रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जाण्यासाठी निघाल्यावर ओढवलेल्या कठीण परिस्थितीमध्ये साधकाने अनुभवलेली गुरुकृपा !
‘सच्चिदानंद परब्रह्म श्री गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले), आपल्या अनंत आणि अपार अशा कृपेला मी शब्दांमध्ये कसे मांडू ? आपणच माझ्याकडून ही सेवा ‘कृतज्ञता’ म्हणून करून घ्या’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.
१. ‘रामनाथी आश्रमात सेवेला जायचे आहे’, असा निरोप मिळाल्यावर प्रतिदिन वेगळाच आनंद आणि उत्साह जीवनात अनुभवता येणे अन् गुरुभेटीची ओढ लागणे
‘माझी आई (सौ. रेखा अरुण सोनार, वय ४६ वर्षे), मी (श्री. संकेत सोनार, वय २३ वर्षे) आणि माझा लहान भाऊ (श्री. वेदांत सोनार, वय २१ वर्षे) यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवेला जायचे आहे’, असा निरोप मिळाला. तेव्हा आम्हाला प्रतिदिन एक वेगळाच आनंद आणि उत्साह जीवनात अनुभवता येऊ लागला. रामनाथीला जाण्याची वेळ जवळ येऊ लागल्यावर आमचे चेहरे उजळू लागले. प्रत्येकाच्या चेहर्यावर आनंद झळकू लागला आणि आम्हाला गुरुभेटीची ओढ लागली.
२. रामनाथी (गोवा) येथे जाण्याचे निश्चित होणे
मी आणि माझा लहान भाऊ वेदांत फेब्रुवारी २०२३ मध्ये झालेल्या कार्यशाळेच्या निमित्ताने रामनाथी आश्रमात जाऊन आलो होतो. तो आनंद आम्ही परत अनुभवू शकणार होतो. माझी आईसुद्धा पहिल्यांदाच रामनाथीला जाणार होती. त्यामुळे प्रतिदिन आमच्या परिवारात आश्रम आणि तेथील कार्यपद्धती अन् तेथे अनुभवलेला आनंद यांविषयी चर्चा होत असे. त्यामुळे आईलाही आश्रमात जाण्याची प्रचंड ओढ निर्माण झाली. अकस्मात् बाबांना (श्री. अरुण सोनार यांना) शिरपूर येथे जावे लागले आणि लहान भाऊ वेदांतचेही या दिवसात परीक्षेचे नियोजन झाल्याने तो १७.७.२०२३ ऐवजी २२.७.२०२३ या दिवशी येण्याचे निश्चित झाले आणि मी अन् आईने ‘आताच जाऊया’, असे ठरवले.
३. गोव्याला जातांना प्रवासात अनुभवलेले भावक्षण
३ अ. फलाटावर आगगाडीची वाट पहातांना प्रत्येक क्षणाला गुरुकृपेचा आनंद अनुभवता येणार असल्याने कोणताही विचार न करता प्रत्येक क्षणी भाव ठेवून गुरूंना अनुभवण्याचे ठरणे : १७.७.२०२३ च्या सकाळी ९.३० च्या ‘गोवा एक्सप्रेस’ने आम्हाला जायचे होते. मी आणि आई असा आमचा पहिलाच प्रवास होता. तोही गुरुचरणी जाण्याचा ! त्यामुळे आम्ही फार आनंद अनुभवत होतो. आम्ही स्थानकावर पोचल्यावर मी आईला म्हणालो, ‘‘आई, या प्रवासात आता केवळ तू आणि मीच आहोत. हा प्रवास आपल्यासाठी पुष्कळ महत्त्वाचा आणि जीवन पालटवणारा ठरणार आहे. आपल्याला प्रत्येक क्षणाला गुरुकृपेचा अनुभव येणार असून आनंद अनुभवता येणार आहे; म्हणून कुठलाही विचार किंवा काळजी न करता आपण तो आनंद घेऊ या. ‘प्रत्येक क्षणी भाव ठेवून आपण गुरूंना अनुभवूया’, असे म्हणून आम्ही दोघे फलाटावर गाडी येण्याची वाट बघत बसलो.
३ आ. ‘आगगाडी म्हणजे गुरुदेवांचा रथ आहे’, असा भाव ठेवणे : आम्ही येणार्या आगगाडीकडे बघितले. तेव्हा ‘गुरुदेवांचा रथ आम्हाला न्यायला आला आहे’, असा भाव ठेवला. हा रथ आपल्याला सरळ गुरुचरणी घेऊन जाणार असून आम्ही दोघे अत्यंत भावावस्थेत आनंदाचे क्षण अनुभवू लागलो. आम्ही येणार्या आगगाडीला नमस्कार केला.
४. प्रवासास आरंभ केल्यावर गुरुकृपा अनुभवणे
४ अ. आगगाडी गतीने पुढे जाऊ लागल्यावर गर्दी असलेल्या गाडीच्या दारातून साधक खाली पडणे आणि आई कुठल्याही संपर्क यंत्रणेविना आगगाडीतच रहाणे : आईजवळ सामानाच्या बॅगा देऊन तिला आत चढवले आणि मीही गाडीत चढलो; परंतु पुढे जायला जागाच नव्हती आणि गाडी चालू झाली. मी डब्याच्या दारातच राहिलो. गाडीत इतकी प्रचंड गर्दी होती की, आईला माझी फार काळजी वाटत होती. तिने मला अगदी घट्ट पकडून ठेवलेले होते. मलाही जाणवत होते की, आपण उतरून जावे. गाडीत टिकून रहाणे काही शक्य नाही; पण आईला एकटे सोडून मी कसा उतरणार; कारण आईकडे भ्रमणभाष नव्हता आणि माझ्याजवळ पैसे नव्हते. सर्व पैसे आई समवेत दिले होते; म्हणून ‘आता आपण गाडीतच चढायचे’, असा विचार मी केला आणि हळूहळू गाडीची गती वाढली. त्यानंतर गर्दीमुळे मला आतून धक्का लागला आणि चालत्या गाडीतून बॅगसहित मी गाडीपासून अगदी अर्धा फूट अंतरावर फलाटावर पडलो. माझ्या आईने मला पडतांना बघितले आणि मला केवळ तिची ती अत्यंत आक्रोश करणारी किंचाळी ऐकू आली. मी फलाटावर पडलो आणि आई कुठल्याही संपर्क यंत्रणेविना गाडीतच राहून गेली. पुढचे स्थानक कुठले येणार ? हेसुद्धा तिला ठाऊक नव्हते. त्यामुळे ती रडत होती.
४ आ. साधक फलाटावर पडतांना गुरुकृपेने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्याला तळहातावर पकडणे आणि त्याला थोडेही न खरचटणे अन् फलाटावरील फरशीवर आदळल्याचेही न आठवणे : मी चालत्या गाडीतून पडलो, हे माझ्या लक्षात आले. अगदी अर्धा फुटाच्या अंतरावर आगगाडी माझ्या बाजूने जात होती. मी काही क्षण जरी विलंबाने पडलो असतो किंवा माझा हात किंवा पाय थोडा जरी तिरपा असता, तर नक्कीच मी … गुरुदेव, मला अजूनही तो एक एक क्षण आठवत आहे. तुम्ही मला तळहातावर पकडलेले आहे. या देहाला थोडेही खरचटले नाही. गुरुदेव, मी प्रत्यक्ष अनुभवलेली आपली कृपा शब्दांत लिहू तरी कशी !
४ इ. गुरुकृपेने व्यवस्थित असल्याचे आईला सांगायलाही काही सुविधा नसल्याने काळजी वाटणे : माझी आई आगगाडीत राहिली होती. तिच्याशी ‘मी कसा संपर्क करावा ?’, याची मला फार काळजी वाटत होती. तिने मला पडतांना बघितले. तेव्हा तिने स्वतःच गाडीतून उडी मारण्याचा प्रयत्नही केला होता; परंतु अन्य प्रवाशांनी तिला अडवले होते. ‘गुरुकृपेने मी व्यवस्थित आहे’, असे मला तिला सांगायलाही काही सुविधा नव्हती. तसेच त्या डब्यात धर्मांधही पुष्कळ प्रमाणात होते.
४ ई. आईने गाडीतील एका मुलीच्या भ्रमणभाषवरून भावाला संपर्क करून एका साधकाला संपर्क करणे अन् आईची मनमाड स्थानकावर उतरण्याची सोय होणे आणि नंतर वडिलांनी आईला घरी आणणे : त्यानंतर एका ताईच्या रूपात गुरुदेव आपणच आईकडे आलात. तिच्या भ्रमणभाषवरून आईने साधक वेदांतशी संपर्क साधला; कारण त्याचाच संपर्क क्रमांक आईच्या लक्षात होता. त्यानंतर आईचा आणि माझा संपर्क झाला अन माझा आवाज ऐकताच ती रडू लागली. नंतर मी जळगाव आश्रमाशी संपर्क साधला. त्यांनी आईला मनमाड स्थानकावर उतरायला सांगितले. ‘तेथे मनमाडचे साधक श्री. शशिकांतदादा सुरवाडकर यांच्या रूपात गुरुदेव आपणच तेथे आलात आणि आईला सुखरूप गाडीतून उतरून घेतलेत.’ गुरुदेवांनी बाबांना अगोदरच शिरपूरला पाठवले होते. ते लगेच तेथून आईला घ्यायला मनमाडला गेले आणि रात्री ९.४० वाजता बाबा आईला घेऊन घरी आले.
५. कठीण क्षणांमध्ये साहाय्य करणारे गुरुदेव असणे
मी चालत्या गाडीतून पडूनही या देहाला फुलासारखे झेलणारे कोण होते ? आईशी संपर्क करून देण्यासाठी त्या आगगाडीच्या डब्यात ताईच्या रूपात आलेले कोण होते ? आई गाडीतून उडी घेण्याच्या प्रयत्नात असतांना तिला अडवणारे कोण होते ? आईला वेदांतचा संपर्क क्रमांक आठवून देणारे कोण होते ? साधक श्री. शशिकांतदादा यांच्या रूपात आईला मनमाड स्थानकावर घ्यायला येणारे कोण होते ? ‘बाबांनी अकस्मात् शिरपूरला जावे’, असा विचार देणारे कोण होते ? हे गुरुदेवा, हे सर्व करणारे तुम्हीच तर आहात !
६. प्रत्येकाच्या मनातील विश्वास अन् श्रद्धा यांमुळे कठीण काळ येऊनही सर्व जण रात्री एकत्र आल्यावर पुष्कळ आनंदी असणे
‘गुरुदेव आपल्याला काहीच होऊ देणार नाहीत’ आणि ‘जेथे गुरुदेव आहेत, तेथे काळजी कसली ?’ प्रत्येकाच्या मनातील या विश्वास अन् श्रद्धा यांमुळे इतका कठीण काळ गेल्यानंतरही आम्ही चारही जण रात्री एकत्र आल्यावर पुष्कळ आनंदात होतो. हे माझ्यासाठी फार मोठे आश्चर्य होते.
७. गुरूंच्या चरणी जाण्याची ओढ अतिशय तीव्र होणे
आता गुरूंच्या चरणी जाण्याची ओढ अतिशय तीव्र झाली होती. बाबांनीही कुठल्याही प्रकारचा नकार न देता लगेच पुढच्या दिनांकाची तिकिटे काढून दिली. गुरूंच्या कृपेने १९.७.२०२३ या दिवशी आम्ही तिघे नव्या उत्साहाने रामनाथी आश्रमात येण्यास निघालो.
‘हे गुरुदेव, आपण सच्चिदानंद आहात. आपण हा आनंद कित्येक साधकांच्या जीवनात सढळ हस्ते प्रदान करत आहात. आपल्याच कृपेमुळे माझ्या परिवाराला नवीन जीवन मिळाले आहे. मी कृतज्ञता व्यक्त कशी करू ? हे गुरुदेवा, या जीवनाचा प्रत्येक क्षण आपल्या चरणी अर्पित होऊन आपल्या चरणांची पूर्णवेळ सेवा माझ्याकडून करून घ्या. आपणच आम्हाला कृतीतून कृतज्ञता अर्पित करण्यासाठी आवश्यक असणारे बळ आणि शक्ती प्रदान करा’, अशी आपल्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’
– श्री. संकेत अरुण सोनार (वय २३ वर्षे), जळगाव, महाराष्ट्र. (१.८.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |