Goa Loksabha Election : सौ. पल्लवी धेंपे या भाजपच्या दक्षिण गोवा मतदारसंघाच्या उमेदवार !
पणजी, २४ मार्च (वार्ता.) : लोकसभा निवडणुकीच्या तिसर्या टप्प्यात ७ मे या दिवशी गोव्यात निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी अखेर भाजपने गोव्याचे उद्योजक श्रीनिवास धेंपे यांच्या पत्नी सौ. पल्लवी धेंपे यांना दक्षिण गोवा मतदारसंघासाठी उमेदवारी घोषित केली आहे. भाजपने उत्तर गोव्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांना यापूर्वीच उमेदवारी घोषित केली आहे.२३ मार्च या दिवशी देहली येथे मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या संसदीय समितीच्या बैठकीत सौ. पल्लवी धेंपे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते आणि २४ मार्च या दिवशी याची केवळ औपचारिक घोषणा झालेली आहे. प्रारंभी दक्षिण गोव्यासाठी माजी खासदार नरेंद्र सावईकर, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर आणि माजी आमदार दामू नाईक या तिघांची नावे चर्चेत असतांनाही संसदीय समितीने गोवा प्रदेश भाजपकडून इच्छुक महिला उमेदवारांची नावे मागितली.
या वेळी भाजपने महिला मोर्चाच्या माजी अध्यक्षा सौ. सुलक्षणा प्रमोद सावंत, दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षा सुवर्णा तेंडुलकर, महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा विद्या गावडे आणि लेखिका तथा प्रखर हिंदुत्वनिष्ठ शेफाली वैद्य आदींची नावे पाठवली होती. त्यानंतर या सूचीत सौ. पल्लवी धेंपे यांच्या नावाची भर पडली होती. ‘दक्षिण गोव्यात नवीन चेहरा हवा, शक्यतो राजकीय वर्तुळातील नको, कोणताही वाद नको, भाजपच्या विचारधारेशी जवळीक असणारे घराणे असावे’, यावर भाजपचे पक्षश्रेष्ठी ठाम होते. यामुळे अखेर सौ. पल्लवी धेंपे यांचे नाव अंतिम करण्यात आले.
With the hard work of Karyakartas, we will win both the seats with a big margin#AbkiBaar400Paar pic.twitter.com/MPwA7DqSlS
— BJP Goa (@BJP4Goa) March 25, 2024
सौ. पल्लवी धेंपे यांचा परिचयसौ. पल्लवी धेंपे या धेंपो उद्योग समुहाच्या कार्यकारी संचालक आहेत. सौ. पल्लवी धेंपे या विविध परोपकारी उपक्रमांच्या व्यतिरिक्त अनेक शैक्षणिक संस्था, तसेच सामाजिक आणि सांस्कृतिक संघटना यांच्याशी संबंधित आहेत. सौ. पल्लवी धेंपे या उच्च विद्याविभूषित आहेत. त्यांनी पुणे विद्यापिठातून ‘एम्.बी.ए.’ पदवी घेतली आहे. धेंपो उद्योग समुहाचा प्रकाशन व्यवसाय त्या सांभाळतात, तसेच धेंपो धर्मादाय संस्थेच्या त्या विश्वस्त आहेत. |