सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या अर्थसंकल्पात १०० कोटी रुपयांची तूट !
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचा अनुमाने ६२७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून त्यात जवळपास १०० कोटी रुपयांची तूट आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अर्थसंकल्पात २४ कोटींची तूट अधिक आहे. त्यामुळे विद्यापिठावर उत्पन्नाचे नवे स्रोत शोधण्याची वेळ आली आहे. अर्थसंकल्पात मांडलेल्या आणि छापील मजकुरामध्ये चुका आढळल्याने सिनेट सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरून चुका दुरुस्त करण्याची मागणी केली. (अशा चुका कशा काय होतात ? याचा शोध घ्यायला हवा ! – संपादक)
विद्यापिठाच्या वतीने आर्थिक वर्ष २०२४-२५ चा अर्थसंकल्प व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. देविदास वायदंडे यांनी सादर केला. या वेळी कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी, कुलसचिव डॉ. विजय खरे आदी उपस्थित होते. विद्यापिठाच्या अर्थसंकल्पात ५२७ कोटी ८८ लाख रुपयांची जमा आणि ६२७ कोटी १५ लाख रुपयांचा खर्च दाखवला आहे. तूट वाढल्याने अनेक सदस्यांनी चिंता व्यक्त करून खर्च अल्प करण्यासाठी आणि उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या.