सरकारच्या ‘कोकण विकास महामंडळा’ची दुरवस्था : गुंतवणूक केलेली सर्व आस्थापने बंद !
मुंबई, २५ मार्च (वार्ता.) – कोकणाच्या विकासाकरता स्थापन करण्यात आलेल्या ‘कोकण विकास महामंडळा’ची अत्यंत दुरवस्था झाली आहे. कोकणाच्या विकासाकरता विविध आस्थापनांनी या महामंडळाशी गुंतवणूक करून चालू केलेले जवळजवळ सर्व प्रकल्प निष्क्रीय आहेत, तर काही प्रकल्प बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. सरकारच्या दुर्लक्षामुळे महामंडळाला प्रतिवर्षी मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत असून हे महामंडळ सध्या बंद पडण्याच्या मार्गावर आहे.
कोकणात विविध रोजगार येण्याच्या दृष्टीने महामंडळाने विविध २७ आस्थापनांसमवेत गुंतवणूक केली होती; मात्र सद्यस्थितीत यांतील १५ प्रकल्प निष्क्रीय आहेत, तर काही आस्थापनांनी गुंतवणूक रहित केली आहे. या सर्व प्रकल्पांमध्ये महामंडळाने १ कोटी ५१ लाख ३७ सहस्र ९८० रुपये गुंतवले आहेत. वर्ष २०२१-२२ या आर्थिक वर्षांत कोकण विकास महामंडळाला १ लाख ३५ सहस्र २२७ रुपये इतका तोटा झाला, तर वर्ष २०२२-२३ या आर्थिक वर्षांत ९ लाख ६० सहस्र ३७२ रुपये इतका तोटा झाला आहे. मासेमारीसाठी ‘कोकण विकास महामंडळाने कोकण सी फूड्स लिमिटेड’ या आस्थापनासमवेत गुंतवणूक केली होती; मात्र महामंडळाच्या निष्क्रीयतेमुळे ही गुंतवणूक रहित केली आहे. अशा प्रकारे अन्यही काही आस्थापनांनी गुंतवणूक रहित केली आहे.
महत्त्वाचे प्रकल्प बंद !
यापूर्वी कोकण विकास महामंडळाने चालू केलेले जहाज तोडणी प्रकल्प, फेरो सिमेंट बोट प्रकल्प, गायीच्या विर्यापासून वळूची निर्मिती करणारे जैविक केंद्र हे कोकणाच्या विकासाकरता असलेले महत्त्वाचे प्रकल्प काँग्रेस सरकारच्या काळात बंद करण्यात आले आहेत. यासह काथ्याप्रकल्प, मीठ प्रकल्प, रबर प्रकल्प, तेलताड प्रकल्प आदी प्रकल्प महामंडळाने अन्य आस्थापनांकडे हस्तांतरित केले आहेत.