सोलापूर-अक्कलकोट महामार्गावरील बसथांब्यांच्या पाट्या काढून टाकल्याने गावातील प्रवाशांची गैरसोय !
सोलापूर – सोलापूर-अक्कलकोट राष्ट्रीय महामार्गाच्या नूतनीकरणामध्ये गावालगत असणार्या बस थांब्यांच्या पाट्या, तसेच काही ठिकाणी बसथांबे काढून टाकल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यातच राज्य परिवहन महामंडळाच्या अनेक बस या उड्डाणपुलावरून जात असल्याने प्रवाशांना २ घंटे उड्डाणपुलावर ताटकळत बसची वाट पहात उभे रहावे लागत आहे. सध्या उन्हाळा मोठ्या प्रमाणात वाढल्याने आणि तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोचल्याने प्रवाशांनी नेमके थांबायचे कुठे ? असा संतप्त प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे.
रस्त्यांची कामे झाल्यानंतर अनेक बसथांब्यांवर गावांची नावे, रस्त्यांचे उल्लेख आणि शाळांची नावे असल्याच्या पाट्या लावण्यात आल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांना नेमके थांबायचे कुठे ? हे लक्षात येत नाही. तरी या सर्व पाट्या लावाव्यात आणि गावातून बस जाण्याचे ठिकाण निश्चित करून बसथांब्याची सोय करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे. या संदर्भात राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक विनोद भालेराव म्हणाले, ‘‘बस थांबे उभारणीसाठी समन्वय बैठकीत वारंवार पाठपुरावा करूनही दुर्लक्ष केले जात आहे. पुलावरून जाणार्या बसची माहिती प्रवाशांनी आम्हाला कळवावी, संबंधित बसचालकांवर कारवाई करण्यात येईल.’’
या संदर्भात राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी सांगितले की, सर्व गावांलगत आणि शाळांलगत फलक लवकरात लवकर लावले जातील.