‘सामान्य माणसाने ईशमार्गाने कसे जगावे’, याचा कर्म-सिद्धांत मांडणारे महर्षि याज्ञवल्क्य !
ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् ।
तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्यस्विद्धनम् ।।
– ईशावास्योपनिषद, मंत्र १
अर्थ : या जगातील प्रत्येक अणू-रेणूमध्ये ईश्वराचे अस्तित्व आहे. तेव्हा त्यागी वृत्ती (संयम) ठेवून जगाचा उपभोग घे. (आपल्या उन्नतीसाठी (प्रभुकार्यासाठी) कार्य कर); परंतु त्याच वेळी कुणाच्या धनाची अभिलाषा बाळगू नकोस.
‘साधकाची चित्तशुद्धी व्हावी’, याकरता यजुर्वेदात जे तत्त्वज्ञान वेदांत या स्थितीदर्शक शब्दाने गौरवले आहे, त्या ‘ईशावास्य’ उपनिषदाचा हा पहिला श्लोक. ‘सामान्य माणसाने ईशमार्गाने कसे जगावे’, याचे कर्म-सैद्धांतिक वर्णन यात मांडले आहे आणि याचे उद्गाते आहेत महर्षि याज्ञवल्क्य ! अथांग सागरासारखे विस्तीर्ण असे महर्षि याज्ञवल्क्य यांचे जीवनचरित्र शब्दांत बांधणे अशक्य आहे. संपूर्ण चरित्र मांडणे, हे तर अशक्यप्रायच आहे; परंतु त्यांचा अल्प परिचय या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न आहे.
१. याज्ञवल्क्य यांचा जन्म आणि ज्ञानलालसा
महान तपस्वी ब्रह्मरातांचे पुत्र म्हणून याज्ञवल्क्य यांचा जन्म झाला. असामान्य बुद्धीमत्तेचे धनी असलेले हे व्यक्तीमत्त्व जणू परमेश्वराचा मानवी अवतारच होय. ब्रह्मरात आणि देवी सुनंदा यांच्या पोटी ब्रह्मदेवाने जन्म घेतला. तो एका शापातून मुक्त होण्यासाठी, साक्षात् सूर्यनारायणाच्या प्रसन्न आशीर्वादाने या बालकाचा जन्म सूर्यकुलात झाला. वयाच्या ८ व्या वर्षी परंपरेप्रमाणे उपनयन संस्कार करून ऋषि वैशंपायन यांच्याकडे विद्यार्जन करण्यासाठी याज्ञवल्क्य यांनी प्रस्थान ठेवले. ऋषि वैशंपायन हे नात्याने त्यांचे मामा. वैशंपायनांचे गुरुकुल त्या काळी ‘यजुर्वेदाचे महाविद्यापीठ’ म्हणून प्रसिद्ध होते. असामान्य बुद्धीमत्तेच्या याज्ञवल्क्य नावाच्या बालकाचे विद्यार्जन तेथे चालू झाले. त्यांना ‘वाजसनेय’ या उपनामानेही संबोधले जाई. ब्रह्म म्हणजे बल, ब्रह्म म्हणजे वेदविद्या, ब्रह्म हाच मंत्र आणि शास्त्रोक्त वेदाभ्यास करणे म्हणजेच ब्रह्मचर्य. ‘शतायुर्वे पुरुषः ।’ (शतपथब्राह्मण, काण्ड ४, अध्याय १, ब्राह्मण १५) म्हणजे ‘मनुष्याचे जीवन १०० वर्षांचे असावे’, या मंत्राला सार्थ करण्याची किमया ही ब्रह्मचर्यात असल्याचा साक्षात्कार मनात ठेवून संपूर्ण यजुर्वेद मुखोद्गत आणि आत्मसात् करूनही वाजसनेयांची ज्ञानलालसा तृप्तीकडे जात नव्हती.
महाभारताच्या युद्ध समाप्तीनंतर साधारण ७५ वर्षांनंतरच्या कालखंडातील हे व्यक्तीमत्त्व, ज्या वेळी पृथ्वीतलावर ऋग्वेदाचार्य शाकल्यमुनी, योगशास्त्रज्ञाचे महामहोपाध्याय हिरण्यनाभ, सांख्यशास्त्राचे प्रणेते कपिलमुनी, सामवेदाचे आद्यप्रचारक जैमिनी, यांसारखे महान तपस्वी, तसेच राजा जन्मेजय, पुण्यश्लोक विदेह राज जनक, अजातशत्रू राजा अश्वपती असे महात्मे या काळात पृथ्वीतलावर अधिवास करत होते. ‘गुरुमुखातून संथा घेऊन ती मुखोद्गत करणे’, ही या काळातील प्रचलित विद्याग्रहण प्रथा याज्ञवल्क्य यांनी अवलंबली; पण ज्ञानलालसा प्रचंड असल्याकारणाने एका यजुर्वेदाच्या अध्ययनाने तृप्ती होत नव्हती; म्हणून गुरु वैशंपायन यांच्या अनुमतीने उद्दालक अरुणिच्या आश्रमात मंत्र विद्येचे गूढ ज्ञान प्राप्त करण्यासाठी प्रवेश केला. तेव्हा त्यांचे वय केवळ १० वर्षांचे होते. हे गूढ समजल्यानंतर पुन्हा ऋग्वेदाचे ज्ञान मिळवण्याच्या जिज्ञासेने त्यांना पछाडले. उद्दालकांचे ज्येष्ठ पुत्र श्वेतकेतू यांच्या मैत्रीतून ऋग्वेदाचार्य शाकल्य मुनींच्या आश्रमात प्रवेश मिळवला. त्या वेळी ऋषि शाकल्य हे राजा सुप्रिय यांचे पौरोहित्य करत. राजवाड्यात धार्मिक आणि पौराणिक कृत्ये करतांना एक दिवस याज्ञवल्क्य यांना घेऊन शाकल्य गेले असता त्यांच्या अपरोक्ष राजा सुप्रियकडून या तरुण तपोनिष्ठ विद्याभ्यासकाचा (याज्ञवल्क्य यांचा) घोर अपमान झाला. हे सहन न झाल्यामुळे ते राजवाड्यातून क्रोधाने निघून गेले.
‘आपल्या मंत्र सामर्थ्याने सिद्ध केलेले अभिषेकी जल राजाने अव्हेरले’, या गोष्टीचा प्रचंड राग याज्ञवल्क्य यांच्या मनात खोल आघात करून गेला. त्यामुळे पुन्हा राजवाड्यात जाण्याची गुरूंची आज्ञा त्यांनी नाकारली आणि या कारणाने शाकल्य मुनींचा आश्रम सोडावा लागला. ‘चंचल चित्त एकाग्र करण्यासाठी योगविद्या आवश्यक आहे आणि चित्त एकाग्रतेविना आत्मज्ञान प्राप्त होऊ शकत नाही’, या जाणिवेने महायोगीश्वर हिरण्यनाभ यांच्या आश्रमात योगाभ्यासासाठी प्रवेश मिळवला.
२. ऋषि वैशंपायन यांनी अपसमजाने याज्ञवल्क्य यांचा अपमान करणे आणि त्यांचे ज्ञान परत देऊन याज्ञवल्क्य घरी परतणे
थोड्याच काळात योगविद्येत पारंगत होऊन पुन्हा यजुर्वेदाचे ज्ञान वृद्धींगत करण्यासाठी ऋषि वैशंपायन यांच्या आश्रमात परत आले. यजुर्वेदाच्या बारकाव्यांसह अभ्यास चालू असतांना एक अघटीत घटना घडली. त्या काळातील प्रथेप्रमाणे एका विद्वत सभेत गुरु वैशंपायन यांना आमंत्रण होते, ते वेळेवर उपस्थित राहू न शकल्यामुळे त्यांच्यावर ब्रह्महत्येचे पातक लागले. या पातकाच्या निरसनासाठी प्रायश्चित्त घेणे भाग होते. आपल्या गुरूंसाठी संपूर्ण प्रायश्चित्त एकट्याने घेण्याची सिद्धता याज्ञवल्क्य यांनी सर्वांसमोर बोलून दाखवली; परंतु वैशंपायनांना ही गोष्ट रुचली नाही. ‘आपल्या विद्येचा गर्व, अहंकार वाजसनेयास झाला’, या समजाने त्यांनी याज्ञवल्क्य यांचा अपमान केला. ‘माझी विद्या मला परत कर आणि पुन्हा मला तोंड दाखवू नकोस’, अशी आज्ञा केली. मानी आणि ज्ञानसंपन्न याज्ञवल्क्यांना हा अपमान सहन झाला नाही. त्यांनी गजपानाप्रमाणे सर्व ज्ञान वांती धर्माने (उलटी केल्याप्रमाणे) त्यागण्यास प्रारंभ केला. वैशंपायनांच्या काही शिष्यांनी हे ज्ञान खाली पडू न देता तितिरपक्षी होऊन ग्रहण केले. पुढे तेच तैतरीय शाखीय झाले आणि ज्यांनी ब्रह्महत्या व्रत आचरण केले, ते चकराध्वर्यु किंवा चरक या नावाने प्रसिद्ध झाले, तर याज्ञवल्क्य यांनी ओकून टाकलेली ही विद्या शिळी, म्हणजे मलीन झाली असल्याने तिला पुढे ‘कृष्ण यजुर्वेद’ असे नाव मिळाले. सर्व ज्ञानाचा त्याग केलेले योगीश्वर (याज्ञवल्क्य) निराश मनाने घरी परतले; पण ते अत्यंत अस्वस्थ होते.
३. याज्ञवल्क्यांनी आदित्याची उपासना करणे आणि सूर्याने आशीर्वाद देणे
अशातच त्यांच्या मातेने कोणत्याही मानवी गुरूंऐवजी प्रत्यक्ष एखाद्या देवतेलाच गुरु करण्याचा उपदेश केला आणि अत्यंत उत्साहाने तेजोनिधी आदित्याची उपासना करण्यासाठी याज्ञवल्क्यांनी अरण्याकडे प्रस्थान केले. विश्वामित्र नावाच्या चमत्कारपूर क्षेत्रातील एका हिरवट पाण्याच्या सरोवरात स्नान करून याज्ञवल्क्यांनी मातीच्या १२ गोळ्यांतून आदित्यांच्या १२ मूर्ती स्वतःभोवती प्रतिष्ठित केल्या अन् तपश्चर्येला प्रारंभ केला. या अविश्रांत तपश्चर्येचा उद्देश ‘प्रत्यक्ष सूर्यनारायणाकडून वेदज्ञान प्राप्त करणे’, हा होता. अखेर तपश्चर्या फळाला आली.
श्रावण पौर्णिमेच्या दिवशी माध्यान्ह काली एक तेजोमय पुरुष समोर प्रकट झाला. भावभरल्या स्वरात त्या सवित्राची मनोभावे स्तुती करून ‘त्याने आपले गुरुत्व स्वीकारावे’, ही अपेक्षा नम्रपणे याज्ञवल्क्य यांनी व्यक्त केली. ‘ब्रह्मर्षि विश्वामित्रांच्या ज्या मंत्राने आपली उपासना केली जाते, त्याच गायत्री मंत्राने मी आपणास आळवले, तेव्हा ‘हे ज्ञानदेवते, आपण माझ्यावर प्रसन्न होऊन ज्ञानदान करा’, अशी मागणी केली आणि ‘तथास्तु’ असा आशीर्वाद प्राप्त केला. ‘सूर्यनारायणाने त्याच्या तेजाचा त्रास न होता ज्ञान प्राप्त करता यावे’, यासाठी ‘लघिमा’ नावाची विद्या त्यांना प्रदान करून त्या तेजोनिधीने त्यांच्या ज्ञानलालसेला संतुष्ट करण्यास प्रारंभ केला.
ऋग्वेदात सरस्वतीदेवीचे नदी आणि देवतारूपाने यथार्थ वर्णन असून ती हिंदूंची ज्ञानदेवता आहे. सूर्यदेवाच्या आज्ञेने सरस्वतीच्या आराधनेत तल्लीन याज्ञवल्क्य यांनी एके दिवशी अत्यंत सुंदर सरस्वती स्तवन रचून प्रार्थना केली. या सर्वांचा परिणामस्वरूप सूर्यदेवाने याज्ञवल्क्यांच्या बुद्धीत नवीन अभिनव असा शुक्ल यजुर्वेद बिंबवला. यानंतर मंगल आशीर्वाद सरस्वतीदेवीकडून प्राप्त करून अपूर्व ज्ञान तेजाने तळपणार्या याज्ञवल्क्यांना गुरु सूर्याने गृहस्थाश्रमी होण्याची आज्ञा दिली, तसेच पुन्हा एकदा ‘देवी सरस्वतीचा वास कायम जिभेवर राहील आणि त्यामुळे सर्व रहस्यांसह संग्रह, अशा शतपथ ब्राह्मणाचा अविर्भावांसह अनेक ग्रंथनिर्मिती होतील’, असा आशीर्वाद प्रदान केला आणि घरी परत जाण्याची आज्ञा केली.
(क्रमशः उद्याच्या दैनिकात)
– अविनाश थिगळे
(साभार : ‘असोम सेवा प्रतिष्ठान’ आणि त्रैमासिक ‘प्रज्ञालोक’, जानेवारी ते मार्च २०२४)