Gaza Ceasefire : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून गाझामध्ये तात्काळ युद्धविरामाचा ठराव संमत !
न्यूयॉर्क – गाझामध्ये रमजानच्या पार्श्वभूमीवर तात्काळ युद्धविरामाचा ठराव संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत नुकताच संमत करण्यात आला. बैठकीत १५ पैकी १४ सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले, तर अमेरिका मतदानापासून दूर राहिली. इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या साडेपाच मासांपासून युद्ध चालू आहे. युद्धबंदीच्या प्रस्तावापासून दूर दूर रहाण्याची अमेरिकेची ही पहिलीच वेळ आहे. याआधी अमेरिकेने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत युद्धबंदीच्या प्रस्तावांवर तीनदा ‘व्हेटो पॉवर’चा वापर केला होता.
इस्रायल-हमास युद्ध रोखण्याचा पहिला प्रस्ताव नोव्हेंबर २०२३ मध्ये माल्टाने, दुसरा डिसेंबर २०२३ मध्ये संयुक्त अरब अमिरातने, तर तिसरा फेब्रुवारी २०२४ मध्ये अल्जेरियाने मांडला होता. तिन्ही प्रस्ताव अमेरिकेने विशेषाधिकार वापरून फेटाळले होते.
इस्रायली शिष्टमंडळाचा अमेरिका दौरा रहित !
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत युद्धबंदीच्या प्रस्तावावरील मतदानाच्या वेळी अमेरिका अनुपस्थित राहिल्याने इस्रायलने चीड व्यक्त केली. अमेरिकेने ‘व्हेटो’चा विशेषाधिकार न वापरल्याने इस्रायलने त्याच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाची वॉशिंग्टन भेट रहित केली आहे.
‘व्हेटो पॉवर’ म्हणजे काय ?
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स आणि चीन हे पाच देश स्थायी सदस्य आहेत. केवळ या देशांनाच ‘व्हेटो पॉवर’ म्हणजेच विशेषाधिकार आहे. पाच सदस्यांपैकी एकाने जरी ‘व्हेटो’ वापरला तर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा प्रस्ताव फेटाळला जातो.