वीर संताजी घोरपडे यांच्या समाधीस्थळ परिसरातील पथदीप गेले चोरीला !
शूरविरांच्या समाधीस्थळाच्या ठिकाणी होणारी दुर्दशा छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रासाठी लज्जास्पदच होय !
सातारा, २४ मार्च (वार्ता.) – माण तालुक्यातील कारखेल येथे वीर संताजी घोरपडे यांची समाधी आहे. काही दिवसांपूर्वी या समाधी परिसरातील हायमास्टचे पथदीप चोरीला गेल्याची घटना घडली आहे. याविषयी कारखेल ग्रामपंचायतीने म्हसवड पोलीस ठाण्यात लेखी तक्रार प्रविष्ट केली आहे.
१४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून काही दिवसांपूर्वी वीर संताजी घोरपडे यांच्या समाधीस्थळावर हायमास्टचे पथदीप बसवण्यात आले होते; मात्र थोड्या दिवसांतच या विद्युत् खांबांवरून ४ हायमास्टचे पथदीप चोरीला गेले आहेत. याविषयी तातडीने कारखेल ग्रामपंचायतीने म्हसवड पोलिसांत तक्रार दिली; मात्र अजूनही पोलिसांनी याविषयी कोणतेही अन्वेषण केलेले नाही. स्वराज्यासाठी प्राणांची बाजी लावणार्या योध्द्यांच्या समाधीस्थळाची ही अवहेलना अशोभनीय आहे. यासाठी पोलीस, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी विशेष लक्ष घालावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.