देवतांच्या वरापेक्षा दानधर्माला महत्त्व देणारा थोर चक्रवर्ती राजा खटवांग !
‘श्रीरामाच्या कुळातील राजा खटवांग हा त्रेतायुगातील एक थोर चक्रवर्ती राजा होता. एकदा देव-असूर युद्धामध्ये देवतांची बाजू कमकुवत होऊ लागल्यावर देवतांनी खटवांग राजाला मदतीसाठी बोलवले. खटवांग राजाने देवतांना असुरांच्या विरोधात विजय मिळवून दिला. या युद्धानंतर देवतांनी प्रसन्न होऊन खटवांग राजाला वर मागण्यास सांगितला. त्या वेळी राजाने देवतांना विचारले की, ‘माझे आयुष्य अजून किती शिल्लक आहे ?’ देवतांनी सांगितले ‘केवळ एक मुहूर्त ! (हल्लीची ४८ मिनिटे)’ ते ऐकून राजा खटवांगला ‘स्वतःकडे पुष्कळ अल्प कालावधी शिल्लक आहे’, हे लक्षात आल्यावर तो वर न मागताच स्वर्गातून वायूवेगाने पृथ्वीवर परत आला. त्याने स्वतःची संपत्ती गरीब आणि ब्राह्मण यांना दान केली अन् विष्णुस्तुती केली. त्यानंतर त्याने देहत्याग करून वैकुंठगमन केले.