प.पू. भक्तराज महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि कळसारोहण सोहळ्याच्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती !
१. प.पू. भक्तराज महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि कळसारोहण सोहळ्यासाठी कांदळी येथे जाणे
‘मे २०१३ मध्ये पू. नंदूभैय्या (प.पू. भक्तराज महाराज यांचे ज्येष्ठ सुपुत्र पू. नंदू कसरेकर) यांनी कांदळी (जिल्हा पुणे) येथे प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि कळसारोहण यांचा मोठा सोहळा आयोजित केला होता. मला त्या सोहळ्याला उपस्थित रहाण्याचे भाग्य लाभले.
डॉ. (सौ.) कुंदाताई आठवले (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पत्नी) यांनी साधकांचे तेथे जाण्या-येण्याचे नियोजन पुष्कळ छान केले होते. तो ३ दिवसांचा कार्यक्रम होता. आम्ही सर्व जण तेथे गेलो होतो.
२. दोन गृहस्थ भोजनकक्षात सर्वांना पाणी देण्याची सेवा करत असणे आणि त्यांच्याकडे सतत लक्ष जाणे
त्या कार्यक्रमात भोजनकक्षात ५५ ते ६० वर्षे या वयोगटातील दोन गृहस्थ पाणी देण्याची सेवा करत होते. ते कुणाकडेही पहात नव्हते. माझे लक्ष सतत त्यांच्याकडेच जात होते. ‘पांढरी टोपी, गुलाबी सदरा आणि धोतर’, असा त्यांचा वेश होता.
३. त्यांतील एका गृहस्थांनी जवळ येऊन ‘मीच तुला पाणी पाजणार आहे’, असे म्हणणे आणि नंतर ते दोघेही दिसेनासे झाल्याचे लक्षात येणे
कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी सकाळी अल्पाहारासाठी मी एकटीच गेले होते. मी द्रोणात फोडणीचा भात घेऊन एकटीच एका पटलावर बसले होते. अकस्मात् त्या गृहस्थांपैकी जरा बारीक अंगकाठी असलेले एक गृहस्थ पाणी घेऊन माझ्या जवळ आले आणि मला म्हणाले, ‘‘एकटीच आलीस ? पाणी घेतले नाहीस?’’ मी त्यांच्याकडे पहातच राहिले. तेव्हा खाली पहात ते म्हणाले, ‘‘हो, एकटीच आहेस. मीच तुला पाणी पाजणार आहे’’ आणि त्यानंतर ते तेथून निघून गेले. मी मनात म्हटले, ‘दुपारच्या महाप्रसादाच्या वेळी त्यांना भेटून त्यांच्याशी बोलूया.’ मी भोजनाच्या वेळी त्यांना शोधत होते; मात्र ते दोघेही दिसेनासे झाले होते. मला पुष्कळ रुखरुख लागली.
४. ‘ते प.पू. भक्तराज महाराज होते’, असे जाणवणे आणि अतिशय आनंद होणे
तेव्हा ‘ते प.पू. बाबाच होते’, असे मला वाटले. मी बर्याच जणांना विचारले; पण बहुतेक कुणाचेच त्यांच्याकडे लक्ष गेले नव्हते; पण का कुणास ठाऊक ? माझे लक्ष मात्र त्यांच्याकडे सारखे जात होते ! अजूनही मला त्यांचा चेहरा आठवतो. अशा प्रकारे ‘प.पू. बाबा परत भेटले’, याचा मला अतिशय आनंद झाला. प.पू. बाबांच्या चरणी कोटीशः वंदन !
‘देवा, ही अनुभूती दिल्याबद्दल कोटीशः कृतज्ञता !’
– श्रीमती जयश्री मुळे (वय ७७ वर्षे), फोंडा, गोवा. (१४.३.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |