छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनुमती नसलेल्या दगड खाणी बंद करण्याचे आदेश !
छत्रपती संभाजीनगर – येथे ५२ हून अधिक खाणी आहेत. त्यांपैकी १८ खदानधारकांचा खाणपट्टा अधिकृत आहे, २५ दगड खाणींची मुदत संपुष्टात आली आहे, तर ९ खाणींच्या नूतनीकरणासाठी मान्यता प्राप्त झाली आहे. अनेक ठिकाणी डोंगर पोखरला जात आहे. त्यामुळे विनाअनुमती अनेक ठिकाणी दगड काढला जात आहे. पर्यावरणाची अनुमती संपलेल्या येथील दगडखाणी त्वरित बंद करा, असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. याविषयी तपासणी करून नियमाचा भंग करणार्यावर दंडात्मक कारवाई करा, असे निर्देशही तहसीलदारांना देण्यात आले आहेत.
जिल्ह्यात ७० हून अधिक ‘स्टोन क्रशर’ (दगड तोडणारे यंत्र असणार्या गाड्या), तर खाणींमधील दगड फोडून क्रशरने त्याचे तुकडे केले जातात. २७ स्टोन क्रेशरचालकांनीच रितसर परवानगी घेतली आहे. त्यामुळे काही स्टोन क्रशरही अनधिकृत असल्याचे लक्षात आले आहे. ‘खडी क्रशर’ (खडी तोडणारे यंत्र असणार्या गाड्या)ची नोंद महसूल विभागात होत नसल्याने त्यामध्ये वापरलेल्या दगडांच्या परिमाणाची तपासणी करणे शक्य होत नाही. अनधिकृत वाहतूक रोखण्यासाठी खडी क्रशर, स्टोन क्रशरधारक यांना व्यापारी परवाना घेण्यासाठी ‘महाखनिज’ या संगणक प्रणालीवर ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.