गुरुकार्याची तळमळ आणि निरपेक्ष प्रीती यांचा संगम असलेले सनातन संस्थेचे ४२ वे संत पू. अशोक पात्रीकर (वय ७४ वर्षे) !
‘फाल्गुन कृष्ण द्वितीया (२७.३.२०२४) या दिवशी सनातन संस्थेचे ४२ वे संत पू. अशोक पात्रीकर यांचा ७४ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये खाली दिली आहेत.
पू. अशोक पात्रीकर यांना ७४ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. सौ. शुभांगी पात्रीकर, सनातन, आश्रम, देवद , पनवेल. (पू. पात्रीकरकाका यांच्या पत्नी)
१ अ. सतत सेवारत रहाणे : ‘पू. काका गोव्याला घरी येतात, त्या वेळी त्यांचे प्रसारातील सत्संग, साधकांशी बोलणे, अडचणी सोडवणे इत्यादी रात्री उशिरापर्यंत चालू असते. ते उतारवयातही सतत सेवारत असतात.
१ आ. पत्नीला वस्तूत न अडकता साधनेकडेच लक्ष देण्यास सांगणे : माझ्याकडून एक महत्त्वाची वस्तू हरवली होती. त्याविषयी मी पू. काकांना सांगितले असता हानी होऊनही त्यांनी त्या प्रसंगात मला सकारात्मक रहाण्यास सांगितले. ते म्हणाले, ‘‘तू वस्तूत न अडकता तुझ्या साधनेकडेच लक्ष दे.’’ त्यामुळे मला त्या प्रसंगातून लवकर बाहेर पडता आले.
१ इ. तत्त्वनिष्ठता : पू. काका आमच्या कुटुंबातील कुणाचे काही चुकत असेल, तर त्याला त्याविषयी तत्त्वनिष्ठतेने आणि वेळप्रसंगी कठोरतेने जाणीव करून देतात.
१ ई. कृतज्ञतेची जाणीव करून देणे : प्रत्येक प्रसंगात ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आपल्यासाठी किती करतात ?’ असे प्रत्येक वेळी पू. काकांच्या बोलण्यातून येते. ते आम्हाला कृतज्ञतेची जाणीव करून देतात.
१ उ. अनुभूती : पू. काका गोव्याला घरी आल्यावर माझ्यावर आध्यात्मिक उपाय होतात. त्या वेळी मला त्यांचे चैतन्य अनुभवायला मिळते.’
२. कु. तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के , वय ४६ वर्षे) (पू. पात्रीकरकाका यांची मोठी मुलगी), संगीत विशारद, फोंडा, गोवा.
२ अ. साधनेतील अडचणी सोडवणे : ‘सेवेतील काही अडचणींमुळे माझे मन कधी कधी निराश होते. त्या वेळी पू. बाबांशी बोलल्यावर ते त्यावर उपाय सांगतात आणि स्वयंसूचना सिद्ध करून देतात. त्यांच्याशी बोलूनच मला हलके वाटते आणि माझे मन लवकर सकारात्मक व्हायला साहाय्य होते.
२ आ. कुटुंबियांना आध्यात्मिक स्तरावर रहाण्यास साहाय्य करणे : पूर्वीपासून मी पू. बाबांशी कोणताही विषय सहजतेने आणि कोणताही संकोच न ठेवता बोलू शकते. तेही मला समजून घेऊन साधनेविषयी मार्गदर्शन करतात. पुष्कळ प्रसंगांत ‘आतापर्यंत परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्यासाठी काय केले ?’, याची ते मला आठवण करून देतात आणि ‘आध्यात्मिक स्तरावर सतत कृतज्ञताभावात कसे रहाता येईल ?’, याविषयी मार्गदर्शन करतात. त्यामुळे माझाही गुरुदेवांप्रती भाव वाढायला साहाय्य होते.
२ इ. अनुभूती : अमरावती सेवाकेंद्रातील पू. बाबांच्या खोलीत गेल्यावर मन निर्विचार झाल्यासारखे जाणवते, तसेच त्यांच्या खोलीत चैतन्य आणि गारवा जाणवतो. काही वेळा त्यांच्या वस्तूंना दैवी सुगंधही येतो.’
३. सौ. अनघा जोशी (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ४३ वर्षे) (पू. पात्रीकरकाका यांची लहान मुलगी), बी.ए.(संगीत), फोंडा, गोवा.
३ अ. इतरांचा विचार करणे : ‘पू. बाबा गोवा येथे प्रतिवर्षी होणार्या अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनासाठी येत असतात. त्या वेळी त्यांचा निवास घरी असतो. सकाळी त्यांना अधिवेशन स्थळी घेऊन जाण्यासाठी चारचाकी गाडी येते. आमचे घर चढावावर आहे. त्यामुळे वाहन चालकाचा वर येऊन गाडी वळवण्यात वेळ जाऊ नये, यासाठी ते खाली उतरून मार्गाच्या कडेला जाऊन थांबतात. तेव्हा पाऊस असला, तर त्या वेळी ते छत्री घेऊन तेथे थांबतात. तेव्हा ‘चालक साधकाचा वेळ वाचावा’, असा त्यांचा विचार असतो.
३ आ. अनुभूती : डिसेंबर २०२३ मध्ये आम्ही वैयक्तिक कार्यक्रमासाठी विदर्भात गेलो होतो. तेव्हा ‘पू. बाबा सतत समवेत असल्याने मी मायेत असूनही अखंड चैतन्यात आहे’, असे मला जाणवत होते. घरी परत आल्यावरही ते चैतन्य टिकून होते.’
४. श्री. निखील पात्रीकर (पू. पात्रीकरकाका यांचा मुलगा), फोंडा, गोवा.
४ अ. स्वावलंबी : ‘पू. बाबा गोवा येथे आल्यावर त्यांना आश्रमात जायचे असेल, तर ते स्वतः दुचाकी घेऊन जातात. त्यांना पाठदुखीचा त्रास होत असेल, तरच ते वाहन सेवेतील साधकाला घेऊन जाण्यासाठी बोलावतात.
४ आ. विदर्भातील कडाक्याची थंडी आणि उन्हाळ्यातील उष्णता अशा परिस्थितीतही प्रसारकार्य चालू ठेवणे : पू. बाबांचे वय ७४ वर्षे आहे. त्यांची शरीरयष्टीही कृश आहे. विदर्भात हिवाळ्यात कडाक्याची थंडी (अनुमाने १२ ते १८ अंश सेंटीग्रेड तापमान) आणि उन्हाळ्यात कडक उष्णता (अनुमाने ४२ ते ४६ अंश सेंटीग्रेड तापमान) असते. त्या वेळीही पू. बाबा विदर्भातील आणि छत्तीसगढ राज्यातील जिल्ह्यांमध्ये प्रवास करत असतात. केवळ गुरुदेवांचा संकल्प आणि चैतन्य यांच्या बळावर ते समष्टी कार्य करू शकत आहेत. ‘प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळेच मी हे करू शकतो’, असा त्यांचा भाव असतो.
४ इ. साधकांना भेटणे आणि त्यांची विचारपूस करणे : जुलै २०२२ मध्ये पू. बाबा अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनासाठी गोव्याला आले होते. परत जाण्याच्या एक दिवस आधी त्यांना आश्रमातील साधकांना भेटायचे होते. तेव्हा त्यांच्याकडे वेळ अल्प होता, तरीही ते दुचाकी घेऊन आश्रमात गेले आणि सगळ्या साधकांना भेटले. ते प्रत्येक वेळी आश्रमातील साधकांना भेटतात आणि सर्वांची प्रेमाने विचारपूस करतात.
४ ई. पू. पात्रीकरकाका यांच्याविषयी आलेल्या अनुभूती
४ ई १. संत समवेत असल्याने देवाने अन्य व्यक्तींच्या माध्यमातून साहाय्य करणे
अ. आम्ही कुटुंबातील सर्व जण गोवा येथे मंदिरे बघण्यासाठी गेलो होतो. आम्हाला एका मंदिराकडे जाण्यासाठी मार्ग मिळत नव्हता. त्या वेळी ‘पू. बाबांनी गाडीजवळ उभ्या असलेल्या एका व्यक्तीला विचारूया’, असे सांगितले. त्यानुसार त्याला विचारल्यावर त्याने मंदिरापर्यंत आमच्या समवेत येऊन आम्हाला मार्ग दाखवला.
आ. अन्य एका मंदिरात जातांनाही एक व्यक्ती उलट दिशेने जात होती, तरी ती केवळ आम्हाला मार्ग दाखवण्यासाठी आमच्या समवेत आली. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर आणि पू. बाबा यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्ती झाली.
४ ई २. अन्य अनुभूती : पू. बाबांचे कपडे इस्त्री करतांना अनेकदा त्यांच्या कपड्यांना दैवी सुगंध येतो. अमरावती सेवाकेंद्रातील पू. बाबांच्या खोलीत गेल्यावर माझे मन निर्विचार झाले, तसेच त्यांच्या खोलीत चैतन्य आणि गारवा जाणवला.’
५. सौ. नमिता निखील पात्रीकर (पू. पात्रीकरकाका यांची सून), फोंडा, गोवा.
५ अ. ‘प्रसारातील साधक साधनेचे प्रयत्न कसे करतात ?’, याविषयी कुटुंबियांना शिकवणे : ‘आम्ही अमरावती येथे गेलो असतांना सर्व जण एका साधकाच्या घरी जेवायला गेलो होतो. तेथे जेवण झाल्यावर आम्ही एकत्र बसलो होतो. तेव्हा पू. बाबांनी तेथील साधिकेला ‘त्या साधनेचे प्रयत्न कसे करतात ? सेवा आणि कुटुंबीय यांच्या संदर्भात भाव कसा ठेवतात ? पती-पत्नी साधनेत एकमेकांना कसे साहाय्य करतात ? त्यांनी मुलांवर कशा प्रकारे साधनेचे संस्कार केले आहेत ?’, यांविषयी सांगण्यास सांगितले. त्या वेळी ‘पू. बाबांनी प्रसारातील साधक कशा प्रकारे साधनेचे प्रयत्न करतात ?’, हे आम्हाला शिकण्यासाठी तो एक सत्संगच आयोजित केला होता’, असे मला जाणवले. तेव्हा ‘पू. बाबांच्या सान्निध्यात राहून साधनेच्या दृष्टीने शिकण्यासाठी आमचा आध्यात्मिक प्रवासच झाला’, असे मला जाणवले.
५ आ. अनुभूती : पू. काका घरी आल्यावर माझ्यावर आध्यात्मिक उपाय होऊन मला त्यांचे चैतन्य अनुभवायला मिळते. अमरावती सेवाकेंद्रातील त्यांच्या खोलीत गेल्यावर माझे मन निर्विचार झाल्याचे जाणवले, तसेच खोलीत चैतन्य आणि गारवा जाणवला. त्यांच्या वस्तूंना दैवी सुगंधही येत असल्याचे जाणवते.’
६. पू. पात्रीकरकाका यांचे साधनेविषयी मार्गदर्शन
अ. ‘आपल्याला प्रत्येक साधकामध्ये गुरुरूप पहाता यायला हवे, तसेच इतरांवर निरपेक्ष प्रेम करता यायला हवे.
आ. भावजागृतीसाठी वेगळे प्रयत्न करता येत नसल्यास, ‘गुरुमाऊलींनी आपल्याला आतापर्यंत कठीण प्रसंगांत कशाप्रकारे साहाय्य केले ?’, हे आठवून त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, तरी भाव वाढण्यास साहाय्य होते.
इ. साधकांनी प्रतिदिन ‘माझे मन, बुद्धी आणि अहं यांचा लय होऊ दे’, अशी प्रार्थना केल्यास संघर्ष होत असलेल्या प्रसंगांत सकारात्मक विचार करण्यास साहाय्य होते.
ई. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया आपण मनापासून केली नाही, तर आपण करत असलेली व्यष्टी आणि समष्टी साधना व्यर्थ आहे.
उ. अहं मणामणाने वाढतो आणि कणाकणाने अल्प होतो. मणभर प्रयत्न केल्यास कणभर अहं अल्प होतो. त्यामुळे साधकांनी प्रयत्नांत सातत्य ठेवायला हवे.
हे गुरुमाऊली, केवळ आपल्याच कृपेने आम्हाला पू. काकांचा सहवास लाभून त्यांच्याकडून शिकायला मिळत आहे, यासाठी आम्ही पात्रीकर कुटुंबीय आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत. त्यांच्यासारखी साधनेची तळमळ आमच्यात निर्माण होऊन आम्हाला त्यांचा लाभ करून घेता येऊ दे, अशी आपल्या आणि पू. बाबा यांच्या चरणी प्रार्थना आहे.’
सर्व सूत्रांसाठी दिनांक (१३.३.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |