड) एका रात्रीत अचानक कड्याच्या बाजूने आक्रमण करून जिंकला होता.
३. छत्रपती शिवाजी महाराज, गनिमी कावा आणि सागरी सुरक्षा !
छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी मोगलांवर वेगवेगळ्या दिशेने वा अचानक आक्रमण चढवले. कधी समोरून, कधी मागून… शत्रूंच्या कमजोर भागांवर, शत्रू बेसावध असतांना, शत्रूच्या रसद पुरवणार्या रस्त्यांवर आक्रमण करत. छोट्या टोळ्या, आजूबाजूला असलेल्या भागावरच स्वतःचा उदरनिर्वाह करणार्या नागरिकांचे साहाय्य गनिमी काव्यासाठी घेतले जायचे. गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक / जाधव होते. महाराजांचे गुप्तहेर खाते अतीउच्च दर्जाचे होते, ज्यामुळे अनेक युद्धांमध्ये विजय मिळाला. शाहिस्तेखानावर आक्रमण, सूरतवर आक्रमण हे नेमक्या गुप्तहेर माहितीमुळे शक्य झाले. महाराज गुप्तहेर खात्यावर स्वतः नजर ठेवून असायचे.
राज्याभिषेकाच्या वेळेला नौदलामध्ये १०० जहाजे होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रामध्ये अनेक दुर्ग बांधले. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था कमालीची सुधारली. गलबतांवर २५ ते ३० नौसैनिक, मोठ्या जहाजांवर १५० ते ३०० नौसैनिक तैनात असायचे. या जहाजांनी गनिमी कावा वापरून सागरी सुरक्षा सुधारली आणि समुद्रामध्येसुद्धा स्वराज्य निर्माण केले .
४. छत्रपती शिवरायांचे स्थान ‘एक युगपुरुष’ म्हणूनच !
कर्तृत्ववान आणि धोरणी राजा, रणनीतीचे नैपुण्य, दूरदृष्टी, शक्ती आणि युक्ती यांचा वापर, सर्वसामान्यांचा कैवारी, शिस्तप्रिय, कार्यकुशल शासनकर्ता, अतीकुशल युद्ध नेतृत्व, जाणता राजा ज्याने सर्वसामान्यांची हृदये जिंकली, असामान्य बुद्धीमत्ता अन् युद्धकौशल्याने तत्कालीन परिस्थितीला साजेशी युद्धयंत्रणा सिद्ध केली, अत्याचाराने दबलेल्या हिंदूंच्या मनात स्वराज्याची ज्योत पेटवली, असे हे छत्रपती शिवराय एक ‘युगपुरुष’च होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी मराठा सरदार मोगलांकरता भाडोत्री सैनिकांचे काम करायचे किंवा त्यांच्याकरता कर वसुली करायचे; परंतु शिवरायांनी स्वतःच्या उदाहरणाने दाखवून दिले की, मराठा स्वतःचे, जनता आणि भूमी यांचे मोगलांपासून रक्षण करून स्वतःचे स्वराज्य निर्माण करण्यास सक्षम होते. काही इतिहासकारांनी त्यांना फक्त महाराष्ट्राचे हिरो बनवून ठेवले आहे; पण छत्रपती शिवराय केवळ महाराष्ट्र नाही, तर पूर्ण देशाचे हिरो आहेत. हिंदुस्थानच्या इतिहासातून शिवराय, महाराष्ट्र आणि मराठे वगळल्यास केवळ पराजयच अन् पराजयच दिसतो. मराठा आणि मराठा धर्माने १७ वे आणि १८ वे शतक आपल्या पराक्रमाने गाजवले.
छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धपद्धत, राज्यपद्धत आधुनिक भारताला आजसुद्धा योग्य मार्गावर जाण्यामध्ये साहाय्य करू शकते. आज १०० टक्के छत्रपती शिवाजी महाराज होणे शक्य नसेल, तर ४० ते ५० टक्के आणि २० ते ३० तरी शिवराय बना. तसे झाले, तर आपण जागतिक महाशक्ती बनू शकतो.