होळीच्या कारणावरून धाराशिवमध्ये हिंदु-मुसलमान यांच्यात झालेल्या दगडफेकीत ५ घायाळ !
अल्ताफ शेख या यूट्यूब वाहिनीच्या पत्रकारामुळे जमाव भडकल्याचा आरोप !
- अनेक वाहने, दुकाने यांची हानी !
- सध्या परिस्थिती नियंत्रणात !
धाराशिव – येथील खाजानगर आणि गणेशनगर भागात हिंदु अन् मुसलमान यांच्यात दगडफेक झाल्याची घटना २५ मार्चला रात्री लक्षात आली. होळीच्या कारणावरून २ गट समोरासमोर आल्यानंतर दगडफेक झाल्याचे समजते. मोठ्या प्रमाणात जमाव जमल्याने पोलिसांनी अश्रूधुराच्या ३ नळकांड्या फोडत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे, तर दगडफेकीच्या घटनेत अनेक वाहने, दुकाने यांची हानी झाली आहे, तसेच ५ जण घायाळ झाल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच स्वतः पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी आला होता. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून तणाव निवळला आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे अल्ताफ शेख या यूट्यूब वाहिनीच्या पत्रकारामुळे जमाव भडकल्याचा आरोप करण्यात येत असून, त्याला पोलिसांनी अटकही केली आहे अशी माहिती एका वृत्तवाहिनीने दिली आहे. अन्य प्रसारमाध्यमांनी कारण अस्पष्ट असल्याचे सांगितले आहे. अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
या प्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी १२५ हून अधिक जणांवर गुन्हा नोंद केला आहे. तसेच तिघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून इतर आरोपींचाही शोध घेतला जात असून त्यांनाही अटक केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
संपादकीय भूमिका :दंगल कोण घडवते ? वातावरण खराब कोण करते ? हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे संबंधित दंगलखोरांवर पोलीस कारवाई का करत नाहीत ? |