केलेला निश्चय कठोरतेने पाळणारे आणि हठयोग्याप्रमाणे साधना करणारे सनातनचे ४० वे (व्यष्टी) संत पू. गुरुनाथ दाभोळकर (वय ८४ वर्षे) !
१. मनावर पूर्ण संयम असणारे पू. गुरुनाथ दाभोळकर !
१ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘चहा विषासमान आहे’, असे म्हटल्यावर चहा त्वरित सोडणारे पू. गुरुनाथ दाभोळकर ! : ‘फेब्रुवारी २०२४ मध्ये पू. गुरुनाथ दाभोळकर एका साधकाच्या घरी गेले होते. तेव्हा साधकानी त्यांना विचारले, ‘‘चहा घेणार ना’’ ? त्यावर पू. दाभोळकरकाका म्हणाले, ‘‘वर्ष १९९७ मध्ये मी एका साधकाकडून ऐकले, ‘प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘चहा विषासमान आहे.’ तेव्हापासून मी चहा घेत नाही.’’
१ आ. कॉफी पिण्याच्या विचाराने नामजपात लक्ष एकाग्र होऊ न शकल्याने कॉफी प्यायची सोडणे : त्या साधकाने पू. दाभोळकरकाकांना विचारले, ‘‘मग कॉफी करू का ?’’ तेव्हा ते त्याला म्हणाले, ‘‘वर्ष २००७ पासून मी कॉफीही सोडली.’’ मी त्यांना कॉफी सोडण्याचे कारण विचारले. तेव्हा त्यांनी मला पुढील प्रसंग सांगितला, ‘‘वर्ष २००७ मध्ये मी समष्टीसाठी नामजप करीत असे. एकदा धर्मसभेच्या सेवेमध्ये अनिष्ट शक्तींचे अडथळे येत असल्याने मला त्यासाठी दीड घंटा नामजप करायला सांगितला होता. मी नामजपाला बसण्यापूर्वी देवद आश्रमातील एक साधिका मला म्हणाली, ‘‘तुम्हाला कॉफी आणून देऊ का ?’’ मी म्हणालो, ‘‘ दे.’’ नामजपाला बसल्यानंतर थोड्या वेळाने माझ्या मनात विचार आला, ‘आता कॉफी येईल.’ तो विचार नामजपाच्या मधे मधे मनात येत राहिला व नामजपाची वेळ संपली, तरीही साधिका कॉफी घेऊन आली नाही. ती साधिका कॉफी आणायला विसरली होती. नामजप झाल्यानंतर मला वाटले, ‘एवढ्या क्षुल्लक गोष्टीसाठी नामजप करतांना मधे मधे माझ्या मनात कॉफीचे विचार येऊन मी नामजपावर लक्ष केंद्रीत करू शकलो नाही’; म्हणून तेव्हाच मी निश्चय केला, ‘यापुढे मी कधीही कॉफी पिणार नाही.’’
तेव्हापासून पू. दाभोळकरकाकांनी कॉफी सोडली आणि आजपर्यंत पुन्हा कधीही कॉफी घेतली नाही.
१ इ. पथ्य असल्यामुळे आवडीचे पदार्थ असले, तरी न खाणे : वैद्यकीयदृष्ट्या त्यांना बरीच पथ्ये आहेत; परंतु त्यांचे खाण्या-पिण्यावर विशेष नियंत्रण आहे. पथ्य असल्याने त्यांना कितीही आवडीचे पदार्थ किंवा फळे खायला दिली, तरी ते खात नाहीत. वरील सूत्रांवरून त्यांच्यात ‘मनोनिग्रह’ हा गुण दिसून येतो.
२. हठयोग्याप्रमाणे केलेली साधना !
२ अ. जिद्द, चिकाटी आणि तळमळ : पू. दाभोळकरकाका समष्टीसाठी नामजप करतात. नामजप करत असतांना त्यांना न्यासही करावा लागतो. तेव्हा ते सलग २ – ३ घंटे उजव्या हाताचा तळवा नाकासमोर धरून न्यास करतात. एकदा त्यांनी सलग ५ घंटे न्यास करून नामजप केला होता. आम्ही थोडावेळ न्यास केला, तरी आमचा हात दुखतो; पण पू. दाभोळकरकाका या वयातही न थकता न्यास करून नामजप करतात. यावरून त्यांच्यातील जिद्द, चिकाटी, तळमळ हे गुण लक्षात आले.
२ आ. नामजप करतांना अंगाला कंड सुटली, तरीही न खाजवणे : ‘नामजप करतांना अंगाला कंड सुटली, तरी त्याकडे दुर्लक्ष केल्याने ती थोड्या वेळाने आपोआप न्यून होऊन पूर्णपणे थांबते’, असा त्यांचा अनुभव आहे.’
– श्री. अतुल पवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(२४.२.२०२४)