मागील लोकसभा निवडणुकीत देशातील तब्बल ८५ टक्के उमेदवारांच्या ठेवी जप्त !
बसपच्या ९०, तर काँग्रेसच्या ३५ टक्के उमेदवारांच्या ठेवी जप्त !
मुंबई – मागील म्हणजे वर्ष २०१९ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या उमेदवारांपैकी तब्बल ८५.९३ टक्के उमेदवारांना त्यांची ठेवही राखता आली नाही. निवडणूक लढवलेल्या ८ सहस्र २६ उमेदवारांपैकी तब्बल ६ सहस्र ८९७ एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवारांच्या ठेवी (डिपॉझिट) जप्त झाल्या. यांमध्ये राष्ट्रीय पक्ष असलेल्या मायावती यांच्या बसपच्या (बहुजन समाजवादी पक्ष) तब्बल ९० टक्के, तर त्या खालोखाल काँग्रेसच्याही ३५ टक्के उमेदवारांच्या ठेवी जप्त झाल्या.
वर्ष २०१९ मध्ये लोकसभेच्या ५४२ जागांसाठी राष्ट्रीय पातळीच्या १ सहस्र ४५४ उमेदवारांनी निवडणूक लढवली. त्यामधील ३९७ उमेदवार विजयी झाले, तर ६७० जणांच्या ठेवी जप्त झाल्या. राज्यस्तरीय पक्षांचे ३४५ उमेदवार निवडणुकीसाठी उभे होते. त्यांतील १३५ जण विजयी झाले. यांमध्ये ५० जणांच्या ठेवी जप्त झाल्या.
Deposits of 85% of the country's candidates seized in the previous #LokSabhaelections !
Deposits of 90% of BSP's candidates, 35% of Congress' candidates, 98.63% of candidates of regional parties and 88% of candidates in Maharashtra were forfeited!
Considering the status of… pic.twitter.com/dUbTWOgh1l
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 28, 2024
प्रादेशिक पक्षांच्या ९८.६३ उमेदवारांच्या ठेवी जप्त !
मान्यताप्राप्त नसलेल्या परंतु निवडणुकीपुरती नोंदणी केलेल्या प्रादेशिक पक्षांनी वर्ष २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत २ सहस्र ७८४ जागा लढवल्या; परंतु यांतील तब्बल २ सहस्र ७४६ उमेदवारांच्या म्हणजे ९८.६३ टक्के उमेदवारांच्या ठेवी जप्त झाल्या. अशीच स्थिती अपक्ष उमेदवारांची झाली. ३ सहस्र ४४३ अपक्ष उमेदवारांतील तब्बल ३ सहस्र ४३१ उमेदवारांच्या म्हणजे ९९.६५ उमेदवारांच्या ठेवी जप्त झाल्या.
महाराष्ट्रातील ८८ टक्के उमेदवारांच्या ठेवी जप्त !वर्ष २०१९ च्या निवडणुकीत महाराष्ट्रातील ४८ जागांसाठी ८६७ उमेवारांनी निवडणूक लढवली. त्यांपैकी ७६८ उमेदवारांच्या म्हणजे तब्बल ८८.५८ उमेदवारांच्या ठेवी जप्त झाल्या. यांमध्ये राष्ट्रीय पक्षांच्या ४८, प्रादेशिक पक्षांच्या ३०४, तर अपक्ष उमेदवारांपैकी ४१६ उमेदवारांच्या ठेवी जप्त झाल्या. वर्ष २०१९ मधील लोकसभेतील उमेदवारांची स्थिती, तसेच प्रादेशिक आणि अपक्ष पक्षांची संख्या पहाता त्यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय पक्षांची मते फुटत असल्याचे चित्र आहे. |