भारतीय कालगणना आणि वैदिक घड्याळ !
भारताच्या सोनेरी इतिहासात झालेली विविध गणितीय संशोधने अभ्यासातून पुन्हा बाहेर काढून देशाचे समृद्ध भविष्य घडवावे !
‘उज्जैन (मध्यप्रदेश) ही भारताची सांस्कृतिक नगरी आहे. आता ती भारतासह संपूर्ण विश्वाला वैदिक कालगणनेनुसार वेळ सांगणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘विक्रमादित्य वैदिक घड्याळ’ या अद्भुत घड्याळाचे लोकार्पण करण्यात आले. या घड्याळामुळे भारतीय कालगणनेला पुन्हा महत्त्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय कालगणना कशी होती आणि वैदिक घड्याळ्याची वैशिष्ट्ये जाणून घेणे उचित ठरेल.
१. भारताला सांस्कृतिक आणि शास्त्रज्ञानाची विशाल परंपरा
भारतातील सांस्कृतिक स्थानांमध्ये उज्जैन कायम केंद्रस्थानी राहिले आहे. महाकालचा आशीर्वाद असणारी ही नगरी संस्कृत साहित्यात कवीकुलगुरु कालिदास यांचे वास्तव्य असणारी नगरी म्हणूनही प्रसिद्ध आहे. आता ही नगरी भारतासह संपूर्ण विश्वाला वैदिक कालगणनेनुसार वेळ सांगणार आहे. भारताला सांस्कृतिक आणि शास्त्रज्ञानाची विशाल परंपरा आहे. भारतीय ज्ञानशाखांमध्ये शून्याचा शोध, वैदिक गणित, पायथागोरसच्या सिद्धांतापूर्वी असणारी शुल्बसूत्रे, खगोलशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि विज्ञानातील अनेक सिद्धांत आढळतात. कालगणना तरी याला अपवाद कशी ठरेल ?
२. कालगणना म्हणजे काय ?
काळाचे मापन करण्याच्या पद्धतीला ‘कालगणना’ म्हणतात. इंग्रजीतील ‘क्रॉनॉलॉजी’ आणि ‘एरा’ या दोन शब्दांसाठी कालगणना ही संज्ञा मराठीत रूढ झालेली आहे. घडत असलेल्या आणि घडलेल्या घटनांचा कालानुक्रम सांगणे, असा कालगणनेचा मूळ हेतू असतो. ऐतिहासिक कालगणनेत गतकालीन घटनांचा कालानुक्रम निश्चित करण्याचा प्रयत्न असतो. अर्थात् ही कालगणना करण्याची पद्धत भिन्न प्रदेशांमध्ये भिन्न प्रकारची असल्याचे आढळते. विविध काळांमध्ये विविध कालगणना अस्तित्वात असल्याचे आढळते. सध्या प्रचलित आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता असणारी कालगणना ख्रिस्ती आहे.
३. भारतीय कालगणना
आपल्या नेहमीच्या जीवनात आपण पाहतो की, लग्न किंवा पूजा यांच्यासाठी एखादी विशिष्ट दिनांक असला, तरी ‘मुहूर्त’ काढलेला असतो. विशिष्ट तिथी, वार आणि ग्रह यांचा अभ्यास करून काही विशिष्ट वेळा ठरवलेल्या असतात. या कालगणनेचे संदर्भ वैदिक वाङमयात दिसतात. वैदिक काळात अहोरात्र पक्ष, चांद्रमास, ऋतू, नक्षत्रे यांचे तत्कालीन लोकांना चांगले ज्ञान असल्याचे दिसते. एवढेच नव्हे, तर सौर आणि चांद्र मास यांचा मेळ घालण्यासाठी लागणार्या अधिक मासाचेही त्यांना आकलन झाले होते. त्याही पुढे जाऊन वासंतिक आणि शरद संपात यांचेही त्यांना ज्ञान झाले होते; पण कालगणनेसाठी त्यांना ४ किंवा ५ वर्षांचे एक चक्र किंवा युग कल्पावे लागले.
लोकमान्य टिळकांनी ‘ओरायन’ आणि ‘आर्क्टिक होम इन द वेदाज’ या ग्रंथांमध्ये याचा सखोल अभ्यास केलेला आहे. काही देशांमध्ये १० मासांचे वर्ष समजले जात असे; पण भारतामध्ये चंद्राच्या अनुषंगाने होणारे १२ चांद्र मासांचे चांद्र वर्ष, सूर्य आणि तारे यांच्या अनुषंगाने होणारे सौर वर्ष, तसेच त्यांचा मेळ घालण्यासाठी धरावा लागणारा अधिक मास यासंदर्भात वेदकालीन लोक इतरांच्या मानाने बरेच पुढे गेले होते. तथापि २७ नक्षत्रांपासून सिद्ध केलेल्या १२ राशी आणि सप्तग्रहांवरून बनवलेले वार हे भारतियांनी ग्रीक लोकांपासून घेतले, असे दिसते. राशी-वारांचे पश्चिमेकडून भारतात संक्रमण होत असतांना अरबस्तान, इराण या देशांमध्ये वार का रुजले नाहीत ? हा एक प्रश्नच आहे. अरबी आणि इराणी संस्कृतींमध्ये पहिल्या ५ दिवसांमध्ये, म्हणजे रविवार ते गुरुवार या ५ वारांना अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा दिवस किंवा यक्शंबा, दूशंबा, सेशंबा, चहारशंबा, पंजशंबा, शुक्रवारला जुमा, आदिना आणि शनिवारला सुबत किंवा शंबा अशी नावे दिली आहेत. यातून या देशांमध्ये वारांची प्रथा रुजली नाही, हे स्पष्ट होते. राशी भारतात प्रचारात आल्या, तेव्हाच या देशांतही प्रचारात आल्या. यामुळे भारतीय ज्योतिषात कोणता भाग केव्हा प्रविष्ट झाला, हे पहाणे फार उद्बोधक होईल.
४. भारतात प्रादेशिक स्थितीनुसार काही कालगणनांची निर्मिती
भारताचा काश्मीर ते कन्याकुमारी किंवा प्राग्योतिष ते सिंध एवढा विशाल विस्तार आहे. या साम्राज्याचे लहान लहान विभागांमध्ये विभाजन झाले. या प्रत्येक प्रदेशाची स्वतंत्र आचार-संस्कृती निर्माण झाली. तसे लोकव्यवहार निर्माण झाले. यामधून प्रादेशिक सोयीनुसार काही कालगणना निर्माण झाल्या. उदा. भारतात गणेश चतुर्थीला गणपती पूजन करत असले, तरी सर्व ठिकाणी गणेश चतुर्थी समान दिवशीच आणि समान वेळी असेलच असे नाही. त्यातही काहीसे फरक आढळतात. भारतात विविध कालगणना उत्पन्न होण्याचे आणखीही एक कारण आहे. इतिहासाच्या अभ्यासावरून आपणास असे दिसून येते की, अनेक जमाती विविध काळी भारताबाहेरून देशात आल्या आणि कायमच्या वस्ती करून राहिल्या. त्यांनी त्यांच्यासमवेत काही आचार-उच्चार-विचार आणले. त्यात कालगणनाही होत्या. त्या जमातींपैकी काहींनी त्यांची राज्ये येथे स्थापन केली. तेव्हा त्यांच्या कालगणनाही येथे प्रचारात आल्या.
५. भारतात अस्तित्वात असलेल्या कालगणना
भारतात सद्य:स्थितीत ३६ कालगणना अस्तित्वात आहेत. त्यात कटकी/बंगाली, इलाही, कटकी, कलचुरी, कलियुग, कोल्लम, गांगेय किंवा गंग-कदंब, गुप्त, ग्रहपरिवृत्ती, चालुक्य विक्रम, जव्हार, जुलूस, तुर्की द्वादशवर्षचक्र आणि चिनी षष्टिवर्षचक्र, नेवार (नेपाळ), पर्गनाती, पुदुवैप्पु, फसली, बंगाली, बार्हस्पत्य वर्षचक्र १ आणि २, बुद्धनिर्वाण, भाटिक, मगी, मब्लूदी, मौर्य, राज्याभिषेक, लक्ष्मणसेन, विक्रम, विलायती, वीरनिर्वाण, शक, शुहूर, सप्तर्षी, सिंह, सिल्युसिडी, हर्ष, हिजरी.
६. पराक्रमी राजांकडून विविध कालगणनांची निर्मिती
भारतात विविध कालगणना चालू होण्याचे तिसरेही एक कारण आहे. येथील हिंदु राजांमध्ये अशी एक कल्पना प्रचलित होती की, एखादा अत्यंत पराक्रमी राजा त्याची स्वतंत्र कालगणना प्रचलित करत असे. विक्रमादित्य आणि शालिवाहन हे मोठे पराक्रमी राजे होऊन गेले. त्यांनी त्यांच्या कालगणना चालू केल्या. ‘आपण जर त्यांसारखेच पराक्रमी आहोत, तर आपणही आपल्या कालगणना का चालू करू नयेत?’, असा विचार करून काही राजांनीही त्यांच्या स्वतंत्र कालगणना चालू केल्या. चालुक्य, ६ वा विक्रमादित्य, अकबर, छत्रपती शिवाजी महाराज, टिपू इत्यादी राजे होत. सारांश, भारतामध्ये गेल्या २ सहस्र ५०० वर्षांत अनेक कालगणना उत्पन्न झाल्या किंवा प्रचलित केल्या गेल्या. यांपैकी काही शुद्ध भारतीय, परकीय आणि काही मिश्र स्वरूपाच्या आहेत. काहींच्या प्रारंभाचा थांगपत्ता लागतो, तर काहींचा लागत नाही. स्थानिक पातळीवरही आणि धार्मिक परंपरांनुसार विविध कालगणना पाळल्या जातात.
७. राजा विक्रमादित्य वैदिक घड्याळाची वैशिष्ट्ये
अ. हे वैशिष्ट्यपूर्ण घड्याळ असून वैदिक कालगणनेनुसार वेळ दर्शवणारे आहे. या घड्याळात ‘इंडियन स्टँडर्ड टाइम’ आणि ‘ग्रीनविच मीन टाइम’ यासमवेतच पंचांग अन् मुहूर्त यांविषयीही माहिती मिळणार आहे.
आ. ‘विक्रमादित्य वैदिक घंटा’ हा ४८ मिनिटांचा असणार आहे. या घड्याळामध्ये २४ घंटे नाहीत, तर ३० घंटे असणार आहेत. हे घड्याळ सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतची सगळी वेळ दाखवणार आहे. वैदिक मापनानुसार साधारणत: ३० घंटे होतात.
इ. हे घड्याळ केवळ वेळच नाही, तर मुहूर्त, ग्रहण, तिथी, शुभमुहूर्त, पर्व, उपवास, ग्रह-भद्रा स्थिती, योग, सण, सूर्य आणि चंद्र ग्रहण यांसह अनेक गोष्टींची माहिती देणार आहे.
ई. ‘आयआयटी देहली’च्या विद्यार्थ्यांनी हे विक्रमादित्य वैदिक घड्याळ बनवले आहे, तसेच या घड्याळाचे ‘ॲप’ही उपलब्ध आहे. हे घड्याळ ‘इंटरनेट’ आणि ‘जीपीएस्’शी (इंटरनेट प्रणालीशी) जोडलेले आहे. यासह भारतातील प्रमुख मंदिरांशी ते संलग्न असणार आहे. या घड्याळात इंग्रजी वेळही दर्शवण्यात येणार आहे.
८५ फूट उंच मनोर्यावर बसवण्यात आलेले हे वैदिक घड्याळ भारताच्या समृद्ध परंपरेत भर घालणारेच ठरले आहे. या घड्याळाच्या निमित्ताने भारताच्या सोनेरी इतिहासात झालेली विविध गणितीय संशोधने अभ्यासण्यात आली. इतिहासाच्या अभ्यासातून भारत पुन्हा समृद्ध भविष्य घडवेल, याची ही नांदीच आहे.’
– वसुमती करंदीकर
(साभार: साप्ताहिक ‘विवेक मराठी’, २०.३.२०२४)