दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : ठाणे येथे वडिलांचा राग आल्याने मुलीने घर सोडले !; अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्या आरोपीला अटक !…
ठाणे येथे वडिलांचा राग आल्याने मुलीने घर सोडले !
ठाणे – अल्पवयीन मुलीला ‘भ्रमणभाषवर खेळण्याऐवजी शिकवणी वर्ग किंवा संगणकाचा वर्ग लाव’, असा वडिलांनी सल्ला दिला. याचा राग आल्याने मुलगी घर सोडून गेली. या प्रकरणी तिच्या वडिलांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दिली आहे.
सध्याच्या पिढीमधील संयम संपत चालल्याचे दर्शवणारी घटना !
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्या आरोपीला अटक !
मुंबई – धूलिवंदनाच्या दिवशी रंग लावण्यासाठी अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिला घराबाहेर खेचून तिचा विनयभंग करणार्या ३५ वर्षीय आरोपीला दिंडोशी पोलिसांनी अटक केली. त्याला विरोध केल्यावर आरोपीने पीडित मुलगी आणि तिच्या आईला मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
समाजातील वाढती वासनांधता धोकादायक !
नागपूर येथे रागाच्या भरात वडिलांकडून मुलाची हत्या !
नागपूर – वडील भ्रमणभाषवर मोठ्याने बोलत असल्याने मुलाने त्यांना हटकले आणि हळू बोलण्यास सांगितले. यावरून त्यांच्यात वाद झाला. रागाच्या भरात वडिलांनी लोखंडी रॉड मुलाला मारला. यामुळे त्याचा मृत्यू झाला. रामराव काकडे आणि सूरज काकडे असे वडील-मुलाचे नाव आहे. हत्येप्रकरणी वडिलांना अटक करण्यात आली असून गुन्हाही नोंद झाला आहे.
संयम नष्ट होत असल्याचा परिणाम !
पालघर येथे मासेमारांच्या जाळ्यांमध्ये माशांच्या ऐवजी प्लास्टिकचा कचरा !
पालघर – वसई आणि पालघर येथे मासेमारांच्या जाळ्यांमध्ये माशांपेक्षा जेलीफिश अन् प्लास्टिकचा कचरा मिळत आहे. त्यामुळे त्यांच्या फेर्या वाया जात आहेत. या फेर्यांसाठी त्यांनी बँका आणि पतपेढ्या यांच्याकडून कर्ज घेतले आहे; पण मासेच मिळत नसल्याने ‘हे कर्ज फेडता येईल कि नाही’, याची त्यांना धास्ती वाटत आहे.
समुद्रात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा टाकला जात असल्याचा परिणाम !