‘जन मिलिशिया’चा सदस्य असलेल्या माओवाद्याला गडचिरोलीतून अटक !
गडचिरोली (महाराष्ट्र) – माओवाद्यांचा कट्टर समर्थक आणि ‘जन मिलिशिया’चा सदस्य पेका मादी पुंगाटी (वय ४९ वर्षे) याला २१ मार्चला पोलिसांनी अटक केली. पोलीस अंमलदाराचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात पुंगाटी याचा प्रत्यक्ष सहभाग होता, अशी पोलिसांची माहिती आहे. त्याच्यावर सरकारने १ लाख ५० सहस्र रुपयांचे पारितोषिकही जाहीर केले होते.
१. भामरागड उपविभागाच्या हद्दीत भामरागड क्यू.आर्.टी. (क्विक रेस्पॉन्स फोर्स म्हणजेच शीघ्र कृती दल), भामरागड पोलीस स्थानकाचे पथक आणि सी.आर्.पी.एफ्.चे सैनिक नाकाबंदी करत असतांना तेथे १ जण संशयितरित्या वावरतांना आढळला. चौकशी केल्यावर त्याची वरील ओळख उघड झाली.
२. माओवाद्यांना साहाय्य आणि शिधा पुरवणे, गावातील लोकांना बैठकीसाठी गोळा करणे, माओवादी सप्ताहामध्ये कापडी फलक लावणे, पत्रके टाकणे अशी कामे तो करत होता.
३. गडचिरोली पोलिसांनी जानेवारी २०२२ पासून आतापर्यंत एकूण ७४ माओवाद्यांना अटक केली आहे.
Police Nab Dreaded Maoist With Rs 1.5 Lakh Bounty
📍#Gadchiroli Maharashtra pic.twitter.com/LlkzsFmzgA
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 23, 2024
‘जन मिलिशिया’ म्हणजे काय ?‘जन मिलिशिया’ हा नक्षल्यांच्या कार्यप्रणालीमधील महत्त्वाचा दुवा आहे. गावात राहून सशस्त्र लढा देणार्यांना शक्य तेवढे साहाय्य करण्याचे काम यांच्याकडे असते. माओवाद्यांच्या एकूण व्यवस्थेत ए.आर्.डी. (एरिया रक्षक दल) आणि जी.आर्.डी. (ग्राम रक्षक दल) यांनंतर ‘जन मिलिशिया’चे महत्त्व आहे. यांचा माओवाद्यांप्रमाणे गणवेश नसतो. |