Moscow Terror Attack : आक्रमणकर्त्यांना सोडणार नाही; प्रत्येकाला शिक्षा होईल ! – राष्ट्राध्यक्ष पुतिन

  • रशियात इस्लामिक स्टेटने केलेल्या आतंकवादी आक्रमणाचे प्रकरण

  • कह्यात घेतलेल्या ११ संशियतांपैकी ४ बंदूकधारी !

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन

मॉस्को (रशिया) – येथे झालेल्या भीषण आतंकवादी आक्रमणात मारल्या गेलेल्यांची संख्या १४० हून अधिक झाली असून या आक्रमणाचे दायित्व इस्लामिक स्टेटने स्वीकारले आहे. रशियाच्या सुरक्षा यंत्रणांनी आतापर्यंत ११ संशयितांना कह्यात घेतले असून त्यांच्यापैकी ४ जण बंदूकधारी आहेत. या आतंकवाद्यांना युक्रेनकडून साहाय्य मिळाल्याचा दावा रशियाच्या प्रशासनाकडून करण्यात येत आहे. आक्रमणानंतर हे लोक युक्रेनमार्गे रशियातून पळून जाणार होते. या संपूर्ण घटनेविषयी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन म्हणाले की, लवकरच सर्व आक्रमणकर्त्यांची ओळख पटवली जाईल आणि सर्वांना शिक्षा होईल. आतंकवाद्यांना पाठिंबा देणार्‍या आणि हे आक्रमण करणार्‍यांना आम्ही शोधून काढून शिक्षा करू.

प्राथमिक तपासात युक्रेनने इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांना साहाय्य केल्याचे समोर आले आहे. युक्रेनने आक्रमणकर्त्यांसाठी सीमा उघडली होती, असा आरोप रशियाकडून होत आहे, तर युक्रेनचे म्हणणे आहे की, तो या आतंकवादी आक्रमणात सहभागी नव्हता. ‘आमचा लढा रशियाच्या सैन्याशी आहे, तेथील नागरिकांशी नाही’, असे युक्रेनी सरकारचे म्हणणे आहे.

आक्रमणानंतर आतंकवादी एका चारचाकी गाडीतून पळून गेले. ते नंतर दक्षिण-पश्‍चिम ब्रायनस्क प्रदेशात दिसले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. स्थानिक वृत्तवाहिनीने सांगितले की, संशयित आतंकवाद्यांपैकी १ जण ४ मार्च या दिवशी तुर्कीयेहून आला होता.