पुणे महापालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे शनिवारवाड्याची दुरवस्था !
नागरिकांच्या कष्टाच्या पैशांची उधळपट्टी होत असल्याचा नागरिकांकडून आरोप !
पुणे – पुणे महापालिकेकडून अनुमाने ४० कोटी रुपये खर्चाच्या अंतर्गत शनिवारवाडा परिसरातील व्यासपीठ आणि खुल्या पटांगणात नूतनीकरणाचे काम चालू आहे. बाजीराव पेशव्यांची वंशवेल, पेशव्यांविषयी गौरवोद्गार, पेशव्यांचे हस्ताक्षर, पुणेरी पगडी, पेशव्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग दगडी कोरीव कामातून बाजीराव पेशवे पुतळ्याजवळील भिंतीवर रेखाटण्यात आले आहेत; मात्र पालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे हे फलक अस्पष्ट झाले असून पटांगणातील दगडी पायर्या धूळखात पडून आहेत. अस्पष्ट आणि धुळीने माखलेला हा परिसर बघून पर्यटकांच्या पदरी निराशाच पडत आहे. शनिवारवाडा पटांगणातील फरशांचे व्यासपीठ काढून नवीन काळ्या आणि लाल दगडांनी व्यासपीठ उभारण्याचे काम महिन्याभरापासून चालू आहे. त्यामुळे नागरिकांच्या कष्टाच्या आणि घामाच्या पैशांची उधळपट्टी होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
‘थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठान’चे सचिव कुंदन कुमार साठे यांनी सांगितले की, शनिवारवाडा संवर्धनासाठी अनेक वर्षांपासून केंद्र आणि पुरातत्व विभाग यांकडे पाठपुरावा करत आहोत. (जर पुरातत्व विभागाकडून सक्षम कार्य होतच नसेल, तर वेगळा पुरातत्व विभाग काय उपयोगाचा आहे ? देशातील सर्वच पुरातन ठेव्यांकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे केंद्रशासनाने या ठेव्यांच्या संरक्षणासाठी ठोस उपाययोजना काढली पाहिजे. – संपादक) पालिकेकडून बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या पूर्वीच्या संगमरवरी टाईल्स काढून त्याजागी दगडी ब्लॉकमध्ये बांधकाम करण्यात आले. पेशव्यांचे हस्ताक्षर, वंशवेल, पुणेरी पगडी, पेशव्यांविषयी गौरवोद्गार, दगडी कामातील फलक अस्पष्ट झाले असून, ते धूळखात पडून आहेत. पालिकेने येथील कामे अर्धवट सोडून दिली आहेत.
पुणे महानगरपालिकेचे प्रभारी कार्यकारी अभियंता सुनील मोहिते यांनी सांगितले की, शनिवारवाडा येथील व्यासपिठाच्या नूतनीकरणाचे काम चालू आहे. एकूण ४० कोटी रुपये खर्च करून हे काम चालू आहे. शनिवारवाडा व्यासपिठाच्या फरशा तुटल्या होत्या, त्यामुळे नवीन फरशांऐवजी दगडी ब्लॉक बसवणे चालू आहे.
सुशोभीकरण कि उधळपट्टी ?
शनिवारवाडा पटांगणात जुने चांगल्या फरशीचे व्यासपीठ उखडून काळ्या-लाल दगडात व्यासपीठ उभारण्याचे काम चालू आहे. त्यामुळे देशी-विदेशी पर्यटकांना सुशोभीकरण चालू आहे कि उधळपट्टी ? हा प्रश्न पडत आहे.
शनिवारवाड्याची झालेली दुरवस्था ! १. शनिवारवाडा पहाण्यासाठी प्रतिदिन सहस्रो पर्यटक येतात. वास्तू पाहून त्यांच्या मनात इतिहासाविषयी उत्सुकता वाढते. बाजीराव पेशव्यांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग दगडी कोरीव कामातून रेखाटण्यात आले; मात्र पालिका प्रशासनाकडून काळजी घेण्यात न आल्याने गेल्या २ वर्षांपासून माहिती फलक अस्पष्ट झाले आहेत. २. पटांगणातील हिरवळीला पाणी न मिळाल्याने मुंग्यांची वारुळे सिद्ध झाली आहेत. ३. वाहनतळासाठी सुरक्षारक्षक नसल्याने पर्यटकांऐवजी परिसरातील नागरिकांच्या गाड्या दिवसभर अवैधपणे लावल्या जातात. ४. पेशवे पुतळ्याच्या परिसरात स्वच्छतेच्या अभावी दुर्गंधी पसरली आहे. दिशादर्शक फलक नसल्याने पर्यटकांच्या पदरी निराशाच पडत आहे. |
संपादकीय भूमिका :मराठ्यांच्या इतिहासाची साक्ष देणारा शनिवारवाडा पुणे महापालिका सुस्थितीत ठेवू न शकणे, हे इतिहासाचा अभिमान नसल्याचेच द्योतक ! |