सेवा करतांना सौ. गौरी कुलकर्णी यांना आलेल्या अनुभूती

१.  प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनातील ‘एक तुझे नाम शास्त्रांचा आधार ।’ ही ओळ ऐकल्यानंतर ‘नामजपातूनच सर्व काही साध्य होणार आहे’, असा विचार येऊन समयमर्यादेत सेवा पूर्ण होणे

सौ. गौरी कुलकर्णी

‘माझ्याकडे संहितेचे लिखाण करण्याची सेवा असते. एकदा मला एका विषयावर संहिता लिहायची होती; पण अन्य काही सेवांमुळे त्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी मला पुरेसा वेळ मिळत नव्हता. ती सेवा पूर्ण करण्याची समयमर्यादाही संपत आली होती. त्या वेळी ‘विषयाचा अभ्यास पुरेसा नाही, तर कसे होणार ? आता कसे करायचे ?’, असा विचार माझ्या मनात आला. त्या वेळी सहसाधिकेशी (अश्विनी कुलकर्णीताई यांच्याशी) बोलून घेतल्यावर तिने मला सेवा करण्यापूर्वी देवाला शरणागतीने प्रार्थना करण्यास सांगितले. सेवेला आरंभ करण्यापूर्वी मी ध्यानमंदिरात गेले. मी देवाला शरण जाऊन आत्मनिवेदन केले. त्या वेळी मी ‘इअर फोन’ लावून प.पू. भक्तराज महाराज यांची भजनेही ऐकत होते. त्या भजनातील एक ओळ होती, ‘एक तुझे नाम शास्त्रांचा आधार ।’ ही ओळ ऐकल्यानंतर माझ्या मनात ‘माझा अभ्यास नाही’ किंवा ‘मी लिहू शकणार नाही’, असे जे विचार येत होते, ते नाहीसे झाले आणि ‘नामजपातूनच सर्व काही साध्य होणार आहे’, असा विचार माझ्या मनात आला. त्यानंतर माझ्याकडून सहजतेने आणि समयमर्यादेत ती सेवा पूर्ण झाली.

२. सूत्राविषयी चिंतन झाले नसतांनाही देवाच्या कृपेने कार्यशाळेत उत्स्फूर्तपणे विषय मांडता येणे

एकदा कार्यशाळेत एक विषय मांडायचा होता. तो विषय मांडत असतांना माझ्याकडून पुढील सूत्र मांडले गेले. ‘भगवंत भक्ताच्या हाकेला धावून येतो. जेव्हा भक्त प्रल्हादाने नारायणाला हाक मारली आणि भगवंताने अवतार धारण करण्याची वेळ झाली, तेव्हा क्षणाचाही विलंब न करता भगवंत नृसिंह रूपात प्रगट झाले आणि भगवंताने प्रल्हादाला त्रास देणार्‍या हिरण्यकश्यपूचा नाश केला. ‘एका भक्तासाठीही भगवंत अवतार घेतो’, हे हिंदु धर्माचे वैशिष्ट्य आहे.’ प्रत्यक्षात या सूत्राविषयी माझे चिंतन झाले नव्हते; पण माझ्याकडून हे सूत्र मांडले गेले आणि शेवटचे वाक्य सांगत असतांना माझी भावजागृती झाली. दुसर्‍या दिवशी पुरी पिठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांची एक ध्वनीफीत ऐकतांना त्यात त्यांनीही भक्त प्रल्हादाचे उदाहरण देऊन ‘जेव्हा अवतार घ्यायचा असतो, तेव्हा भगवंत क्षणाचाही विलंब न करता प्रगट होतो’, असे सांगितले. ते ऐकल्यानंतर माझी कुठलीही पात्रता आणि बुद्धीची क्षमता नसतांना देवाने विचार सुचवले, यासाठी मला कृतज्ञता वाटली.’

– सौ. गौरी नीलेश कुलकर्णी, फोंडा, गोवा. (१०.२.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक