पुणे महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर १ मासापासून देयक मिळण्यासाठी वडील आणि मुलगा यांचे उपोषण !

पुणे म.न.पा

पुणे – कोरोना महामारीच्या काळामध्ये महापालिकेच्या स्वच्छता साहित्य पुरवणार्‍या ‘रेणुकामाता सर्व्हिसेस इंडिया प्रा. लि.’ या आस्थापनाचे २ कोटी रुपयांचे देयक थकवले आहे. हे देयक मिळावे; म्हणून आस्थापनाचे मालक (वडील आणि मुलगा) गेल्या ३१ दिवसांपासून महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये उपोषणाला बसले आहेत, तरीही महापालिका प्रशासनाने याची साधी नोंदही घेतली नाही.

कोरोना महामारीच्या काळामध्ये आपत्कालीन परिस्थिती म्हणून कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाने निविदा प्रक्रिया न राबवता शहरातील अनेक आस्थापनांकडून स्वच्छता साहित्य थेट खरेदी केले होते. संबंधित आस्थापनाने पुरवलेल्या साहित्याची देयके वेळोवेळी सादर केली आहेत. क्षेत्रीय कार्यालयाकडून आतापर्यंत कोणतेही देयक दिले नसल्याचे आस्थापनाचे म्हणणे आहे. तर संबंधित ठेकेदार आस्थापनाने वाढीव दराने देयके सादर केली आहेत, असे क्षेत्रीय कार्यालयाचे म्हणणे आहे. त्यावर ज्या वस्तूची किंमत अडीच सहस्र रुपये आहे त्याचे मूल्य ५० रुपये लावत आहे, असा ठेकेदाराचा आरोप आहे. (आयुक्तांनी या प्रकरणी लक्ष घालून शहानिशा करून देयक देणे आवश्यक आहे ! – संपादक)

संपादकीय भूमिका 

एवढे दिवस उपोषण का करावे लागते ? १ मास होऊनही महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर उपोषण करणार्‍यांची नोंद घेतली न जाणे, हे प्रशासनाला लज्जास्पद आहे !