पुणे येथील साधिका सौ.अर्चना चांदोरकर यांना सेवा करतांना आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे
‘मागील ८ – ९ वर्षांपासून गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेनेच मी पुणे जिल्ह्यातील विज्ञापनाशी संबंधित सेवा करत आहे. ‘गुरुदेवांनी या जिवाला सेवेची संधी देऊन कसे घडवले ?’, याविषयीची सूत्रे आणि सेवा करतांना मला आलेल्या अनुभूती श्रीगुरुचरणी कृतज्ञताभावाने समर्पित करते.
(भाग १)
१. परात्पर गुरुदेवांनी साधकाची योग्यता पाहून नव्हे, तर साधकाला पात्र बनवण्यासाठी सेवा देणे
शालेय जीवनात मला अभ्यासाविषयी आत्मविश्वास अल्प होता. त्यामुळे आताही ‘मला विज्ञापनाची सेवा जमणार नाही’, असे वाटते होते. प्रारंभी मी अर्धवेळ नोकरी करून सेवा करत असल्यामुळे मला सेवेला अल्प वेळ मिळत असे. त्यामुळे ती सेवा अन्य साधकाला देण्यात आली; परंतु त्या साधकालाही सेवा करणे शक्य नसल्याने गुरुकृपेने मला पुन्हा ती सेवा मिळाली. ही सेवा करतांना मला शिकायला मिळाले की, व्यवहारात व्यक्तीची पात्रता पाहून नोकरी देतात; परंतु परात्पर गुरुदेव सेवा देतांना त्या साधकाची योग्यता पाहून नाही, तर त्याला पात्र बनवण्यासाठी सेवा देतात.
२. सेवेची व्याप्ती लिहून काढणे आणि सेवेच्या माध्यमातून गुणांचा विकास होणे
विज्ञापनाच्या सेवेमध्ये कार्यपद्धतीचे पालन करण्याला पुष्कळ महत्त्व आहे. उत्तरदायी साधकांनी सांगितल्यानुसार मी सेवेची व्याप्ती आणि कार्यपद्धत लिहून काढली. त्यामुळे मला खर्या अर्थाने सेवा करण्यासाठी दिशा मिळाली आणि सेवेतून आनंद मिळाला. या सेवेच्या माध्यमातून गुरुदेवांनी मला पुढीलप्रमाणे अनेक गुण आत्मसात करण्याची संधी दिली.
२ अ. नियोजन कौशल्य : मी विज्ञापनाच्या प्रत्येक सेवेचे आठवड्यातील वारानुसार नियोजन केले. त्यामुळे सेवेत सुसूत्रता येऊ लागली. त्यामुळे सेवेचा ताण अल्प होऊन सेवा सुरळित होऊ लागली.
२ आ. व्यवस्थितपणा : विज्ञापनाचे विनंतीअर्ज अंकानुसार वेगवेगळ्या प्रकारे ठेवणे, अधिकोषात पैसे भरणा करण्याच्या पावत्या नीट ठेवणे, असे प्रत्येक साहित्य व्यवस्थित ठेवण्याचा संस्कार माझ्या मनावर होऊ लागला.
२ इ. चिकाटी : विज्ञापनाची सेवा समयमर्यादेत पूर्ण करणे आवश्यक असते. त्यामुळे ‘अडचणी आणि परिस्थिती यांवर मात करून ती पूर्ण करायचीच’, असा गुरुदेवांनी माझ्याकडून निश्चय करवून घेतला. त्यामुळे ‘चिकाटी’ आणि ‘परिस्थितीला न डगमगता संघर्ष करून सेवा करणे’ हे गुण मला शिकायला मिळाले.
२ ई. एकाग्रता : विज्ञापनांचे अर्ज, पावत्यांच्या नोंदी हे सर्व ‘ई.आर्.पी.’ (संगणकीय नोंदी करणे) करतांना आरंभी माझ्याकडून पुष्कळ चुका होत होत्या. तेव्हा चुकांमुळे होणारा परिणाम लक्षात येऊ लागल्यावर त्या होऊ नयेत, यासाठी प्रत्येक ई.आर्.पी. नोंद करतांना ती शांतपणे आणि एकाग्रतेने करण्यासाठी माझ्याकडून प्रयत्न होऊ लागले. त्यातून माझ्या मनाची एकाग्रता वाढू लागली.
२ उ. अभ्यासूवृत्ती : ‘विविध विशेषांकांसाठी लागणार्या विज्ञापनांचा अभ्यास करून कोणत्या दिवशी कोणती सेवा करायची ? ती सेवा अजून चांगली होण्यासाठी कसे प्रयत्न करायचे ?’, असे विचार माझ्याकडून होऊ लागले. त्यामुळे अभ्यासपूर्ण सेवा करण्याचे महत्त्व माझ्या लक्षात येऊ लागले.
गुरुदेवांच्या कृपेनेच या सेवेच्या माध्यमातून वरील गुणांचा विकास माझ्यामध्ये होऊ लागला. ‘कार्यपद्धतीनुसार सेवा करणे, सेवा परिपूर्ण करणे, चुकांचे चिंतन करणे, उपाययोजना काढणे’, असे प्रयत्न माझ्याकडून झाले. त्यामुळे माझ्यामध्ये आत्मविश्वास वाढू लागला. ‘मला घडवण्यासाठीच ही सेवा मला मिळाली, हे परात्पर गुरुदेवांचेच नियोजन आहे’, हे लक्षात आल्यावर मला सेवेतून आनंदाची अनुभूती घेता येऊ लागली.
३. सेवा करतांना साधनेचेही प्रयत्न होणे
त्यानंतर माझ्याकडील विज्ञापनाची सेवा हस्तांतरित होऊन मला संरचनेची सेवा मिळाली. ‘विज्ञापनाच्या सेवेत काही चूक राहिल्यास आपण ती नंतर सुधारू शकतो; परंतु विज्ञापन प्रसिद्ध झाल्यानंतर ते सुधारू शकत नाही’, या विचाराने माझे सेवेप्रतीचे गांभीर्य आणखी वाढले. सेवा परिपूर्ण करतांना साधनेचे प्रयत्न करण्याचे महत्त्व मला गुरुदेवांनी शिकवले. विज्ञापनाची अंतिम तपासणी करतांना त्यातील बारकावे लक्षात येण्यासाठी देवाला शरण जाऊन प्रार्थना आर्ततेने होऊ लागली.’ (क्रमशः)
– सौ. अर्चना चांदोरकर, पुणे (१६.८.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |