सनातनच्या साधकांसाठी आध्यात्मिकदृष्ट्या वंदनीय असलेल्या गुरुदेवांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी ! : श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ !
इंदूर (मध्यप्रदेश) येथील संत प.पू. भक्तराज महाराज यांच्या आशीर्वादाने प.पू. डॉ. जयंत आठवले यांनी ‘सनातन संस्था’ स्थापन केली. त्यांचे अध्यात्मप्रसाराचे आणि साधक घडवण्याचे व्यापक कार्य त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ समर्थपणे सांभाळत आहेत. सप्तर्षींनी त्यांचे वर्णन अनुक्रमे ‘भूदेवी’ आणि ‘श्रीदेवी’ असेच केले आहे. त्या दोघी ‘अवतारी जीव आहेत’, असे सप्तर्षींनी जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून घोषित केले आहे. त्यामुळे ‘सनातन संस्थेचे ‘समाजाला आनंदप्राप्तीचा मार्ग दाखवण्याचे आणि साधक घडवण्याचे कार्य’, पुढे कसे चालू रहाणार ?’, असा प्रश्न ना सनातन संस्थेचे संस्थापक प.पू. डॉ. जयंत आठवले यांना आहे, ना सनातनच्या साधकांसमोर आहे. या दोन्ही विभूती सनातन संस्थेसाठी आणि साधकांसाठी आध्यात्मिकदृष्ट्या वंदनीय अन् लौकिकदृष्ट्या भूषणावह आहेत.
१. साधकांसाठी आध्यात्मिक आधारस्तंभ !
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ या समाजात जाऊन साधना म्हणून अध्यात्मप्रसाराची सेवा करणार्या साधकांसाठी, आश्रमात राहून साधना अन् सेवा करणार्या साधकांसाठी, तसेच सनातनच्या सर्वच साधकांसाठी आधारस्तंभ आहेत. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या सातत्याने भ्रमण करून, खडतर प्रवास करून अनेक तीर्थस्थळे, जागृत मंदिरे यांना भेट देऊन सप्तर्षींच्या आज्ञेप्रमाणे देवतांना प्रार्थना करणे, यज्ञयाग आणि विविध उपाय यांद्वारे संस्थेचे साधक अन् आश्रम यांच्या रक्षणासाठी आध्यात्मिक स्तरावर अविरत सेवारत आहेत. यामुळे सनातन संस्थेच्या साधकांसाठी या दोन्ही विभूती वंदनीय आहेत. सनातन संस्थेचे धर्मप्रचारक, दायित्व घेऊन सेवा करणारे साधक, सेवेत हातभार लावणारे साधक, संसार सांभाळून उर्वरित वेळेत सेवा करणारे साधक, हे सर्व आपापल्या भागात कार्यरत आणि साधनारत आहेत, ते केवळ श्रद्धेच्या बळावर ! ही श्रद्धा त्यांची जशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर ‘गुरुमाऊली’ म्हणून आहे, तशीच श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यावरही आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनीही या दोघींना ‘आध्यात्मिक उत्तराधिकारी’ म्हणून घोषित करतांना वेदांचे अंग असलेल्या ‘श्रुति’ आणि ‘स्मृति’ असे म्हटले आहे.
२. लौकिकदृष्ट्याही भूषणावह !
लौकिकदृष्ट्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना कुणी ओळखतही नसेल; पण अयोध्या येथील श्रीराममंदिरात श्रीरामलल्लाच्या (श्रीरामाचे बालक रूप) प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात या दोन्ही विभूतींना ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’च्या वतीने निमंत्रण मिळाले अन् त्यांना संत, तसेच अतीमहनीय व्यक्तींमध्ये स्थान मिळाले. गोवा राज्यातून श्रीरामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी केवळ ३ संतांना निमंत्रण होते. त्यांपैकी तपोभूमी, कुंडई येथील पद्मनाभ पिठाचे पीठाधीश पद्मविभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदस्वामी यांच्या व्यतिरिक्त सनातन संस्थेच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या होत्या. त्याचप्रमाणे अबू धाबी येथील ‘बी.ए.पी.एस्. हिंदु मंदिरा’च्या उद्घाटन सोहळ्यानंतरच्या कार्यक्रमासाठी या दोन्ही विभूतींना निमंत्रण मिळाल्यामुळे त्या सोहळ्यातही त्यांची वंदनीय उपस्थिती होती. या दोन गोष्टींमुळे सनातन संस्थेच्या साधकांसाठी या दोन्ही विभूती लौकिकदृष्ट्या भूषणावह आहेत.
३. कृतज्ञता !
समाजातील जिज्ञासू साधक बनणे आणि साधकांची आध्यात्मिक उन्नती होणे, ही अनुक्रमे सनातन संस्थेच्या अध्यात्मप्रसार कार्याची अन् गुरुकृपायोगानुसार साधनेची खरी फलनिष्पत्ती आहे. गुरुकृपायोगानुसार साधना करून २०.३.२०२४ पर्यंत १२७ साधक संत झाले, १ सहस्र ५३ हून अधिक साधक संतत्वाच्या दिशेने वाटचाल करत आहेत, तर सहस्रो साधक आध्यात्मिक उन्नती करून घेत आहेत. हे संत आणि साधक यांच्या या मांदियाळीमध्ये श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या हिर्याप्रमाणे चमकत आहेत. सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त या दोन्ही विभूतींच्या चरणी आणि हे सर्व लीलया घडवून आणणारी ‘गुरुमाऊली’ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
– श्री. वीरेंद्र मराठे, व्यवस्थापकीय विश्वस्त, सनातन संस्था (२०.३.२०१४)