मराठवाड्यात पाण्याची गंभीर स्थिती : अनेक प्रकल्पांमध्ये केवळ १५ टक्के पाणी !
मार्चच्या अखेरीकडे जात असतांनाच मराठवाड्यात पाण्याची गंभीर स्थिती असल्याचे समोर आला आहे. अनेक लघु, मध्यम प्रकल्पात केवळ १५ टक्के पाणी उरले असून मराठवाड्यातील पाणीसाठा झपाट्याने तळ गाठत आहे. एकूण ८७७ लघु, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह विविध नद्यांवरील बंधार्यांमध्ये मिळून केवळ २७ टक्के उपयुक्त पाणी शिल्लक आहे. सीनाकोळेगाव मृतसाठ्यात, माजलगाव मृत साठ्याकडे, तर सीनाकोळेगाव प्रकल्पात उपयुक्त पाण्याचा थेंब नाही, अशी स्थिती आहे. मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा केवळ ३२ टक्क्यांवर आला आहे. उजनी धरणाची स्थितीही फारशी समाधानकारक नाही !
एकूणच यंदा संपूर्ण महाराष्ट्रात पर्जन्यमान अल्पच झाले. त्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत समाधानकारक पाऊस पडला नाही. येथील अनेक प्रकल्प आणि नद्या या पावसाळ्यातच भरल्या नाहीत. त्यामुळे आता संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भात एप्रिल अन् मे मासात पाणीबाणीसारखी स्थिती उद्भवणार आहे. पाणीसाठ्याअभावी आणि पुरेशा नियोजनाअभावी आताचा सोलापूर, अक्कलकोट, संभाजीनगर येथील अनेक उपनगरांमध्ये ५ ते ८ दिवसांतून एकदाच पाणी येते, अशी स्थिती आहे. आताच काही भागांत टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
पावसाळ्यात पाणी वाचवण्याची आवश्यकता !
वास्तवित जगातील पाण्यासाठी समृद्ध देशांपैकी भारत हा एक असून नद्या, विस्तीर्ण जलाश, तसेच इतर स्रोत आहेत. साधारणत: भारतात प्रत्येक वर्षी ४ लाख कोटी टन पाणी उपलब्ध असते; मात्र इतके असून अद्यापही अनेक राज्यांतील अनेक जिल्ह्यांत, अनेक गावांत शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध नाही, अशी स्थिती आहे. त्यासाठी पावसाळ्यात पडणारा पाण्याचा थेंब अन् थेंब वाचवण्याची आवश्यकता असून शेततळी, कूपनलिका भरण, घरांच्या वरती पडणारे पाणी भूजळपातळी वाढवण्यासाठी वापरणे यांसह अनेक उपाययोजना करण्याची नितांत आवश्यकता आहे !
– श्री. अजय केळकर, कोल्हापूर (२३.३.२०२४)