आध्यात्मिक, धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहास जाणून घेण्यासाठी मूर्ती अभ्यास आणि संशोधन आवश्यक ! – डॉ. जी.बी. देगलूरकर, मूर्तीशास्त्राचे जाणकार
सोलापूर विद्यापिठात ‘प्राचीन मूर्तीशास्त्र’ विषयावर राष्ट्रीय परिषद !
सोलापूर – मूर्तीशास्त्र हा दुर्लक्षित विषय असून विद्यापिठाने या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. मूर्तीचा खोलवर जाऊन अभ्यास केला, तरच आपला जाज्वल्य इतिहास समोर येणार आहे. मूर्ती पहाणे, ओळखणे, तपशीलवार सांगणे, यापुढे जाऊन ज्यासाठी या मूर्ती निर्माण झाल्या त्याचेही चिकित्सक पद्धतीने अभ्यास करणे आवश्यक आहे. मूर्तीचे वेगवेगळे प्रकार आहेत, त्याचे भावार्थ आहेत. शास्त्रीय दृष्टीकोनातून काही मूर्ती तयार झाल्या आहेत. धार्मिकदृष्ट्यादेखील त्या महत्त्वाच्या आहेत. तरी आध्यात्मिक, धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहास जाणून घेण्यासाठी मूर्ती अभ्यास आणि संशोधन आवश्यक आहे, असे प्रतिपादन मूर्तीशास्त्राचे जाणकार डॉ. जी.बी. देगलूरकर यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापिठाच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्वशास्त्र विभागाच्या वतीने ‘महाराष्ट्र पुरातत्व आणि मूर्तीशास्त्र’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन डॉ. जी.बी. देगलूरकर यांच्या हस्ते ‘ऑनलाईन’ करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे, डॉ. माया पाटील, नांदेड येथून डॉ. प्रभाकर कोळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी डॉ. गौतम कांबळे म्हणाले, ‘‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामधे भारतीय ज्ञान परंपरेला अतिशय महत्त्व देण्यात आले आहे. याचाच विचार करून मूर्तीशास्त्र या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन आहे. याचा विद्यार्थ्यांनी बारकाईने अभ्यास करावा.’’