सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !
१. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले भेटणार’, असे कळल्यावर आनंद जाणवणे’, हे प्रगतीचे लक्षण आहे !
सौ. छाया विवेक नाफडे (वय ६३ वर्षे) : मधला बराच काळ आपली भेट झाली नव्हती. तेव्हा माझी स्थिती पुष्कळ वाईट झाली होती; पण ‘आता भेट झाली नाही, तरी चालेल’, असे वाटून माझ्याकडून परिस्थिती स्वीकारली जाते; परंतु जेव्हा ‘तुम्ही भेटणार आहात’, असे कळते, तेव्हा मला पुष्कळ आनंद होतो, म्हणजे मी आणखी मागे मागे (‘स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ’, या दृष्टीने) जात आहे का ?
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : नाही. आपल्याला एखादा पदार्थ आवडला, तर त्याविषयी कळले की, तो आपल्याला आणखी आवडतो ना ! हे प्रगतीचे लक्षण आहे. म्हणजे शब्दांतून आपण बोललो ना, ते निराळे असते. शिकण्याचा आनंद असतो; पण सूक्ष्मातून जेव्हा स्पंदने इत्यादी कळायला लागते, तेव्हा आपण पुष्कळ पुढच्या टप्प्याला गेलेलो असतो.
२. प्रत्येक साधक वेगवेगळ्या साधनामार्गाने साधना करून आध्यात्मिक प्रगती करत असतो !
सौ. छाया नाफडे : अनिमिषला (माझ्या मुलाला) नामजप करण्याची तेवढी आवड नाही. बाकी सेवा भरपूर करतो. मागे त्याला ३ घंटे नामजप करायला सांगितला होता. तो नामजप करत नाही आणि मग त्याच्याकडून प्रत्येक कृती साधना म्हणून होत नाही. तो कार्य चांगले होण्यासाठी प्रयत्न करतो.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : हो; पण कार्य म्हणजेच सेवा ! ‘स्वभावदोष-निर्मूलन आणि गुण-संवर्धन, अहं-निर्मूलन, नामजप, भावजागृतीसाठी करायचे प्रयत्न, सत्संग, सत्सेवा, सत्साठी त्याग अन् प्रीती (इतरांविषयी निरपेक्ष प्रेम)’, ही सर्व साधनेचीच आठ अंगे आहेत. जे व्यष्टी साधना करतात, त्यांच्यासाठी नामजप करणे महत्त्वाचे आहे; पण जे समष्टी साधना करतात, त्यांच्यासाठी ‘सेवा करणे’ फारच महत्त्वाचे आहे. तुमचा मुलगा सेवा करतो ना ? मग झाले ! त्याची काळजी करू नका. प्रत्येक साधक वेगवेगळ्या साधनामार्गाने साधना करून आध्यात्मिक प्रगती करत असतो, उदा. ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तीयोग. तुमचा मुलगा सेवेच्या माध्यमातून साधनेत पुढे चालला आहे. त्याचा ‘कर्मयोग’ हा साधनामार्ग आहे. आपला संप्रदाय नाही की, सगळ्यांनी सारखेच केले पाहिजे. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग’, हा अध्यात्मातील सिद्धांत ऐकला आहे ना ? झाले मग !
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |