तालिबानकडून पाकिस्तानी सैन्याच्या १२ चौक्या उद्ध्वस्त !
‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’चे ३० सहस्रांहून आतंकवादी पाक सैन्यावर आक्रमण करण्याच्या सिद्धतेत !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानने हवाई आक्रमण केल्यामुळे संतापलेल्या अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारने आदेश दिल्यानंतर तालिबानी सैन्याने पाकिस्तान सैन्याच्या १२ चौक्या उद्ध्वस्त केल्या आहेत. अफगाण तालिबान आणि तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या आतंकवादी संघटनांचे ३० सहस्रांंहून अधिक आतंकवादी कमांडर हाफीज गुलबहादूरच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी सैन्याची छावणी मीर अलीपर्यंत पोचले आहेत. २६ मार्चनंतर पाकविरोधात मोहीम चालू करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.
पाकिस्तानने गेल्या आठवड्यात वजिरिस्तानमध्ये आतंकवादी हाफीज गुलबहादूरच्या ठिकाणांवर हवाई आक्रमणे केली होती. यांत १८ आतंकवादी मारले गेले. हाफीज गुलबहादूर वर्ष २००६ ते २००९ या कालावधीत पाक सैन्याचे समर्थन करणारा कमांडर होता; मात्र यानंतर गुलने पाक सुरक्षादलांवरही आक्रमणे चालू केली होती. जून २००९ पासून पाक सैन्याने त्याच्याविरुद्ध मोहीम चालू केली होती.