पुन्हा एकदा ‘क्लीन अप मार्शल’ !
(‘क्लीन अप मार्शल’ म्हणजे अस्वच्छता करणार्यांना दंड करणारे कर्मचारी)
‘स्वच्छ भारत अभियाना’च्या अंतर्गत शासनाकडून विविध मोहिमा राबवूनही जनतेमध्ये अद्याप स्वच्छतेविषयी तितकीशी जागृती झालेली नाही. सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकल्यामुळे, तसेच थुंकल्यामुळे पसरणारी अस्वच्छता आणि त्यामुळे निर्माण होणारा जनतेच्या आरोग्याचा प्रश्न या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने मुंबईत पुन्हा एकदा ‘क्लीन अप मार्शल’ नेमण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या २४ विभागांमध्ये टप्प्याटप्प्याने ७२० या कर्मचार्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे आणि कचरा फेकणारे यांच्याकडून आता २०० ते १ सहस्र रुपयांपर्यंतची दंडवसुली केली जाणार आहे. कोरोना महामारीच्या काळात सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचा आणि इतस्ततः कचरा करण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. अशा अपप्रवृत्तींवर आळा बसावा, यासाठी महापालिकेने त्या वेळी मुंबईभर या कर्मचार्यांची नेमणूक केली होती. कोरोनाचा प्रभाव जसा न्यून झाला, तसे जनमानसात स्वच्छतेचे गांभीर्यही न्यून होत गेले. शहरात पान आणि गुटखा खाऊन थुंकल्याच्या खुणा जागोजागी दिसतातच. खाद्यपदार्थांच्या हवाबंद पाकिटांची वेष्टने, कागदाचे कपटे, फळांची साले रस्त्यावर इतस्ततः फेकलेली आढळत आहेत. मुंबईतील वाढते प्रदूषण नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करत असतांना वरील कचर्यामुळे होणारा जंतूसंसर्ग होण्याची शक्यताही वाढली आहे. यासाठीच उपाययोजना म्हणून महापालिकेने पुन्हा एकदा या कर्मचार्यांची नियुक्ती केली आहे.
रस्त्यावर थुंकणे आणि कचरा केराच्या डब्यात न टाकता इतस्ततः फेकणे ही समस्या राज्यात अन् देशात सर्वत्रच आहे. महाराष्ट्रात म्हणायला गुटखाबंदी आहे; मात्र अनेक पान टपर्यांवर आजही तो सर्रासपणे विकला जातो. सध्या रेल्वेमध्येही गुटखा आणि सिगारेटची पाकिटे विकणारे पहायला मिळतात. याखेरीज तंबाखू खाणारा वर्ग महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहे. उत्तर भारतातून नोकरी-व्यवसायासाठी शहरांत आलेली आणि पान खाऊन तोंड लाल केलेली बरीचशी मंडळी राज्यात सर्वत्र पहायला मिळतात. अशांना थुंकावेसे वाटल्यावर ते दिसेल त्या कोपर्यात किंवा रस्त्यात कुठेही थुंकतात. सरकारी कार्यालये, जिन्यांच्या भिंती, बसस्थानके, तसेच सार्वजनिक ठिकाणच्या भिंतीचे कोपरे या थुंकण्याने रंगतात. धावत्या गाडीतून थुंकल्यानेही वाद होतात. खिडक्याही खराब होतात. इतस्ततः थुंकून आणि कचरा करून जनतेचे आरोग्य धोक्यात आणणार्या अशा मंडळींवर वचक ठेवण्यासाठी महापालिकेने तो व्यय या कर्मचार्यांकडून सव्याज वसूल करावा, ही राष्ट्रप्रेमींची अपेक्षा !
– श्री. जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई.