जिल्ह्यातून १ अपक्ष उमेदवार उभा करण्याचे मराठ्यांना आवाहन !
अंतरवाली सराटी – लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मराठा उमेदवार उभे केल्यास मराठा मते फुटतील. आपली उमेदवारी अर्ज सरकार रहित करू शकते. एका जिल्ह्यातून एकच अपक्ष उमेदवार रिंगणात उतरवण्याचा पर्याय ठेवा. कोणता उमेदवार उभा करायचा तो निर्णय तुम्ही घ्या, मी सांगणार नाही, असे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. मराठा समाजाला मोठ्या प्रमाणावर अर्ज भरण्याचे आवाहन जरांगे यांनी पूर्वी केले होते.
स्त्रोत: टीव्ही 9 मराठी
जरांगे अंतरवाली सराटीमध्ये बोलवलेल्या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलत होते. ते पुढे म्हणाले की, राजकीय शक्ती दाखवायची असेल, तिचे मतांमध्ये रूपांतर करायचे असेल, तर अर्ज भरू नका. एक उमेदवार द्या आणि त्याला निवडून आणा म्हणजे ताकद दिसेल. मी राजकारणात जाणार नाही. निवडणुकीला उभा रहाणार नाही; पण मराठा मतपेढी काय आहे, ती ताकद दाखवून देईन.
मराठा समाजाला आवाहन करतांना ते म्हणाले की, मराठा समाजाने कोणत्याही सभेला जायचं नाही. कोणत्याच पक्षाचा प्रचार करायचा नाही; मात्र मराठा समाजाने शंभर टक्के मतदान करायचे आहे. मराठा समाजाचे १७ ते १८ मतदारसंघांवर वर्चस्व आहे. मराठ्यांनी निर्णय घेतला, तर मुसलमान आणि दलित आपल्या समवेत आहेत.
दुसरा पर्याय म्हणजे आपण अर्ज न भरता मराठा समाजाने कोणत्याही पक्षाचा असेल त्याच्याकडून बॉण्ड लिहून घ्यायचा ‘तू सग्यासोयर्यासाठी आणि मराठा आरक्षणासाठी आवाज उचलणार का..?’ हा प्रश्न त्या उमेदवाराला विचारला गेलाच पाहिजे.