‘केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणा’चे निर्देश !
देशातील रुग्णालयांची ‘आग संरक्षण यंत्रणां’ची पडताळणी मोहीम !
पुणे – उन्हाळ्यामध्ये तापमानात वाढ होऊन रुग्णालयांमध्ये आगीच्या दुर्घटनांचा धोका निर्माण होतो. हे टाळण्यासाठी ‘केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणा’ने (एन्.डी.एम्.ए.ने) सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत. त्याअंतर्गत राज्यांचे आरोग्य विभाग आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांना त्यांच्या अधिकारकक्षेत ही मोहीम राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आदेशानुसार सर्व रुग्णालयांची काटेकोरपणे पडताळणी केली जाणार आहे. यामध्ये रुग्णालयांचे सर्वसमावेशक अग्नी सुरक्षेचा अहवाल, प्रत्यक्ष पडताळणी यांचा समावेश आहे. ‘फायर अलार्म’ (आगीची सूचना देणारा भोंगा), ‘फायर स्मोक डिटेक्टर’ (आगीचा धूर शोधणारे यंत्र), अग्नीशामक यंत्रे, ‘फायर हायड्रंट्स’ आणि ‘फायर लिफ्ट’सह अग्नीरोधक यंत्रणांची पडताळणी, तसेच विद्युत भार लेखा परीक्षण करण्यात येईल.