पिंपरी येथे विनापरवाना रस्ते खोदणार्यांवर गुन्हे नोंद !
पिंपरी (जिल्हा पुणे) – शहरातील विनापरवाना चालू असलेल्या खोदकामाची पोलिसांनी पहाणी चालू केली आहे. वाहतूक विभागाच्या अनुमतीविना रस्ते खोदणार्यांवर गुन्हे नोंद केले जाणार आहेत. निगडीतील एका कंत्राटदारावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे, तसेच देहूरोड येथे मुकाई चौक ते किवळे गाव जाणार्या रस्त्यावर ‘लिपारू इन्फ्रा लि.’ या आस्थापनाने विनापरवाना खोदकाम केले आहे. आस्थापनाचे फारूक खान यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात चाकण, भोसरी, तळेगाव ही औद्योगिक क्षेत्रे, तर हिंजवडी, तळवडे, चिखली हे माहिती आणि तंत्रज्ञाननगरीचे क्षेत्र आहे. देहू आणि आळंदी ही तीर्थक्षेत्रे आहेत. त्यामुळे शहरात सातत्याने अतीमहत्त्वाच्या व्यक्तींसह देश-विदेशांतील नागरिकांची ये-जा चालू असते.
पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये सार्वजनिक रस्त्यावर चालणार्या, तसेच चालू करण्यात येणार्या खोदकामास पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाकडील ना-हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. ठेकेदारांना हे खोदकाम करण्याअगोदर वाहतूक विभागाची अनुमती घ्यावी लागते. शहरातील काही ठेकेदार वाहतूक विभागाची अनुमती न घेता काम करत असल्याचे निदर्शनास आले आहे. अतीमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दौर्याच्या मार्गावर असे अनधिकृत खोदकाम केल्यास अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असते.